Join us

कमीत कमी जागेत घरच्या घरी भाजीपाला कसा पिकवाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 11:27 AM

जेथे शक्य असेल तेथे चरच्या घरी बागेत थोडासा भाजीपाला, काही निवडक फळझाडे आणि शोभेची व फुलांची झाडे लावण्याचा प्रयत्न करणे आज काळाची गरज आहे. आपण आपल्या परसबागेत शास्त्रोक्त पद्धतीने भाजीपाला लागवड केल्यास स्वतःच्या मेहनतीने तयार केलेल्या भाज्या खाताना एक वेगळाच आनंद मिळेल.

हल्लीच्या काळात परसबागेचे स्थान अत्यंत महत्वाचे होऊन बसले आहे. जेथे शक्य असेल तेथे चरच्या घरी बागेत थोडासा भाजीपाला, काही निवडक फळझाडे आणि शोभेची व फुलांची झाडे लावण्याचा प्रयत्न करणे आज काळाची गरज आहे. आपण आपल्या परसबागेत शास्त्रोक्त पद्धतीने भाजीपाला लागवड केल्यास स्वतःच्या मेहनतीने तयार केलेल्या भाज्या खाताना एक वेगळाच आनंद मिळेल. शिवाय चरातील सर्व लोकांना आरोग्य चांगले ठेवण्यास पण मदत होईल.

परसबाग (पोषणबागेचे) महत्व• कुटूंबातील माणसांना ताजा, सकस आणि किडनाशकांपासून मुक्त असा भाजीपाला सतत वर्षभर मिळतो.• पर्यावरण शुद्ध राहते.• आपल्याला निसर्गाचे सानिध्य लाभते.• बागेत काम केल्याने शारिरीक व बौध्दिक व्यायाम होतो परिणामी आरोग्य टिकून राहण्यास मदत होते.• परसबागेमुळे फळे आणि भाज्यांसाठी होणाऱ्या दैनंदिन खर्चात बचत होऊन जादा असलेली भाजी विकून पैशाची कमाई होऊ शकते.• परसबागेमुळे घराशेजारील रिकाम्या जागेचा सांडपाण्याचा, घरातील केरकचऱ्याचा चांगला उपयोग करून घेता येतो. त्यामुळे घराभोवतालचे वातावरणही शुद्ध राहण्यास मदत होते.• ताजी भाजी खाण्याचा आनंद मिळतो.• घराजवळ परसबाग असेल तर मुलांनाही नैसर्गिक सौंदर्याची जाण होऊन बागकामाची आवड निर्माण होते.• परसबागेमुळे घराचे सौंदर्य वाढण्यास मदत होते शिवाय मनाचा ताण कमी होऊन मनशांतीही लाभते.• सध्याच्या धावपळीच्या जीवनात आणि प्रदूषणाने वेढलेल्या वातावरणात प्रकृतीचा समतोल ढळून चरबी वाढणे, रक्तदाब, मधुमेह, हृद्यरोग, कॅन्सर यासारखे आजार वाढीस लागले आहेत. त्यामुळे घरच्या घरी जर सेंद्रिय परसबाग केली तर निरोगी व ताजी किटकनाशके विरहीत भाजी मिळाल्याने आपल्या कुटूंबियांचे आरोग्यही चांगले राहील.

परसबागेसाठी जागेची निवडपरसबागेसाठी जागेची निवड करताना तसा फार थोडा वाव असतो. रहात्या जागेभोवती, मागे, बाजूला, पुढे मिळेल त्या जागेत आपल्याला त्या जागेचा शक्य होईल तेवढ्या भागाचा वापर करून भाजीपाला, शोभेची, फुलांची, औषधी वनस्पतींची आणि निवडक फळझाडांची आखणी करावी लागते. परसबागेसाठी निवडलेल्या जागेत भरपूर सुर्यप्रकाश आणि मोकळी हवा उपलब्ध असावी. या शिवाय ही जागा मोठ्या झाडांपासून दूर असावी. परसबागेसाठी जागेची निवड करताना जमिनीची सुपिकता, संरचना व पाण्याचा निचऱ्याची व्यवस्था या गोष्टी लक्षात घ्याव्यात पाणी पुरेसे प्रमाणात उपलब्ध असल्यास वर्षभर भाजीपाला पिके घेता येतात.

परसबागेची आखणीपरसबागेची आखणी करताना बागेचे क्षेत्रफळ विचारात घ्यावे लागते. बंगले व इमारती यांच्याभोवती बाग असल्यास त्यात वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे हंगामी फुलझाडांचे वाफे वेलीकरिता मांडव, फळझाडे, भाजीपाला, हिरवळ व शोभेचे कुंपण या सर्वांचा समावेश करता येतो. २००० ते २५०० चौ. फूट मोकळ्या जागेतून पाच माणसांच्या कुटूंबास वर्षभर भाजीपाला मिळू शकतो. जागा मोठी असल्यास बागेच्या उत्तरेकडील बाजूला पपई, केळी, लिंबू, कढीपत्ता, शेवगा, पेरू, नारळ, चिकू, संत्री, सिताफळ यासारखी उंच फळझाडे लावावीत. यामुळे झाडांची सावली भाजी पिकावर पडणार नाही.

परसबागेतील उपलब्ध जागेचा पूर्णपणे लाभ घेण्यासाठी वेलवर्गीय भाज्या कुंपणावर, भिंतीवर किंवा गच्चीच्या कठड्यावर चढवाव्या. लहान अथवा मध्यम आकाराच्या परसबागेत बटाटे, रताळी, सुरण यासारखी जास्त काळ जमिनीत वाढणारी पिके घेऊ नयेत. लहान पोषण बागेत कमी कालावधीच्या पालेभाज्यांना प्राधान्य द्यावे. कमी कालावधीत वाढणारा मुळा, चवळी, मेथी, पालक या भाज्या एका वाफ्यात ओळीमध्ये लावाव्यात.

