सद्यस्थितीत आंबिया बहाराची फळे ही विकसनशील अवस्थेत आहेत पावसाळी हवामानात सततचा रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरण हे बुरशीजन्य रोगांच्या संक्रमनास पोषक आहे.
देठ सुखी, पानावरील डाग, पानगळ व फळांवर तपकिरी डाग रोगाला कारणीभूत असलेल्या बुरशीला पावसाळी वातावरण अनुकूल असल्याने यांचा प्रकोप होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे लिंबूवर्गीय उत्पादक यांनी सतर्क राहून बगिच्यातील विकृती व फळगळीचे लक्षणे जाणून त्याप्रमाणे उपाययोजना करणे गरजेचे आहे.
१) फायटोफ्थोरा बुरशीचे संक्रमण झाल्यास दिसणारी लक्षणे- फायटोप्थोरा बुरशी वाढीस अनुकूल वातावरण असल्यास या बुरशीमुळे लिंबूवर्गीय फळ पिकावर पानावरील चट्टे लक्षणे तसेच तपकिरी कुज किंवा फळावरील कुज किंवा ब्राऊन रॉट रोग उद्भवतो.- सदर रोग फायटोप्थोरा पाल्मिव्होरा आणि फायटोप्थोरा निकोशियानी या दोन प्रजातीमुळे उद्भवतो.अ) पानावरील चट्टे लक्षणे- पावसाळ्यात जमिनीलगतच्या फांद्यावरील पाने व फळांना या बुरशीची लागण सर्वप्रथम होते.- यामुळे पाने टोकाकडून करपल्या सारखी व मलूल होतात अशी पाने हातात घेतली असता त्यांचा चुरा केला असता त्यांची घडी होते मात्र पाने फाटत नाहीत.- टोकाकडून झालेले संक्रमण पूर्ण पानावर होऊन पाने तपकीरी काळे होतात नंतर अशी पाने गळून झाडाखाली त्यांचा खच पडतो.- फांद्या पर्ण विरहित होतात. परिणामी अकाली फळगळ होते.ब) फळावरील तपकिरी रॉट किवां फळावरील कुज लक्षणे- पानांवर लागण झाल्यानंतर जमिनी लगतची हिरवी असलेली फळे यावर तपकिरी/करड्या डागांची सुरूवात होते, फळे एकाबाजूने करपण्यास सुरूवात होते.- फळाच्या हिरव्या आवरणास संक्रमण होऊन पूर्ण फळ हे तपकिरी काळ्या रंगामध्ये परावर्तीत होते व फळे सडून गळतात या फळ सडीच्या अवस्थेस 'ब्राऊन रॉट' किवां तपकिरी रॉट असे संबोधतात.- फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते.- करड्या रंगाची फळे यांची तोड केल्यानंतर ते निरोगी फळात मिसळल्यास निरोगी फळे पण सडतात.
२) देठ सुकणे किंवा कोलेटोट्रीकम स्टेम एंड रॉट- कोलेटोट्रीकम बुरशीमुळे संत्रा फळाच्या देठाजवळ काळी रींग तयार होऊन तो भाग काळा पडतो व भाग नंतर वाढत जातो व संपूर्ण फळ सडते.- कोवळ्या फांद्यावरील पाने सुकणे व ती वाळणे ही या रोगाची सुरूवातीची लक्षणे आहेत.- बरेचदा उशिरा झालेल्या संसर्गामुळे रोगग्रस्त फळे संकुचीत होतात, काळे पडतात, वजनाने हलके होऊन कडक होतात आणि दीर्घ काळापर्यंत देठांना लटकत राहतात.
व्यवस्थापन- वाफे केलेले असल्यास त्यात पाणी साचून राहते ती मोडून टाकावीत. बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी बाहेर काढावे.- सर्वप्रथम झाडांवर गळून पडलेल्या पानांची व फळांची विल्हेवाट लावावी ती शेतात तशीच राहू देऊ नये अन्यथा या रोगाची तीव्रता वाढण्यास मदत होऊन संक्रमण जलद गतीने होते. वाफा स्वच्छ ठेवावा.- फळबागेत फळांचे ढीग कुठेही ठेवू नका कारण ते कीड व रोगाचे प्रसार करण्याचे काम करतात.- फायटोप्थोरा बुरशीमुळे होणाऱ्या पानगळ व फळावरील तपकिरी कुज 'ब्राऊन रॉट' चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण झाडावर फासिटील ए.एल.* २.५ ग्रॅम किवां कॉपर ऑक्सीक्लोराईड* ५० डब्लुपी ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.- फवारणी करतांना झाडाच्या परिघातामध्ये सुद्धा फवारणी करावी जेणेकरून खाली पडलेली फळे उचललेली नसल्यास त्यावरील बुरशीचा नायनाट होईल तसेच जमिनीमधील सक्रिय बिजाणू यांचा नायनाट होण्यासाठी मदत होईल.- चांगले परिणाम मिळण्यासाठी या औषधामध्ये इतर कोणतेही तत्सम बुरशीनाशके/किटकनाशके/विद्राव्य खते मिसळू नये.- रासायनिक औषधे फवारणीनंतर १५ दिवसाच्या नंतर ट्रायकोडर्मा हार्जियानम* अधिक सुडोमनास फ्ल्यूरोसन्स* १०० ग्रॅम प्रत्येकी प्रति झाड १ किलो शेणखतात मिसळून झाडाचे परिघातात जमिनीतून द्यावे.- कोलेटोट्रीकम बुरशीजन्य फळगळसाठी बोर्डेक्स ०.६ टक्के मिश्रणाची किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्लूपी* २.५ ग्रॅम किंवा अझोक्सस्ट्रोबिन + डायफेनकोणाझोल* १ मि.लि. प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी.(नोंदः *संशोधनावर आधारीत लेबल क्लेम नाही)