दिवसेंदिवस फळमाशी ही लिंबूवर्गीय फळांसाठी अधिक हानिकारक होत चालली आहे. लिंबूवर्गीय फळांच्या गळतीमध्ये फळमाशीची महत्वाची भूमिका आहे. यामुळे फळांची गळ होते व फळांचा दर्जा घसरतो आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील होते.
किडीची ओळखफळमाशी ही आकाराने ७ मिलिमीटर लांब असून ती घरमाशी (Housefly) एवढी असते. फळमाशीचे पंख पसरलेले असतात आणि तिला पंखाची एकच पारदर्शक जोडी असते. तसेच, तिचा जीवनक्रम चार अवस्थेमध्ये विभागलेला असतो, जसे अंडी, अळी, कोष आणि प्रौढ.
नुकसानीचा प्रकार- संत्र्याला नुकसान करण्यामध्ये प्रामुख्याने माशीची बाल्या अवस्था आणि प्रौढ मादी माशी यांचा महत्वाचा वाटा असतो.- प्रौढ मादी माशी पिकत असलेल्या फळांच्या सालीमध्ये आपली अंडनलिका टाकते आणि त्यामध्ये अंडे देते.- एक ते दोन आठवड्यामध्ये या अंड्यामधून अळी निघते आणि फळातील गर खाते आणि फळे सडतात.- त्याचवेळी फळांमध्ये जीवाणूंचे संक्रमण होऊन फळे जमिनीवर गळून पडतात. - ६ ते ७ दिवसानंतर ती अळी जमिनीमध्येच सुप्त अवस्थेमध्ये जाते आणि १४ ते १५ दिवसानंतर त्यामधून प्रौढ बाहेर पडतो आणि परत तो प्रौढ निरोगी फळांवर अंडे घालतो. असा त्याचा जीवनक्रम चालत राहतो.- फळमाशीने ग्रासलेली फळे जर हाताने दाबून बघितली तर त्यामधून रसाचे अनेक शिंपळे बाहेर पडतात कारण संपूर्ण फळ आतल्या बाजूने अळीने पोखरलेले असते.
फळमाशीच्या अंडी आणि अळी अवस्था फळांमध्ये आणि त्यांचा प्रौढ सतत उडण्याच्या अवस्थेमध्ये असल्यामुळे त्यावर किटकनाशकांची फवारणी करणे शक्य होत नाही आणि फळ पक्व अवस्थेमध्ये असतांना किटकनाशकांची फवारणी केली असता दुष्परिणाम दिसू शकतात.
फळमाशीचे व्यवस्थापन१) फळमाशी सापळे प्रति हेक्टरी २० ते २५ या प्रमाणात आंबिया बहारामध्ये जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फळे तोडणीला येण्याच्या अडीच ते तीन महिने आधीपासून झाडाला ३ मीटर उंचीवर लटकवून ठेवावे व प्रत्येक सापळ्यामध्ये ५० मीटर अंतर राहील याची काळजी घ्यावी.२) या सापळ्यामध्ये मिथाईल युजेनॉल नावाचे रसायन द्रव्य वापरले जातात. त्या द्रव्याला मादीमाशीचा गंध असल्यामुळे फळमाशीचे नर त्या सापळ्याकडे आकर्षित होतात आणि त्यात अडकले जातात. त्यामुळे त्यांच्या प्रजननाला आळा घालण्यास मदत होईल.३) फळमाशीचा जीवनक्रम खंडित करण्यासाठी नियमित बागेतील पडलेली फळे वेचून खोल खड्डा करून त्यामध्ये ती नष्ट करावीत.
फळमाशीचे सापळे कसे बनवाल?- फळमाशीचे सापळे आपण अगदीच कमी किमतीत घरगुती देखील बनवू शकतो त्यासाठी एक लिटर पाण्याच्या बाटलीला २ सेंटीमीटर (१ इंच) लहान असे सम अंतरावर ४ छिद्र करून घ्यावे जेणेकरून रसायनाचा गंध हवेव्दारे बाहेर पडेल आणि त्या वाटे फळमाशी सापळ्यात प्रवेश करेल.- बाटलीच्या झाकणाला छिद्र करून त्याला आतल्या बाजूने १ मि.ली. मिथाईल युजेनॉल मध्ये बुडवून घेतलेला गोळा अडकावा.- सापळ्यामध्ये अडकलेल्या फळमाशा हळूवार रासायनिक किटकनाशकांच्या द्रावणात टाकून नष्ट कराव्यात.- दर ३० ते ४० दिवसांच्या अंतराने सापळ्या मधील मिथेल युजेनॉलचा गोळा बदलावा.- या व्यतिरिक्त बाजारामध्ये देखील २० रूपये किंमती पासून ते ११० रूपये किंमती पर्यंत फळमाशी सापळे उपलब्ध आहेत ते देखील आपण वापरू शकतो.