Lokmat Agro >स्मार्ट शेती > लिंबूवर्गीय फळपिकांचे अंबिया बहार व्यवस्थापन कसे कराल?

लिंबूवर्गीय फळपिकांचे अंबिया बहार व्यवस्थापन कसे कराल?

How to do Ambia Bahar management of citrus fruit crops? | लिंबूवर्गीय फळपिकांचे अंबिया बहार व्यवस्थापन कसे कराल?

लिंबूवर्गीय फळपिकांचे अंबिया बहार व्यवस्थापन कसे कराल?

संत्रा व मोसंबी बागेपासून आर्थिक उत्पादन मिळवण्यासाठी आंबिया बहाराची शास्त्रीय दृष्टीने निगा राखणे अत्यंत जरूरी आहे. निसर्गतः संत्रा व मोसंबी फळझाडास वर्षातून तीन वेळा बहार येतो. त्यापैकी आपण 'आंबिया बहार' पाहूया.

संत्रा व मोसंबी बागेपासून आर्थिक उत्पादन मिळवण्यासाठी आंबिया बहाराची शास्त्रीय दृष्टीने निगा राखणे अत्यंत जरूरी आहे. निसर्गतः संत्रा व मोसंबी फळझाडास वर्षातून तीन वेळा बहार येतो. त्यापैकी आपण 'आंबिया बहार' पाहूया.

शेअर :

Join us
Join usNext

संत्रा व मोसंबी बागेपासून आर्थिक उत्पादन मिळवण्यासाठी आंबिया बहाराची शास्त्रीय दृष्टीने निगा राखणे अत्यंत जरूरी आहे. निसर्गतः संत्रा व मोसंबी फळझाडास वर्षातून तीन वेळा बहार येतो. त्यापैकी पावसाळ्यात (जुन-जुलै) येणाऱ्या बहारास 'मृगबहार' (मृग नक्षत्रात येणारा) आणि पावसाळा संपल्यानंतर (ऑक्टोबर मध्ये) येणाऱ्या बहारास 'हस्त बहार' (हस्त नक्षत्रात येणारा) तर थंडी संपतेवेळी (जानेवारी फेब्रुवारी) म्हणजे आंब्याला ज्या वेळी बहार येतो तो 'आंबिया बहार' असे तीन बहार वेगवेगळ्या ऋतूमध्ये येतात. लिंबूवर्गीय फळझाडांना बहार येण्याकरिता झाडाची वाढ करणारे अन्नद्रव्य कर्ब नत्र वाढीकरिता खर्च न होता अन्नद्रव्याचा संचय होणे आवश्यक आहे. अन्नद्रव्यांचा संचय झाडाच्या फांद्यांमध्ये प्रमाणबद्ध झाल्यावर शोषक पोषक हवामान मिळताच बहाराची फुले नवती सोबत दिसू लागतात.

संत्रा व मोसंबीचा आंबिया बहार
संत्रा व मोसंबीची झाडे निसर्गात थंडीच्या आणि उन्हाळ्याच्या दिवसात कमी-जास्त तापमानामुळे दोनदा विश्रांती घेत असतात. साधारणतः या काळात वातावरण पोषक नसल्यामुळे झाडांवर नवीन वाढ होत नाही. त्यामुळे या विश्रांतीच्या काळात जास्तीचा साखरेचा संचय झाडाच्या ६ ते ९ महिन्यांच्या फांद्यांमध्ये होतो व नवीन वाढीसाठी खर्च होणारा साखरेचा भाग शिल्लक राहून फांद्यांमध्ये त्याचा जास्तीचा संचय होऊन हवामान अनुकूल झाल्यावर झाडावर फुले येण्यास याचा उपयोग होतो. संत्रा व मोसंबीच्या आंबिया बहाराला नैसर्गिक बहार म्हणतात. या बहारामध्ये संत्रा व मोसंबी झाडाची वाढ तापमान कमी झाल्यामुळे कडाक्याच्या थंडीत थांबते. डिसेंबरचा दुसरा आठवडा ते जानेवारीचा दुसरा आठवडा या एका महिन्याच्या कलावधीत रात्रीचे किमान तापमान साधारणतः १० अंश से. खाली राहते. एवढ्या तापमानावर झाडांना ताण बसतो. या ताणामुळे झाडे खराब होत नाही.

आंबिया बहार घेण्याकरिता संत्रा व मोसंबी झाडाला ताण देणे
झाडांची सतत होणारी वाढ थांबविण्याकरिता संत्रा व मोसंबी झाडाला पाण्याचा पुरवठा बंद करणे म्हणजे झाडांना ताण देणे. संत्रा व मोसंबी झाडाला पाण्याचा ताण दिल्यामुळे झाडांची वाढ थांबवून झाडे विश्रांती घेतात आणि त्यामुळे झाडाच्या फांद्यात, पानात अन्नद्रव्यांचा संचय होतो. आंबिया बहार घेण्याकरिता डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा ते जानेवारीचा दुसरा आठवडा या कालावधीत संत्रा व मोसंबी बागेचे ओलित बंद करून झाडांना ताणावर सोडतात. या ताणाचा कालावधी जमिनीचा पोत, झाडाचे वय आणि जमिनीमध्ये उपलब्ध असलेला ओलावा यावर अवलंबून आहे. आंबिया बहारासाठी हलक्या जमिनीत ३५ ते ४५ दिवस, मध्यम जमिनीत ४५ ते ६० दिवस आणि भारी जमिनीत ५५ ते ७५ दिवस ताण द्यावा.

