शेतकरी बंधूंनो, मागच्या भागात आपण आनंदानं जगताना कुठले मुद्दे महत्त्वाचे असतात, त्याची तोंडओळख करून घेतली. आता त्यासाठी प्रत्यक्ष कृती कशी करायची ते पाहू यात.
रोजच्या जगण्यात निवांत राहा, रिलॅक्स राहा. खूप काळजी, खूप धावपळ, खूप दगदग करू नका. आजची नवीन पिढी ज्यापद्धतीने धावताना दिसते, तशी धावपळ टाळलेली बरी. किंवा गरजेसाठी करावी लागली, तरी जीवनशैली त्याप्रमाणे ठेवायला हवी. रात्री उशिरापर्यंत जागरण करणे, जंकफूड खाणे, व्यायाम न करणे किंवा अति व्यायाम करणे, अनियमित जेवणाच्या वेळा यातून त्यांच्या आयुष्यात तणाव वाढतो. माझ्या पाहण्यात एक तरुण आला. वयाच्या अडतीसाव्या वर्षीच त्याचा हार्ट अॅटॅकने मृत्यू झाला होता. याचे कारण म्हणजे अनियमित आहार आणि चुकीची जीवनशैली. अनेकदा तरुण रात्री उशिरा जागतात आणि सकाळी जीममध्ये जाऊन व्यायाम करतात. त्यातून मग एखाद्याला हार्ट अॅटॅक येण्याचीही बळावते. मी डॉक्टर झालो आणि मेडिकल कॉलेजमध्ये काम करायचो, तेव्हा मधुमेह किंवा हृदयरोगाचा रुग्ण दुर्मिळ असे. पण आता मात्र तरुणांमध्येही हृदयरोग किंवा मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. आमच्या वैद्यकीय भाषेत या आजारांना ‘लाईफ स्टाईल डिसआॅर्डर्स’ म्हणजेच चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे आजार असे म्हणतात. म्हणून योग्य जीवनशैली आणि निवांत जगण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
प्रसिद्ध गायक रफी यांनी गायलेलं गाणं आहे, ‘ मन रे तू काहे ना धीर धरे...’ जीवनाचा अर्थ समजून घेताना आपण काय केला पाहिजे हे त्यातून प्रतीत होतं. आजकाल त्याच्या उलट झालेलं आहे. कुणालाच धीर धरायला, थांबायला वेळ नाही. पैशांसाठी धावणे, मग त्यातून येणाऱ्या ताणतणावांवर उपाय म्हणून विविध व्यसनांचा आधार घेणं, आनंद मिळविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्टीकल्चरचा अंगीकार करणं, तिथे पुन्हा व्यसनं करणं इत्यादी पोकळ गोष्टींमधून संबंधित व्यक्तीला खरा आनंद मिळतो का? तर उत्तर आहे, नाही. कारण व्यसनांमधून काही क्षणाचा आनंद मिळाल्यासारखे वाटेलही कदाचित, पण तो काही शाश्वत आनंद नसतो. पार्टीतून घरी जाईपर्यंत कदाचित हा तथाकथित आनंदही नाहीसा झालेला असतो. मग संबंधित व्यक्ती पुन्हा आनंदाच्या शोधासाठी व्यसनाच्या आहारी जातो. त्यातून व्यसनं, जागरणं, वेळीअवेळी जेवण, जंकफूड, व्यायामाचा अभाव आणि ताणतणावांतील वाढ हेच पदरी पडतं आणि कालांतरानं आधुनिकतेच्या नावाखाली संबंधितांची हीच चुकीची जीवनशैली होऊन जाते.
