तेलाचे उत्पादन वाढवून स्वयंपूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय तेलबिया मिशन हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा आहे.
शेतकऱ्यांच्या शेतावर राबविलेल्या आद्यरेषीय प्रात्यक्षिकावरून असे दिसून आले की, सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे पारंपारिक पद्धतीपेक्षा १८ ते ४५ टक्के अधिक उत्पादन मिळते आहे म्हणून त्या क्षेत्रात अधिक उत्पादन व अधिक फायदा मिळविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे.
१) खत मात्रा
सूर्यफूल पीक रासायनिक खतास चांगला प्रतिसाद देते. सूर्यफुलच्या भरघोस उत्पादनासाठी कोरडवाहू पिकास ५० किलो नत्र (१०८ किलो युरिया), २५ किलो स्फुरद (१५६ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) व २५ किलो पालाश (४२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी द्यावे. सर्व खते पेरणीच्या वेळेस दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावीत. बागायती सूर्यफूल पिकास प्रति हेक्टरी ६० किलो नत्र (१२९ किलो युरिया), ३० किलो स्फुरद (१८८ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) व ३० किलो पालाश (५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी द्यावे. नत्र खत दोन हफ्त्यात विभागून द्यावे. नत्राची अर्धी मात्रा ३० किलो पेरताना द्यावी व उरलेले ३० किलो नत्र पेरणीनंतर ३० दिवसानी द्यावे.
२) आंतरपीक
आंतरपीक पद्धतीमध्ये दोन पिके वेगवेगळ्या कालावधीत तयार होणारी असतात. एका पिकाचे नुकसान झाले तरी दूसऱ्या पिकापासून काहीतरी उत्पादन मिळते म्हणून सलग पीक लागवडीपेक्षा आंतरपीक फायदेशीर आहे. आंतरपीक किंवा मिश्रपिकांमुळे शेतकऱ्यांच्या विविध गरजा उदाहरणार्थ नगदी, तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य, जनावरांसाठी चारा, जळणाकरिता इंधन इत्यादी गरजा भागविल्या जातात. खरीप हंगामात दोन ओळी सूर्यफूल + एक ओळ तूर (२:१) ही आंतरपीक पद्धत फायदेशीर आहे. भुईमुगाच्या पिकात आंतरपीक घ्यावयाचे झाल्यास भुईमूग सूर्यफूल (६:२) ही आंतरपीक पद्धत फायदेशीर आहे.
३) विरळणी व आंतर मशागत
सूर्यफूल पिकाची चांगली वाढ होण्यासाठी तसेच अन्नद्रव्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी विरळणी करून झाडाची योग्य संख्या ठेवणे महत्वाचे आहे. पेरणीनंतर १५ ते २० दिवसाच्या आत विरळणी करावी. विरळणी करताना ३० से.मी. अंतरावर एक जोमदार रोप ठेऊन विरळणी करावी तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पेंडीमेथिलीन (३० टक्के ईसी) हे तणनाशक २५ ते ३० मि.लि. प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे पेरणीनंतर परंतू पीक उगवण्यापूर्वी फवारणी घ्यावी. गरजेनुसार पिकाची खुरपण करून शेत स्वच्छ ठेवावे. पेरणी नंतर तिसऱ्या आठवड्यात पहिली कोळपणी आणि पाचव्या आठवड्यात दुसरी कोळपणी करावी. कोळपणीमुळे जमिनीवर मातीचे आच्छादन तयार होते व जमिनीच्या भेगावाटे ओलाव्याचे होणारे बाष्पीभवन रोखले जाते व हा ओलावा पिकाच्या वाढीसाठी उपयोगी पडतो.
४) संरक्षित पाणी देणे
सूर्यफुलापासून अधिक उत्पादन मिळण्यासाठी पाणी उपलब्ध असल्यास गरजेनुसार पिकाच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत संरक्षित पाणी द्यावे. सूर्यफूल पिकाच्या रोप अवस्था, फुलकळी अवस्था, फुलोरा आणि दाणे भरण्याची अवस्था या संवेदनशील अवस्था असून या अवस्थेत पिकास गरजेनुसार पाणी द्यावे. फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास त्याचा दाणे भरण्यावर अनिष्ट परिणाम होऊन पर्यायाने उत्पादन घटते. पीक फुलोरा अवस्थेत असताना तुषार सिंचन करू नये.
५) परागीभवन
सूर्यफूल हे पीक परपरागसिंचित असल्यामुळे दाणे भरण्यासाठी कृत्रिम परागीभवन घडवून आणणे महत्वाचे आहे. त्यासाठी शक्य असल्यास तळ हाताला तलम कापड गुंडाळून रोज सकाळी ७ ते ११ या वेळेत एक दिवसाआड असे ३ ते ४ वेळा फुलावरून हलकासा हात फिरवावा किंवा परागीभवनासाठी प्रति हेक्टरी ४ ते ५ मधमाशाच्या पेट्या ठेवाव्यात. मधमाशा मध गोळा करताना फुलावर बसतात त्यामुळे त्यांच्या शरिराला चिकटलेल्या परागकणाद्वारे परागीभवन घडून येते. पर्यायाने उत्पादनात वाढ होते.
६) बोरॉनची फवारणी
सूर्यफुलाचे पीक फुल उमलण्याच्या अवस्थेत असताना २० ग्रॅम बोरॅक्स प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. त्यामुळे दाणे भरण्याचे प्रमाण वाढून उत्पादनात वाढ होते.