साधारणपणे केळी लागवडीपासून ३५ ते ४० आठवड्यात निसवते व त्यांनतर घड तयार होण्यास १२ ते १६ आठवड्यांचा कालावधी लागतो. मृग बागेची केळी घड निसवल्यानंतर ९० ते १०० दिवसांत तर कांदेबाग केळी १२०-१४० दिवसांत पक्क होतात.
लांबच्या बाजारपेठेसाठी ७५-८० टक्के पक्कतेच्या तर जवळच्या बाजारपेठेसाठी ८५-९० टक्के पक्कतेच्या केळीची कापणी करावी. उती संवर्धित केळी बाग १२ महिन्यात काढणीस तयार होते. फळ पक्व झाल्यांनतर टिचकी मारल्यास धातू सारखा टनटन आवाज येतो.
फळे साधारणपणे पूर्ण पक्कतेला आल्यावर काढावीत परंतु परदेशी निर्यात करण्यासाठी किंवा साठवण जर जास्त दिवस करावयाची असेल तर ही परिपक्वतेची फळे काढणीसाठी योग्य असतात. फळधारणेपासून दिन उष्मांक मोजमाप करून किंवा फळांचा आकार पाहून केळींची पक्कता ठरविता येते. फळे पूर्ण गोलाकार झाल्यास पूर्ण परिपक्कता झाली असे समजावे.
झाडावरून घड उतरणीचे काम सकाळी किंवा संध्याकाळी करावे. भर दुपारच्या उन्हात फळे काढणी केल्यास उष्णतेचा परिणाम फळांच्या साठवणूकीवर होऊ शकतो. घड काढताना केळीच्या सालीला धक्का लागणार नाही याची दक्षता घ्यावी.
कच्च्या केळी खूप कडक वाटत असल्या तरी त्या खूपच नाजूक असतात. सालीवर खरचटल्यास आपल्याला कच्च्या हिरव्या केळींवर डाग दिसत नाहीत. परंतु केळी पिकल्यावर काळे डाग पडतात व केळींची विक्री योग्यता कमी होते.
तसेच घड झाडावरून उतरवताना कापलेल्या भागातून निघणारा चिक फळावर पडल्यास फळांना डाग पडतात. यामुळे फळांना भाव कमी मिळतो अशी केळी निर्यातीस अयोग्य होतात. म्हणून घड काढताना दोन व्यक्तिंनी व्यवस्थितरित्या घड कापून खाली न ठेवता वरच्यावर घड धरावा.
घडाचा दांडा वरच्या फणीपासून ३० सेमी. लांब कापावा व त्यामुळे घड हाताळताना हा दांडीचा भाग पकडता येतो. घडांची हाताळणी काळजीपूर्वक करावी. घड ओव्हरहेड रोलिंग पध्दतीने पॅकिंगसाठी आणले जातात. ज्या ठिकाणी आधुनिक स्वयंचलित यंत्रसामुग्री नाही अशा ठिकाणी ट्रॅक्टर ट्रॉलीला हँगर अडकवून घडांची वाहतूक अलगदपणे करता येते.
केळी घडाची काढणी करताना खालील बाबींचा प्रामुख्याने विचार करावा
■ घडातील सर्व फण्या चांगल्या आकाराच्या असाव्यात. वेड्या वाकड्या फण्या नसाव्यात.
■ प्रत्येक फणी साधारण १५०० ग्रॅ. पेक्षा जास्त वजनाची असावी.
■ केळीचा घड काढणीस तयार (पक्व) झाला असल्याची खात्री करावी.
■ फळांचा रंग हिरवट पोपटी असावा व तो सर्व फळांवर सारखाच असावा.
■ फण्यातील केळी शक्यतो सरळ सारख्या आकाराची असावीत.
■ केळी फळावरील शिरा जाऊन फळांना गोलाई येते ती काढणीची योग्य अवस्था आहे.