आरोग्य पेरणी -शेतकरी मित्रांनो, तुमचं व्यक्तिमत्व कुठल्या प्रकारचं? जाणून घ्या रहस्य
छोट्या छोट्या कृतीतूनही आनंद शोधता येईल. एकदा बाजारपेठेत एका बॅँकेचे सेवानिवृत्त मॅनेजर मला भेटले. लगेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावर त्यांची प्रतिक्रिया होती की तुम्ही आज मला जो काही आनंद दिलाय ना तो शब्दात व्यक्त करता येण्यासारखा नाही. त्यांच्या या बोलण्यानं मलाही आनंद वाटला. मग मी त्यांना सहजच प्रश्न विचारला की तुम्ही सध्या काय करता? ते म्हणाले की निवृत्तीनंतर काहीच करत नाही. त्यावर मी त्यांना म्हणालो की एक सुचवू का? होतकरू तरुणांसह अनेकांना बॅँकेच्या कर्जाची आवश्यकता असते, पण त्यामागची प्रक्रिया तशी क्लिष्ट आणि दमवणारी असते. अशा लोकांना तुम्ही मार्गदर्शन का करत नाहीत? माझा हा सल्ला त्यांना आवडला. त्यांनी लवकरच एक सल्लाकेंद्र सुरू केलं.
त्यामुळं झालं असं की अनेक होतकरू तरुणांना, गरजूंना त्यांच्या सल्लयानं सुलभतेने कर्ज मिळाले. तर दुसरीकडे निवृत्तीनंतर त्यांचा वेळ आपल्या आवडत्या कामात चांगला जाऊ लागला. त्यातून त्यांना पैसा आणि आनंद दोघांची प्राप्ती झाली. दुसरीकडे मी त्यांना हा सल्ला दिल्यानं मलाही काहीतरी चांगले केल्याचा आनंद मिळाला होताच. आनंद हा काहीतरी देण्यातही असतो. त्यातूनही तुम्हाला तो मिळविता येतो. अनेक निवृत्त मंडळी आपल्याकडे आहेत की जे निवृत्तीनंतर स्वत:ला कुठल्यातरी कामात, वाचनात, छंदात गुंतवून न घेता नुसतेच जगत राहतात आणि भेटणाऱ्याकडे तब्येतीच्या तक्रारी करत राहतात. पण त्याऐवजी त्यांनी छोटी मोठ्या कामांत स्वत:ला गुंतवले तर नक्कीच त्यांना जीवनातला आनंद गवसेल.
आनंदासाठी काही जगावेगळं करायला नको. झाडांना पाणी घातलं, त्यांच्यावरून प्रेमानं हात फिरवला तर झाडे टवटवीत होतात. लहान मुलांच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवल्यावर त्यांचा चेहरा प्रसन्न होतो ना अगदी तशीच. बाजारातून भाजी आणणे, नातवंडांचा अभ्यास घेणे, त्यांना शाळेत सोडविणे, घरातली छोटी-छोटी कामे करणे यातूनही तुम्हाला आनंद मिळवता येतो. मी पुरुष आहे किंवा मी अमूक पदावर होतो आता मी ही कामं कशी करू?असं म्हणणं या ठिकाणी उपयोगाचं नाही. आनंद मिळवायचा ना? मग त्यासाठी तुम्हाला मोठेपणा आणि अहंपणा सोडायला हवा. ज्याक्षणी तुम्ही स्वत:कडे लहानपण घेतात त्याक्षणी आनंद तुमच्यापर्यंत चालत येतो. कारण संत तुकोबांनी म्हटलंच आहे, ‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा’.
आवडणाऱ्या गोष्टी करत राहाव्यात. शक्य झाल्यास कुठलातरी छंद जोपासावा. छंद अनेक आहेत. झाडांना पाणी देण्यापासून तर पुस्तके वाचण्यापर्यंत आणि एखादी कला शिकण्यापासून ते आपल्या आयुष्यातील अनुभवांवर पुस्तक लिहिण्यापर्यंत. असे विविध छंद जोपासता येतील. आज असे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत की ज्यांनी हार्मोनियम शिकणे, फोटोग्राफी करणे, बागकाम करणे असे अनेक छंद जोपासत आहेत. स्वत: आनंद मिळवत आहेत आणि इतरांनाही आनंद देत आहेत. अलिकडेच मी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान यांचा एक फोटो पाहिला. वयाच्या ८४ व्या वषी त्या आता वन्यजीव फोटोग्राफी करताना दिसतात. यावरून अनेकांना प्रेरणा घेता येईल.
