अंजीर हे कोरडवाहू भागातील हलक्या ते मध्यम जमिनीत येणारे अजीर फळपीक असून कमी पाणी, कमी खर्च आणि अत्यल्प मशागतीत अधिक नफा मिळवून देणारे महत्वाचे फळपिक आहे.
अंजिराच्या अधिक उत्पादनाकरीता बहाराचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते. बहार व्यवस्थापनात खालील बाबींचा समावेश होतो.
- अंजीराचा बहर घेणार आहोत तेथील तापमान, हवेची आर्द्रता, सूर्यप्रकाश, पडणारा पाऊस, पावसाचे एकूण दिवस, धुके, गारा, वादळ, वारा या सर्व बाबींचा अभ्यास असणे गरजेचे आहे.
- अंजीर बागेतील मातीचे परीक्षण दरवर्षी करून घेणे गरजेचे आहे.
- अंजीर बागेचा जोम प्रभावी राखण्यासाठी, उत्पादनक्षम राहण्यासाठी बागेस खताच्या संतुलित मात्रा द्याव्यात. गरजेनुसारच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर महत्वाचा आहे.
- अंजीर बागेस भरपूर प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर करावा.
- बागेत तणांचा प्रादुर्भाव कमी करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर व पाण्याची बचत करण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. यासाठी प्लॅस्टिक आच्छादन, अथवा पालापाचोळा, उसाचे पाचट, वाळलेले गवत, लाकडाचा भुसा यांचा वापर करावा.
- छाटणीनंतर किंवा पानगळ केल्यानंतर झाडांवर नवीन फुट फुटण्यापूर्वी झाडांच्या फांद्या आणि खोडावर १ टक्का बोर्डोमिश्रणाची (एक किलो चुना अधिक एक किलो मोरचूद प्रति १०० लिटर पाणी) फवारणी करावी.
- बहरासाठी पाणी सुरू करत असतानाच खोडावर व फांद्यावर संजीवकाची फवारणी करावी. त्यासाठी २० मि.ली. हायड्रोजन सायनामाईड (५० टक्के) प्रति लिटर पाण्यातून तज्ञांच्या मार्गदर्शनाने फवारावे किंवा संपूर्ण झाडास चोळावे. त्यामुळे झाडांना नवीन पालवी येते.
- पिकावरील कीड-रोगाची अचूक ओळख करून घ्यावी. योग्य ती कीटकनाशके व बुरशीनाशके योग्य वेळी, योग्य त्या प्रमाणात फवारावीत. बागेतील तणांचे वेळीच नियंत्रण करावे.
- एकात्मिक कीडनियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. मित्र किटकांचा संहार होणार नाही या बाबीकडे विशेष लक्ष द्यावे.
- अंजीर बागेस सूत्रकृमींचा उपद्रव आहे की नाही हे प्रत्येक वर्षी तपासावे. त्यासाठी अंजिराच्या मुळ्यांची तपासणी करावी तसेच माती परीक्षण करून घ्यावे.
- अंजीर बागेत सतत ओलावा राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पाण्याचा अतिरेकी वापर टाळावा.
- बागेच्या पश्चिमेस व उत्तरेस वारा प्रतिबंधक झाडे उदा. सुरू, निरगुडी, तुती, करंज, शेवगा, हादगा, पांगारा, बकाना इ. लागवड करावी.
- अंजीर फळांचा टिकाऊपणा वाढविण्याकडे विशेष लक्ष द्यावे. त्याकरिता खतांची संतुलित मात्रा द्यावी. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरदेखील महत्वाचा आहे. उदा. जर फळे भेगाळत असतील तर ३० ते ५० ग्रॅम बोरॉन प्रति झाड द्यावे.
- फळे वाढीच्या काळात चार ते पाच वेळा चाळणी करण्याची पद्धत आहे. चाळणीनंतर गरजेनुसार खतांचा पुरवठा करून बागेस पाणी देण्यात येते. त्यामुळे फळांचे आकारमान सुधारते व चांगल्या प्रतीची फळे मिळतात.
- कीडग्रस्त फांद्या, बांडगूळ, खोडे कीडग्रस्त असल्यास वेळोवेळी काढून नष्ट कराव्यात.
- खोडकिडीच्या व्यवस्थापनासाठी झाडाची खोडे जमिनीपासून २ ते २.५ फुटापर्यंत मोकळी करावीत व खोडावर गेरूची पेस्ट लावावी. याकरिता १० लिटर पाण्यात ०४ किलो गेरू रात्रभर भिजत घालावा. दुसऱ्या दिवशी त्यात कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम व क्लोरपायरीफॉस ५० मिली मिसळून झाडाच्या खोडावर मुलामा द्यावा.
- अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके संशोधन प्रकल्प
जाधववाडी, पुणे