कांद्यामध्ये औषधी गुणधर्म असून ब आणि क जीवनसत्वे, कर्बोदके, प्रथिने, तसेच फॉस्फरस, कॅल्शियम, आणि लोह ही खनिजे असतात. कांद्याला येणारा उग्र दर्प आणि तिखटपणा हा आलिल प्रोपिल डायसल्फाइड या हवेत उडून जाणाऱ्या तेलकट पदार्थामुळे येतो. लसणातील उग्र दर्प हा त्यातील ॲलिनीन आणि त्यापासून मिळणाऱ्या डायअलिल डायसल्फाइड रसायनामुळे येतो. कांद्याला लाल रंग हा ॲन्थोसायनीन या रंगद्रव्यामूळे येतो.
कांदा आणि लसूण या पिकात प्रामुख्याने करपा रोग मोठ्या प्रमाणात आढळून येतो. त्याचप्रमाणे मर, केवडा, साठवणूकीतील जीवाणूंमुळे होणारी सड, कांदा काजळी, मानसड, पांढरीसड, इत्यादी रोग आढळून येतात. रोगाच्या नियंत्रणासाठी रोपवाटीकेपासून ते काढणीपर्यंत काळजी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे काढणीनंतर कांदा साठवणूकीत ठेवण्यापूर्वी त्याची काळजी घेवून चांगल्या रितीने वाळविणे अत्यंत महत्वाचे असते.
अधिक वाचा: कांदा पिकावरील करपा रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे कराल?
कांदा सावठवणूकीतील रोग
अस्परजिलस नावाच्या बुरशीमूळे हा रोग होतो. साठवणूकीत ज्या ठिकाणी मान (पात) कापली जाते अशा ठिकाणी रोगाची सुरुवात होवून तो काद्यांवर पसरतो. रोगाचा प्रादूर्भाव झालेल्या काद्यांचा वरच्या पापुद्रयावर काळया बुरशीची वाढ झालेली दिसते आणि बुरशी बोटाने सहज पुसता येते असे रोगग्रस्त कांदे साठवणूकीत हळूहळू सडतात.
ईरवीनीया कॅरोटोव्होरा, सुडोमोनस अलीकोला या जीवाणूंच्या प्रादूर्भावामूळे पीक पक्व होण्याच्या वेळी रोगाची प्रथम सुरुवात होवून साठवणूकीतील कांदा सडतो. काद्यांचा बाहेरील पापुद्रा ओलसर पिवळसर पडून सडल्यासारखा दिसतो असा कांदा दाबला असता पिवळसर द्रव बाहेर येतो आणि सडलेल्या भागाचा जळालेल्या गंधकासारखा वास येतो या रोगाचा प्रादूर्भाव झालेल्या कांद्याची (गोट) लागण केली असता गोंडे न येता पानांचा गुच्छ होवून झाड पिवळसर आणि खुजे दिसते.
या रोगाचा प्रथम प्रादूर्भाव जमिनीतील झाडाच्या रोगग्रस्त अवशेषापासून होतो. तसेच जीवाणूंचा शिरकाव जखमेवाटे तसेच माना (पाती) कापल्यानंतर होतो. बोट्रायटीस अली या बुरशीच्या प्रादूर्भावामूळे साठवणूकीत कांदा मानेजवळ सडतो. या रोगाची सुरुवात पातीस जखम होवून पिकाच्या वाढीच्या काळात होते.
साठवणूकीत मानेजवळ कांदा सडून मलूल, कोरडा, तपकिरी दिसतो. सडलेला भाग खडबडीत होतो आणि त्यावर करड्या बुरशीची वाढ झालेली दिसते. रोगाचा प्रादूर्भाव पूर्ण काद्यांवर होवून पापुद्रे सुरकुतलेले, वाळलेले दिसतात आणि कांदा सडतो. रोगाचा प्रथम प्रादूर्भाव जमिनीतून तसेच बियाणेमार्फत होतो.
उपाय
- पिकाची फेरपालट करावी.
- पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी.
- रासायनिक खतांचा वापर शिफारसीत मात्रेपेक्षा जास्त प्रमाणात करु नये.
- बियाण्याच्या कांद्यात रोगाची लक्षणे दिसताच बोर्डोमिश्रण (१.० टक्के) किंवा स्टिप्टोमासीन ३ ग्रॅम+कॉपर ऑक्झिक्लोराईड ३० ग्रॅम प्रति १० लि. पाण्यात मिसळून बुडानजीक ओतावे.
- पिकाची काढणी करतांना तसेच पात कापतांना कांद्यास इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
- काढणीनंतर कांदा शेतामध्ये पातीसकट ३ ते ५ दिवस वाळविल्यानंतर पुन्हा सावलीत १८ दिवस चांगला वाळून द्यावा. पात पूर्ण सुकल्यानंतर काद्यांपासून ३-५ सें.मी अंतर ठेवूनच कापावी.
- रोगट व जखमा झालेले कांदे साठविण्यापूर्वी काढून नष्टा करावेत.
- कांद्याची चाळ मोळळया, हवेशीर जागी असावी. तसेच साठवणूकीत मोकळी हवा राहिल याची काळजी घ्यावी.
- कांदा साठवणूकीपूर्वी चाळ चांगली स्वच्छा करुन मँकोझेब २५ ग्रॅम + कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १० लि. पाण्यात एकत्र मिसळून सर्व बाजून फवारावे.
- साठवणूकीत कांदा सड या रोगाच्या नियंत्रणासाठी, पीक काढणीपूर्वी १५ दिवसाआधी मँकोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १.० ग्रॅम + स्टिकर १.० ग्रॅम प्रति लिटर एकत्र करुन फवारावे तसेच या औषधाचा दुसरा फवारा पाती कापण्याच्या वेळी द्यावा.
- साठवणूक केल्यानंतर दर दोन महिन्याच्या अंतराने काद्यांची चाळणी व खराब कांदे काढून टाकावेत तसेच मँकोझेब+कार्बेन्डाझिम यांची काद्यांवर चाळीच्या कडेने सौम्य फवारा द्यावा.
डॉ. आर.बी.सोनवणे, प्रा. आर.एम.बिराडे
कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव ब., ता. निफाड, जि. नाशिक