उपयोगी असणारी कृती करूनही आनंद मिळविता येतो, मग घरातली छोटी-छोटी कामे असोत किंवा सामाजिक काम असोत. त्यातून निरपेक्ष आनंद आपल्याला मिळवता येतो. योगसाधना, प्राणायाम, व्यायाम यातूनही आपल्याला आनंद मिळवता येतो. त्यासाठी आपण वेळेचा योग्य उपयोग मात्र करायला हवा. प्रत्येकाच दिवसाचे 24तास मिळालेले असतात. त्यांचा योग्य वापर करायला आपण शिकले पाहिजे. कारण याच 24 तासांचा वापर करून कुणी साहित्यिक होतो, कुणी शास्त्रज्ञ होतो, तर कुणाला नोबेल पारितोषिक मिळते. मग आपल्यालाच का मिळू नये? याचं कारण असं आहे की जो त्यांना वेळ मिळाला आहे, तो त्यांनी त्यांच्या छंदात, काहीतरी नवनिर्मिती करण्यात उपयोगी आणलेला आहे.
त्यातून त्यांना आनंद मिळालेला आहे. सतत काहीतरी नवनिर्मिती करण्याचा आनंद, इतरांना मदत करण्याचा आनंद, सकारात्मक करण्याचा आनंद यामुळे मेंदूला उपयोगी अशी संप्रेरके तयार होतात. या संप्रेकांमुळच मनुष्यप्राणी दीर्घ कालावधीपर्यंत जगू शकतो. नेहमी आनंदी राहण्याने कोणते संप्रेरके तयार होतात ते आपण पाहू. सेरेटोनिन, जे तुम्हाला उत्तेजित करते, डोपामाईन, आॅक्सिटोसीन, एन्डॉर्फिन अशा संप्रेरकांचा त्यात समावेश होतो. आपल्या आनंदी जगण्यासाठी ही संप्रेरके निश्चितच आवश्यक आहे. त्यासाठी सतत काही ना काही चांगलं काम करत राहिलं पाहिजे. सुप्रसिद्ध पु. ल. देशपांडे यांचा एक दृष्टीकोन मला खूप भावला. ते सांगायचे की जगण्यासाठी जे काही करावं लागतं ते तर प्रत्येकानंच करायला हवं, पण त्यासोबतच संगीत, नाट्य, कला, साहित्य यांची जाण, दुसऱ्याला आनंद देण्याची जाण आणि स्वत:ला आनंद घेण्याची जाण या गोष्टीही जोपासायला हव्यात. त्यातूनच माणूस म्हणून आपण का जगावं? याचा अर्थ आपल्याला कळतो. जेव्हा हा अर्थ समजतो, तेव्हा आपल्याला आनंद मिळतो.
जास्त जगण्याची इच्छा असणं हे जरी खरं असलं, तरी त्यासाठी मनमानी पद्धतीने, चुकीच्या जीवनशैलीने जगणं योग्य होणार नाही. तर सक्रीय मन आणि तरुण शरीर याचाच त्यासाठी उपयोग होईल. आपल्या मेंदूत पिट्यूटरी नावाची एक छोटी ग्रंथी असते. तिच्यापासून कार्टिगोट्रॉफिन, अॅग्रीओअॅमिन, फोर्टीसॉल तयार होतात. ही सर्व संप्रेरके जीवघेण्या आजारांची निर्मिती करणारे आहेत. काळजी केल्यास, तणाव निर्माण झाल्यास, जीवनशैली बदलल्यास त्यांची निर्मिती होते. त्यातून आपले शरीर आजारांना बळी पडत जाते. त्यासाठी दर दिवाळीला आपण जशी घराची साफसफाई करतो, तशी आपल्या शरीराची आणि मनाचीही वाईट गोष्टीपासून सफाई करायला हवी, असे आपली संस्कृती सांगते. त्याचाही आपण विचार करायला हवा.
