जमिनीतील पाणी बाष्पीभवनाद्वारे झपाट्याने कमी होते. जमिनीतील ओलावा राखण्यासाठी प्लास्टिक आच्छादनाचा किंवा सेंद्रिय पदार्थाचा वापर केला जातो. ४० ते १०० मायक्रॉन जाडीच्या पॉलिथिन फिल्मचा आच्छादनासाठी वापर करून कमी पाण्यात फळबागा जगवता येतात.
शेतातील काडीकचरा, धसकटे, गवत, तूर काट्या व भुसा याच्या फांद्यांचा सेंद्रिय आच्छादनासाठी ७ ते ८ सेंटीमीटर जाडीचा थर जमिनीवर झाडाजवळ केल्यास बाष्पीभवनाचा वेग मंदावतो व झाडे जगू शकतात.
१) मटका सिंचन
झाडाच्या आळ्यात मटके जमिनीत गाडून कमी पाण्यात झाडे जगवता येतात. कमी वयाच्या झाडासाठी १५ लिटर क्षमतेचे मटके वापरावे मटक्याच्या तळाशी लहान छिद्र पाडून त्यात कापसाची वात बसवून झाडाच्या मुळांना पाणी देता येते. यामुळे झाडांच्या तंतुमय मुळापाशी पाणी उपलब्ध होऊन झाडे जिवंत राहतात.
२) ठिबक सिंचनाचा वापर
उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर अतिशय फायदेशीर आहे. बाष्पीभवन टाळण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. सुक्ष्म सिंचन योजनेत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना खर्च मर्यादेच्या ८०% व इतर शेतकऱ्यांना ७५% अनुदान देय आहे.
३) जलशक्तीचा वापर
प्रति फळझाडास ३० ते ५० ग्रॅम जलशक्ती (हायड्रोजेल) वापर करून उपलब्ध कमी पाण्यावर झाडे जगू शकतात. चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खत प्रति झाड ५ ते १० किलो घेऊन त्यात जलशक्ती व्यवस्थित मिसळून ज्या ठिकाणी पाणी देण्यात येते त्या ठिकाणी व्यवस्थित चर खोदून टाकावे. जलशक्तीमध्ये त्याच्या वजनाच्या १०० पट पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते.
४) सलाईन बॉटलचा वापर
ठिबक सिंचनासारखे थोडे थोडे पाणी कार्यक्षमतेने वापरण्यासाठी आणि अगदी थेट झाडाच्या मुळाजवळ देण्यासाठी सलाईन बॉटलचा वापर करता येतो. सलाईनच्या बॉटलमध्ये पाणी भरून फांदीच्या आधाराने झाडाजवळ टांगून ठेवावे. तिची नळी झाडाच्या मुळाजवळ जमिनीत वरच्या थरात ठेवावी. नवीन लागवड केलेल्या फळझाडाचे व एक ते तीन वर्ष वय असलेल्या फळझाडांची या पद्धतीने पाणी दिल्यास झाडे कमी पाण्यामध्ये जगू शकतात.
५) झाडाच्या खोडास बोर्डो पेस्ट लावणे
फळबागांच्या झाडाच्या खोडास बोर्डो पेस्टचा लेप लावणे (१ किलो मोरचूद + १ किलो कळीचा चुना + १० लिटर पाणी) याप्रमाणे लावल्यास खोडाचे उष्णतेपासून संरक्षण होते. तसेच बुरशीजन्य रोगाचा प्रतिबंध होतो.
अधिक वाचा: Agroforestry बांधावर लावा हे झाड अन् करा ह्याची शेती
६) झाडाचा पानोळा किंवा फळसंख्या कमी करणे
झाडावरील पानांमधून पाण्याचे उत्सर्जन होत असते. त्यामुळे झाडाची हलकीशी छाटणी करून पानांची किंवा फळांची संख्या कमी केल्यास याद्वारे होणारे पाण्याचे उत्सर्जन कमी होऊन झाडे कमी पाण्यामध्ये जगवता येतात. मोसंबीवरील पानसोट पूर्णतः काढल्यास झाडे सशक्त रहून पाण्याची बचत होते.
७) बाष्प रोधकाचा वापर
पानाच्या पर्णरंधे यातून होणाऱ्या पाण्याचे उत्सर्जन नियंत्रित करण्यासाठी व प्रकाश संशोधनाचा वेग योग्य तो राखण्यासाठी ६ ते ८ टक्के केओलिन या बाष्प रोधकाचा वापर ६०० ते ८०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी २० दिवसाच्या अंतराने करावी.
८) खोडास गवत किंवा बारदाना बांधणे
पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे तसेच सूर्याचा प्रखर सूर्यप्रकाश खोडावर पडत असल्यामुळे खोडास इजा पोचू शकते. तसेच खोड तडकण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यासाठी गवत अथवा बारदाना सुतळीच्या सहाय्याने खोडाच्या संपूर्ण भागावर घट्टपणे बांधावे. त्यामुळे झाडाच्या खोडाचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण होऊ शकते. खोडास व सालीस इजा पोहोचणार नाही.