Join us

विक्रमी उत्पादनासाठी सुरु उसाच्या लागवडीचे व्यवस्थापन कसे कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 11:04 AM

महाराष्ट्रात १५ टक्के क्षेत्रावर १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सुरू उसाची लागवड केली जाते. सुरू उसाचे हेक्टरी १५० टनापेक्षा अधिक उत्पादन घेण्यासाठी जमीन सेंद्रिय खताने समृद्ध करणे, सुधारीत जातींचे शुद्ध व निरोगी बियाणे, ५ फुटावर रोप लागवड तंत्र, अन्नद्रव्य व्यवस्थापन इ. चा अवलंब करणे.

महाराष्ट्रात १५ टक्के क्षेत्रावर १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सुरू उसाची लागवड केली जाते. सुरू उसाचे हेक्टरी १५० टनापेक्षा अधिक उत्पादन घेण्यासाठी जमीन सेंद्रिय खताने समृद्ध करणे, सुधारीत जातींचे शुद्ध व निरोगी बियाणे, ५ फुटावर रोप लागवड तंत्र, अन्नद्रव्य व्यवस्थापन, ठिबक सिंचन व खत व्यवस्थापन तंत्राचा वापर, तण नियंत्रण व यांत्रिकीकरण आणि पीक संरक्षण या तंत्राचा वापर केल्यास अपेक्षित उत्पादन निश्चित मिळू शकेल.

जमीन मशागत व सेंद्रीय अन्नद्रव्यांचे व्यवस्थापनसुरू उसाचा कालावधी १२ महिने व त्यानंतर एक किंवा त्यापेक्षा जास्त खोडवे घेण्यासाठी मध्यम ते भारी मगदुराची व उत्तम निचऱ्याची जमीन असावी. ऊस लागवडीपूर्वी माती तपासणी करून अहवालानुसार खताचे नियोजन करावे. उसाची मुळे १ ते १.५ मीटर खोलीपर्यंत जात असल्याने खोल नांगरट करणे गरजेचे आहे. भारी जमिनीतील १.५ ते २ फूट खोलीवरील जमिनीचा कठीण थर फोडण्यासाठी ५ फूट अंतरावर उताराच्या दिशेने मोल नांगराने नांगरट करावी. त्यामुळे पाण्याचा निचरा चांगला होतो आणि मुळे खोल गेल्याने ऊस पडण्याचा धोका कमी होतो.

उसाच्या अधिक उत्पादनासाठी जमीन सेंद्रिय खतांनी समृद्ध करावी. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५ ते ०.६ टक्क्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. ऊस लागण केल्यानंतर सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कायम राखण्यासाठी ठिबक सिंचन, पाचटाचा वापर, आंतरपिके आणि आंतरमशागत या तंत्राचा वापर करावा.

सुरू उसाला हेक्टरी १० टन व सऱ्या पाडल्यानंतर १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा ५ टन गांडूळ खत जमिनीत मिसळून द्यावे किंवा ताग, धैंचा जमिनीत गाडावा. कारखान्याचे प्रेसमड कंपोस्ट उपलब्ध असल्यास हेक्टरी ६ टन चोपण जमिनीत टाकावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास हेक्टरी २५ किलो फेरस सल्फेट, २० किलो झिंक सल्फेट, १० किलो मॅगनीज सल्फेट आणि ५ किलो बोरॅक्स चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये द्यावे हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी सरीमध्ये मेटारायझीयम ॲनिसोप्ली किंवा बिव्हेरिया बॅसियाना हे जैविक बुरशीनाशक हेक्टरी २० ते २५ किलो १२५ किलो शेण खतातून मिसळावा.

अधिक वाचा: सुरु हंगामासाठी ऊस लावताय; १०० टन उत्पादन देणारे कुठले आहेत वाण?बेणेप्रक्रियाबुरशीजन्य रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच कांडीवरील खवले कीड व पिठ्या ढेकूण यांच्या नियंत्रणासाठी १०० ग्रॅम कार्बेडॅझिम व ३०० मि.ली. डायमिथोएट १०० लीटर पाण्यात मिसळून बेणे १० मिनिटे बुडवावे. या प्रक्रियेनंतर अॅसिटोबॅक्टर १० किलो व स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत १.२५ किलो १०० लीटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात टिपरी ३० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी. जिवाणू खताच्या प्रक्रियेमुळे ५० टक्के नत्र व २५ टक्के स्फुरद खतांची बचत होते व उत्पादनात वाढ होते. बेणे प्रक्रिया करताना शेडनेटचे कापड वापरून त्यात बेणे टाकून त्यासह बीजप्रक्रिया करावी. या पद्धतीने बेणे बुडविणे व काढणे या प्रक्रिया कमी कष्टात व सुलभ होते.