आपण पूर्णपणे आनंदी आहोत असा विचार करायला हवा. पैसा हे काही सर्वस्व नाहीये. एका माणसाला जगण्यासाठी असा किती पैसा लागतो? म्हणून पैशामागे धावणे योग्य नाही. त्यातून आनंद आणि समाधान मिळेलच याची शाश्वती नाही. यावर उदाहरण म्हणून ‘सुखी माणसाचा सदरा शोधणाऱ्या राजाच्या गोष्टीचे’ देता येईल. सुखी माणसाचा सदरा शोधणाऱ्या या राजाला खरा आनंद प्रत्यक्षात एका गरीब, कष्टकरी मजूरात गवसला होता. यावरून पैसा आणि आनंद यांचा एकमेकांशी काही संबंध नाही हेच स्पष्ट होतं.
जीवनशैलीच्या आणखी काही गोष्टी आपण समजावून त्यांचा अंगीकार केल्यास जगण्यातला आनंद वाढू शकतो. भूक नसताना खाणं हा एक मानवाचा आणखी एक दुर्गुण आहे. त्यातूही आपल्याला अनेक प्रकारचे आजार होत असतात. संशोधन असं सांगतं की आपण जसजशी चाळीशीकडे वाटचाल करू लागतो, तसतसे अनेक आजार आपल्यामागे लागायला सुरूवात होते. मधुमेह, थॉयरॉईड, पॅरालिसिस, हृदयरोग असे रोग चाळीशीनंतर आपल्या जणू प्रतीक्षेतच असतात. पण त्यावर मात कशी करायची ते आपल्या हातात असतं. चाळीशी ओलांडत असताना आपण रोजच्या आहाराच्या गरजेच्या केवळ तीन चतुर्थांश भागच अन्न ग्रहण करायला हवं. एक भाग कुणालातरी दान करायला हवा अशी भावना ठेवायला हवी.
त्यातून तुम्हाला अॅसिडीटी, लठ्ठपणासारखे आजार तर होत नाहीतच, पण शरीराची जी ‘डिमांड’ करण्याची वृत्ती असते, तीही कमी होण्यास त्यातून मदत होते. कारण अशा प्रकारचा संयमित आहार घेण्याची तुमच्या मेंदूलाही सवय झालेली असते. अरबट चरबट न खाणे, हिरव्या भाज्यांचा जेवणात समावेश करणे, ग्रीन टी पिणे, वेळेवर नाश्ता आणि जेवण करणे, निसर्गाच्या सान्निध्यात राहणे, सात ते आठ तास निवांत झोपणे, जेवण घेताना लहान प्लेटमधून घेणे, मोठ्या प्लेटमधून जास्तीचे अन्न न खाणे इत्यादी गोष्टींचा अंगीकार करायला हवा. मनुष्याला जगण्यासाठी रोज केवळ अठराशे ते एकोणिसशे कॅलरीची आवश्यकता असते. तेवढेच अन्न आपण ग्रहण करायला हवे. याशिवाय तुमचा बीएमआय म्हणजेच बॉडी मास इंडेक्स (उंची आणि वजनाच्या गुणोत्तराचा निर्देशांक) हा १८ ते १९ किंवा जास्तीत जास्त २० पर्यंत असावा. त्यापेक्षा जास्त असू नये.
चांगले मित्र जोडा. ज्यांची तुमच्याकडून आणि तुमची त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा नसेल. मात्र तुमच्याशी ते चांगला संवाद साधतील, तुम्हाला समजून घेतील. अशा मित्रांशी हास्य विनोद, गप्पा टप्पा करणे यातूनही आनंद वाढतो. जो तुमच्या जीवाला जीव लावतो तो तुमचा खरा मित्र. तुम्हाला पार्टी देतो किंवा तुमच्याकडून पार्टी घेतो, तो नव्हे. असे जीवाला जीव लावणारे मित्र जपणे आवश्यक आहे. त्यातून तुम्हाला आनंद मिळतो. केवळ मनुष्यच नव्हे, तर प्राणी किंवा पुस्तकेही तुमचे चांगले मित्र होऊ शकतात. आयुष्यात दोन मित्र असे आहेत की ते तुमची साथ कधीच सोडत नाही. पहिला आहे तुम्ही पाळलेला कुत्र्यासारखा इमानी प्राणी आणि दुसरा मित्र म्हणजे चांगली पुस्तके. हे शेवटपर्यंत तुम्हाला कुठलीही अपेक्षा न करता साथ देतात आणि आनंदही देतात. त्यामुळे शक्य झाल्यास प्रत्येकाने या दोन्ही मित्रांची संगत अवश्य जपली पाहिजे, जोपासली पाहिजे. टीव्ही किंवा मोबाईलमधून आनंद शोधण्याऐवजी चांगली पुस्तके वाचणे केव्हाही श्रेयस्कर.