अधिक वाचा: बागायतीत आंतरपिकासाठी 'कोकण लेमन' फायदेशीर

झाडास ताण बसला हे कसे ओळखावे?
ताण सुरू करण्यापूर्वी झाडावरील पूर्वीची फळे काढावीत, बागेचे पाणी हळूहळू कमी करीत नंतर बंद करावे. ताण सुरू केल्यानंतर पानांचा मूळचा रंग कमी होऊन ती फिक्कट व नंतर पिवळी पडतात. असे होत असतांना पाने गळून पडेपर्यंत अन्न तयार करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवतात. साधारणपणे २५ टक्के पानगळ झाल्यास ताण बसला असे समजावे. अशाप्रकारे झाडांना ताण दिल्यास एकाच वेळी फुलोरा येतो आणि व्यापारीदृष्ट्या हे फायद्याचे ठरते.

भारी जमिनीत आंबिया बहार घेण्यासाठी काय करावे?
काळ्या जमिनीचा थर किमान १.२० मी पासून १५ मीटर पर्यंत असतो. या जमिनीत ताणावर झाडे सोडताच झाडाच्या मुळ्या पाण्याच्या शोधात खोलवर जातात. मुळात काळी जमीन उत्तम ओलावा टिकवून ठेवणारी असल्यामुळे, झाडांना ओलावा मिळत राहतो व झाडाला ताण बसत नाही आणि ती हिरवीगार राहून वाढत राहतात. अशा जमिनीत बगीचा संपूर्ण ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात साफ ठेवावा. डिसेंबरच्या १५ तारखेच्या आसपास झाडांच्या ओळींमधून लाकडी नांगराने नांगरून झाडाच्या मुळ्या उघड्या कराव्यात म्हणजे टोकावरची तंतुमुळे तुटून त्या ओलावा घेऊ शकणार नाहीत व झाड ताण घेतील. शिवाय १ लीटर पाण्यात २ मि.ली. लिव्होसीन हे कायीक वाढ रोखणारे संजीवक फवारावे म्हणजे झाड नवतीत न जाता बहारात जाईल.

आंबिया बहार घेण्याकरिता खताचे नियोजन
आंबिया बहार घेण्याकरिता संत्रा व मोसंबीची झाडे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ताणावर सोडावी. लगेच प्रत्येक झाडाला ४० ते ५० किलो शेणखत टाकून आडवी आणि उभी वखरणी करावी. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा तापमान वाढताच हलके ओलीत करावे. ताण तोडताना हलक्या ओलिताअगोदर प्रत्येक झाडाला ६०० ग्रॅम नत्र + ४०० ग्रॅम स्फुरद + ४०० ग्रॅम पालाश आणि भरखते द्यावीत. त्यानंतर पाच ते सात दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. तिसऱ्या पाळीला भरपूर पाणी द्यावे. ताण सोडल्यानंतर २० ते २५ दिवसांनी फुले येतात. त्यानंतर उरलेल्या नत्राचा (अर्धा) हप्ता एक ते दीड महिन्याने किंवा फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर द्यावा. हलक्या जमिनीत नत्राची मात्रा तीन ते चार हप्त्यात विभागून दिल्यास जास्त फायदेशीर ठरते.

अधिक वाचा: लिंबूवर्गीय फळ पिकामधील डिंक्या रोग व्यवस्थापन

ओलित व्यवस्थापन
आंबिया बहाराची फळे उन्हाळ्यात झाडावर पोसली जातात. त्यामुळे पाण्याचा साठा उन्हाळ्यात उपलब्ध असणे जरूरी आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्यास फळगळ होते व फळांची आवश्यक प्रत खालावते. म्हणून आंबिया बहार घेतांना ओलीताकडे कटाक्षाने लक्ष देणे जरूरी आहे. ओलीतासाठी ठिबक पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची बचत होते. जमिनिच्या पोताप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

संत्रा व मोसंबी झाडाचा वाफा गवताने आच्छादित करणे
वाफ्यातील ओलावा टिकविण्यासाठी ६ से.मी. जाडीचा गवताचा थर देऊन आच्छादित करावा. त्यामुळे ओलावा टिकतोच पण फळांची गळसुद्धा कमी होते. आणि जमिनीतील जिवाणू सक्रिय होऊन अन्नद्रव्य मुळांना सहज उपलब्ध होतात.

संत्रा बहाराची निगा राखणे
-
बहार आल्यानंतर सर्वच फुलांचे फळात रूपांतर होत नाही. बहारामध्ये बरीच फुले नर फुले असतात. त्यामुळे ही नर फुले गळून पडतात. त्यामध्ये फलन क्रिया होत नाही.  सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता, संजीवकांचा अभाव, हवामानाचा असमतोलपणा आणि किडींचा उपद्रव यामुळे फळांची गळ होते.
सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मॅगनिज सल्फेट, फेरस सल्फेट आणि बोरीक अॅसिड यांची ०.२ ते ०.५% तीव्रतेची फवारणी करावी.
संजीवकांचा समतोल साधण्यासाठी १० पीपीएम एनएएची मार्च महिन्यात फवारणी करावी. या बहारावर 'सिला' नावाच्या किडीचा प्रादुर्भाव असतो. यासाठी मॅलेथिऑन १० मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

डॉ. सुरेंद्र पाटील
प्राध्यापक, फळशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

Web Title: How to do Ambia Bahar management of citrus fruit crops?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.