सुरू उसासाठी रासायनिक खते

पाणी व्यवस्थापन आणि ठिबक सिंचनसुरू उसासाठी प्रवाही पद्धतीने हेक्टरी २५० लाख लीटर पाणी लागते. पावसाचा कालावधी वगळल्यास १५ ते १६ पाण्यामध्ये या उसाचे पीक येते. ठिबक सिंचनामुळे ५० ते ५५ टक्क्यापर्यंत पाण्याची बचत, उत्पादनात २० ते ४० टक्के वाढ, खतामध्ये सुद्धा २५ ते ३० टक्के बचत, तणातील खर्चात बचत २५ ते ३० टक्के बचत आणि विजेतील बचत ३० ते ४० टक्के बचत होते. ठिबक सिंचनाचे अनेक फायदे असून सेंद्रिय कर्बाचे प्रमाण राखण्यात आणि जमिनी क्षारयुक्त होण्यापासून वाचविण्यासाठी ठिबक सिंचन फायदेशीर ठरते. ठिबक सिंचनातून खते दिल्यास खतांची कार्यक्षमता ९० टक्क्यापर्यंत वाढते, तर प्रचलित पद्धतीत ३५ ते ४० टक्के खते उपयोगी पडतात. विद्राव्य खते प्रमाणबद्ध व शिफारशीप्रमाणे वापरावीत. मातीची भौतिक तपासणी करून ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करावा. ठिबक सिंचनाचे पाणी सरीच्या दोन्ही बाजूस पोहचत असल्याचे ओलावा चेक करून खात्री करावी.

सुरू उसातील आंतरपिकेऊस लावल्यानंतर उसाची उगवण पूर्ण होण्यास ३ ते ६ आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यानंतर उसास फुटवे फुटण्यास सुरुवात होते. उसाच्या फुटव्यांची पूर्ण वाढ होण्यास आणि संपूर्ण रिकामे क्षेत्र झाकण्यासाठी ३ ते ४ महिने लागतात. फुटव्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत दोन सरीतील जागा रिकामी राहते. ऊस पिकात आंतरपीक घेताना ते अधिक पैसा देणारे, कमी कालावधी येणारे, बाजारपेठ जवळ असणारे, जमिनीची कार्यक्षमता वाढविणारे आणि उसावरील उत्पादन खर्च कमी करण्यास मदत करणारे असावे सर्वसाधारणपणे उसाच्या मोठ्या बांधणीपूर्वी आंतरपिकाची काढणी होईल असे पीक घ्यावे सुरू उसामध्ये आंतरपिके घेणे फायदेशीर ठरते. वेलवर्गीय पिकांचे वेल उसात जाऊ नये म्हणून वरच्यावर रिकाम्या जागेत सावरावे उत्पादन दुप्पट करण्याचे तंत्रात आंतरपीक उपयोगी ठरते.

तणनियंत्रण व मोठी बांधणीउसाच्या सरीतील जास्त आंतर, उसाची सावकाश होणारी उगवण, वाढीचा कमी वेग, जमिनीचा प्रकार, कॅनॉलच्या पाण्याचा अतिरिक्त वापर, कच्चा शेणखताचा वापर, रासायनिक खतांचा जास्त आणि असमतोल वापर, तापमान आणि पीक पद्धती यामुळे अनेक नवीन तणे आढळून येतात. हरळी, लव्हाळा आणि उसाला गुंडाळणाऱ्या वेलवर्गीय तणांमुळे उसाचे उत्पादनात हमखास घट येते. सुरुवातीला ४ महिने तणे उसाबरोबर स्पर्धा करीत असतात. उसाच्या वाढीवर परिणाम करतात. विशेषतः फुटवे फुटताना आणि कांडी लागताना ही तणे त्रासदायक ठरत आहे. उसावर तणनाशक पडणार नाही, याची काळजी घ्यावी व यासाठी नोझलवर प्लॅस्टिक हूड बसवावे. तसेच तणनाशक नोझलचा वापर करावा.

उसाचे पीक १२ ते १४ आठवड्यांचे झाल्यानंतर नत्र खताचा तिसरा हप्ता देऊन बाळबांधणी करावी. ऊस पीक ४ ते ४.५ महिन्याचे झाल्यानंतर रासायनिक खतांची मात्रा देऊन रिजरच्या सहाय्याने मोठी बांधणी करावी. यांत्रिक पद्धतीने मशागत केल्यास तणनियंत्रण, मोकळी हवा, भरपूर सूर्यप्रकाश, ओलीचे संरक्षण, कीड व रोग नियंत्रण व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण राखण्यात मदत होते.

मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रपाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा

टॅग्स :ऊसपीकशेतीपीक व्यवस्थापनशेतकरीसेंद्रिय खतखतेठिबक सिंचन