पुढच्या वाढदिवसाला काय करायचं? याचे नियोजन आताच करा. किंवा वर्षभराचे नियोजन आताच करा. त्यातून तुम्हाला जगण्याची दिशा आणि प्रेरणा मिळेल. मोबाईलपासून शक्य तेवढे लांब राहण्याचा प्रयत्न करा. रोज नियमितपणे व्यायाम करा. किमान पंधरा मिनिटे किंवा अर्धा तास चालण्यासारखे व्यायाम किंवा योगासने करणे आवश्यक आहे. वर्षभराच्या नियोजनात एखादी कला किंवा वादय वर्षभरात अवश्य शिका. एखादं पुस्तक लिहा आणि ते प्रकाशित करा. चांगलं संगीत ऐका किंवा स्वत: ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. अशा लोकांना स्मृतीभ्रंश होण्याची शक्यता कमी असते. तसेच महिला असेल, तर त्यांच्यात रजोनिवृत्तीच्या वेळेस होणारे त्रास होण्याची शक्यता कमी होते.
याशिवाय निसर्गाशी नाते जोडायला पाहिजे. अधूनमधून बाहेर फिरायला जाणे, जंगलात जाणे, पर्यटनस्थळी जाणे, कुणा मित्राच्या घरी शेतात जाणे, तिथे जेवण करणे किंवा त्याच्याशी गप्पा मारणे अशा गोष्टी अवश्य करा. नदी, नाले, पर्वत, दऱ्या, समुद्र यांच्या जास्तीत जास्त सहवासात राहण्याचा प्रयत्न करा. एखाद्या चांगल्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करा. धन्यवाद देण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुमचे पाय नेहमी जमिनीवर राहतील आणि तुम्ही फुकटच्या अहंकारापासून दूर राहाल. त्यातून दुसऱ्याला आनंद मिळेल आणि आपल्यालाही आनंद घेता येईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्तमानात जगा ! प्रत्येकाच्या आयुष्यात भूतकाळात अनेक कटू गोष्टी होऊन गेलेल्या असतात. त्यांना पुन्हा पुन्हा आठवले किंवा भविष्याची काळजी केली तर आपल्याला डिप्रेशन येऊ शकते.
आजकाल अनेक रुग्णांना आम्हाला अॅन्टीडिप्रेसन्ट (नैराश्यावरील औषध) द्यावं लागतं. त्याचं मूळही पुन्हा आजच्या जीवनशैलीशीच जोडलेले आहे. ज्येष्ठाना सांगेन की तुमचे आयुष्य बोनस आहे, कुठलीही काळजी किंवा आठवणी न जागवता ते जगा, तर तरुणांना मी सांगेन की तुमच्या हातात केवळ तुमचा वर्तमान आहे. तो चांगला घडविण्याचा प्रयत्न करा. भविष्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही. स्वत:ला, मित्राला किंवा समाजाला त्रास देऊन तुमचं भविष्य किंवा करिअर घडणारे नाही. म्हणून प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यासाठी कसा देता येईल याचा प्रयत्न करा.
प्रत्येकाच्या आत एक उपजत प्रेरणा असते. तुम्ही आनंदाने जगलात, तर ती प्रेरणा तुम्हाला नक्कीच उर्जा देईल. मग त्यासाठी ‘ना उम्र की सीमा हो.. ’ या गझलमध्ये सांगितल्यानुसार वयाचं बंधन पाळण्याची आवश्यकता नाही. म्हणूनच स्वत:चा आनंद शोधा आनंदी व्हा !
-डॉ. अशोक वासलवार, चंद्रपूर
ashok50wasalwar@gmail.com
(लेखक असोसिएशन ऑफ फिजिशीयन्स ऑफ इंडिया, विदर्भचे पूर्वाध्यक्ष आहेत.)