अधिक वाचा: कोथिंबीरीपेक्षा धण्यात मिळतोय जास्त नफा, कशी कराल धणे लागवड

परसबागेचा आराखडा कसा कराल?१) उत्तरेच्या बाजूस वेलवर्गीय पिके घ्या.२) एकाच कुळातील पिके शेजारी शेजारी घेऊ नका.३) पालेभाज्या शेजारी फळभाज्या असा क्रम ठेवा.४) मिरची, बटाटा, टोमॅटो, ढोबळी, वांगी ही पिके शेजारी घेऊ नका.५) दोडका, घोसाळी, काकडी ही पिके शेजारी घेऊ नका.६) झेंडू, तुळस, मका या सापळा पिकांचा समावेश करा.७) द्विदल पिकांनी फेरपालट करा.८) परसबागेत रंग सापळा कामगंध सापळे व विजेचे सापळे लावा.९) फळझाडे पश्चिमेस लावा.

परसबागेतील भाज्यांचे प्रकार■ फळभाज्या : टोमॅटो, वांगी, मिरची, ढोबळी मिरची, भेंडी■ मूळभाज्या : मुळा, गाजर, बीट, रताळी■ पालेभाज्या : पालक, मेथी, कोथिंबीर, पुदिना, अंबाडी, चाकवत, घोळ, लेट्युस, राजगिरा, शेपू■ कोबीवर्गीय भाज्या : फुलकोबी, पानकोबी, नवलकोल, लेट्युस■ कंदवर्गीय भाज्या : बटाटा, कांदा, लसूण, बीट, गाजर, मुळा■ शेंगवर्गीय भाज्या : श्रावण घेवडा, चवळी, गवार, वाल, पावटा, वाटाणा, शेवगा इ.■ विलायती भाज्या : ब्रोकोली, पार्सली, अॅस्परागस, लेट्युस■ वेलवर्गीय भाज्या : दुधी भोपळा, कारली, दोडका, गिलके, लाल भोपळा, तोंडली, पडवळ■ औषधी व सुगंधी वनस्पती : पुदिना, कढीपत्ता, गुळवेल, गवती चहा, शतावरी, तुळस■ फुलझाडे : झेंडू, गुलाब, मोगरा, शेवंती

परसबागेतील खत व्यवस्थापनपरसबागेतील भाजीपाला, फळझाडे, फुलझाडे यांच्या सर्वांगीण वाढीसाठी योग्य प्रमाणात पोषक द्रव्याची गरज असते. काही पोषक द्रव्ये झाडांना हवेतून आणि पाण्यातून मिळतात. जमिनीमध्ये कमी पडणारी पोषकद्रव्ये ही खतांच्या माध्यमातून पुरविली जातात. खतांची गरज ही निवडलेले पीक, जमिनीचा प्रकार, पाण्याची सोय, खत देण्याची पद्धत या गोष्टींवर अवलंबून असते.

खतांचे प्रामुख्याने चार प्रकार पडतात१) सेंद्रिय खत २) हिरवळीचे खत ३) जैविक खत ४) रासायनिक खत.परसबागेत खतांचा वापर करताना रासायनिक खतांचा वापर न करता जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करावा. रासायनिक खते ही आपल्याला विकत घ्यावी लागतात व ती महाग असल्यामुळे जास्त पैसे खर्च होतात इतर खतांच्या तुलनेत पिकासाठी सेंद्रिय खत जास्त फायद्याचे आहे. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीतील सूक्ष्म जिवाणूंची संख्या व कार्यक्षमता वाढली जाऊन अन्नद्रव्यांचे सेंद्रिय स्वरूपात रूपांतर होऊन ते पिकांना आवश्यकतेनुसार उपलब्ध होतात.

आपण साधारणपणे सेंद्रिय खते म्हणून शेणखत, गोबरगॅस, कंपोस्ट खत, गांडूळखत, लेंडीखत, मूत्रखत, कोंबडीखत, मासळीचे खत, कत्तल खान्यातील गळाटा, रक्तखत (ब्लडमिल), हाडांचे खत (बोनमिल), हॉर्नमिल, हेअरमिल, शहरातील कचऱ्यांचे कंपोस्ट इत्यादींचा वापर करतो. हिरवळीच्या खतांमध्ये ताग, धैंचा, गिरीपुष्प, अॅझोला, लसूण घास, द्विदल वर्गीय कडधान्याची पिके तर जैविक खतामध्ये रायझोबियम, अॅझोटोबॅक्टर अशा जैविक खतांचा वापर करावा.

परसबागेसाठी किटकनाशकेसेंद्रिय परसातील किडींचे नियंत्रण करण्यासाठी किटकनाशके घरीच तयार करता येतात. ही किटकनाशके सर्व प्रकारच्या किटकांकरिता उपयोगी पडतात. सेंद्रिय किटकनाशकांमध्ये निमार्क, दशपर्णी अर्क तसेच सापळा पिके, फेरोमेन सापळे, चिकट सापळे, चुलीतील राख, जैविक किटकनाशकांमध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोनास अशा किटकनाशकांचा उपयोग फायदेशीर ठरतो.

- सौ. निवेदिता प्रशांत शेटेगृहविज्ञान विषयतज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव (पुणे)

टॅग्स :भाज्याशेतीशेतकरीसेंद्रिय खतपीकपीक व्यवस्थापनकृषी विज्ञान केंद्र