Join us

हळद पिकासाठी खतांचे डोस कसे द्याल वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 12:59 PM

हळद पिकांस सेंद्रिय खतांचा भरपूर पुरवठा केल्यास भरपूर उत्पादन मिळते. त्यासाठी हेक्टरी ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत लागवडीपूर्वी पूर्वमशागतीच्यावेळी जमिनीत टाकून चांगले मिसळावे.

हळद पिकांस सेंद्रिय खतांचा भरपूर पुरवठा केल्यास भरपूर उत्पादन मिळते. त्यासाठी हेक्टरी ३५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत लागवडीपूर्वी पूर्वमशागतीच्यावेळी जमिनीत टाकून चांगले मिसळावे. शेणखतामुळे गड्ड्यांची चांगली वाढ होते. रोग किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.

पुरेसे शेणखत उपलब्ध नसल्यास इतर सेंद्रिय निविष्ठांचा अवलंब करावा. घनजीवामृत (९० टक्के शेण १० टक्के मूत्र) दोन दिवस सावलीत व उन्हात वाळवावे. हेक्टरी १५ टन वापरावे.

रासायनिक खतांमध्ये हळद पिकांस १.०० हेक्टर क्षेत्रासाठी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश द्यावे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्यावेळी द्यावे. नत्र मात्र २ हप्त्यात विभागून द्यावे.

नत्राचा पहिला हप्ता (१००.०० किलो नत्र) लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावे त्यासोबत फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट प्रत्येकी १२ किलो द्यावे, तर राहिलेला दुसरा हप्ता (१००.०० किलो नत्र) भरणीच्यावेळी (लागवडीनंतर २.५ ते ३ महिन्यांनी) द्यावा.

तसेच भरणीच्यावेळी हेक्टरी २.० टन निंबोळी किंवा करंजी पेंडीचा वापर करावा आणि त्यासोबत पुन्हा फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट प्रत्येकी १२ किलो द्यावे.

थोडक्यात १.०० हेक्टर क्षेत्रासाठी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद आणि १०० किलो पालाश उपलब्ध होण्यासाठी ८.०० ते ९.०० बॅग्स युरीया, १२.५० बॅग्स सिंगल सुपर फॉस्फेट आणि ३.५० बॅग्स म्यूरेट ऑफ पोटॅश देणे आवश्यक आहे.

फर्टिगेशनसिंचन सुविधा उपलब्ध असल्यास केवळ रूंद वरंबा पध्दतीनेच हळद लागवड करावी. हळदीचे जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा वापर केल्यास पिकाच्या गरजेनुसार खते देता येतात. त्यासाठी जमिनीचे माती परीक्षण करूनच विद्राव्य खतांचा वापर करावा.

एखादा अन्नघटक शिफारशीत प्रमाणापेक्षा अधिक अथवा कमी पडला तरी त्याचा परिणाम लगेचच पिकाच्या वाढीवर झालेला दिसून येतो. उदाहरणार्थ हळदीला नत्र घटक जास्त झाल्यास हळदीची शाकीय वाढ खूप जास्त होते आणि हळद काडावरती जाते.

हळद हे कंद वर्गीय पिक असल्याने हळदीला जेवढे अधिक फुटवे येतील तेवढे कंदाचे वजन वाढेल परिणामी कंद मोठा होऊन उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. फर्टिगेशन करताना प्रामुख्याने युरिया, फॉस्फरीक अॅसिड आणि पांढरा पोटॅशचा वापर करावा.

हळद पिकात फर्टिगेशनची सुरूवात हळद लागवडीनंतर १५ दिवसांनी करावी. जमिनीद्वारे द्यावयाची खतांची मात्रा आणि फर्टिगेशनद्वारे द्यावयाची खतांची मात्रा वेगवेगळी आहे.

अधिक वाचा: आडसाली ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी ह्या आहेत महत्वाच्या पाच टिप्स.. वाचा सविस्तर

टॅग्स :पीकशेतकरीशेतीखतेसेंद्रिय खत