Join us

खोडवा ऊस उत्पादन वाढीसाठी पाचट व्यवस्थापन कसे कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 9:59 AM

महाराष्ट्रात ऊस हे महत्वाचे पिक असून दिवसेंदिवस उसाच्या उत्पादनात घट होत आहे. महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटण्यामागील अनेक कारणापैकी खोडवा पिकाचे कमी उत्पादन हे प्रमुख कारण आहे. खोडवा पिकाची जोपासना, पाचट अच्छादन या आधुनिक तंत्राने केल्यास खोडव्याचे उत्पादन लागणीच्या उत्पादना एवढे येऊ शकते.

महाराष्ट्रात ऊस हे महत्वाचे पिक असून दिवसेंदिवस उसाच्या उत्पादनात घट होत आहे. महाराष्ट्रातील ऊस उत्पादन घटण्यामागील अनेक कारणापैकी खोडवा पिकाचे कमी उत्पादन हे प्रमुख कारण आहे. खोडवा पिकाची जोपासना, पाचट अच्छादन या आधुनिक तंत्राने केल्यास खोडव्याचे उत्पादन लागणीच्या उत्पादना एवढे येऊ शकते असे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथील संशोधनावरुन दिसून आले आहे. महाराष्ट्रात जवळजवळ ३५ ते ४० टक्के क्षेत्रावर घेतल्या जाणाऱ्या खोडव्यापैकी पाचट कुटीचा वापर १० टक्के क्षेत्रावरही होत नाही. पाचट जाळल्यामुळे आपण कित्येक टन नत्र, स्फुरद, पालाश, सुक्ष्म अन्नद्रव्य आणि बहुमुल्य सेंद्रीय पदार्थाचा नाश करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

ऊस पाचटातील पोषक घटक जाळून नष्ट करण्याऐवजी त्याचे जमिनीवर आच्छादन केल्यास अधिक फायदा होतो. पाचटाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास जमिनीच्या सुपीकता व सजीवतेसाठी उपयुक्त ठरते. बहुतांश शेतकरी शेताच्या स्वच्छतेसाठी म्हणून पाचट जाळतात. पाचट हाताळण्यातील अडचणी, पाचटाने झाकले गेल्यास खोडव्याची उगवण कमी होणे आणि नंतर आंतरमशागतीमध्ये येणारे अडथळे यामुळे शेतकऱ्यांना पाचट जाळणे ही पारंपरिक पद्धती अधिक सोयीची वाटते. मात्र, पाचटाचे आच्छादन जमिनीवर केल्यास होणारे फायदे यापेक्षा तुलनात्मकदृष्ट्या अधिक असल्याचे संशोधनात आढळले आहेत.

पाचट जाळण्याचे दुष्परिणाम• पाचट जाळल्याने खोडव्याची उगवण क्षमता ६८ टक्के राहते; तर पाचट न जाळता केलेल्या योग्य व्यवस्थापनामुळे ती ८२ टक्के राहत असल्याचे संशोधनात आढळले आहे.• पाचट जाळल्याने पर्यावरणात प्रदूषण होते.• जमिनीच्या वरील थरातील सूक्ष्मजीवांचे प्रमाण कमी होते; तसेच सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होते. परिणामी, जमिनीची सुपीकता व भौतिक स्थिती बिघडते.• पाचटामध्ये असलेले सेंद्रिय कर्ब आणि मूलद्रव्ये जळून जातात. त्याची अत्यंत अल्प प्रमाणात राख शिल्लक राहते.

पाचट आच्छादनाचे फायदे• हेक्टरी सुमारे ८-१० टन पाचट तयार होते. त्यात भरपूर प्रमाणात सेंद्रिय कर्ब व मूलद्रव्ये असतात. त्यापासून पाचटामध्ये ४० ते ५० किलो नत्र, २० ते ३० किलो स्फुरद व ७५ ते १०० किलो पालाश आणि ३ ते ४ हजार किलो सेंद्रिय कर्ब व अन्य सूक्ष्म मूलद्रव्ये जमिनीत घातले जाते. ती व्यवस्थित कुजल्यानंतर खोडव्याला उपलब्ध होतात.• आच्छादनामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होऊन मातीतील ओलावा टिकून राहतो. पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढवणे शक्य होते. खोडव्याला कमी पाण्यात व दुष्काळी परिस्थितीतही तग धरणे शक्य होते.• जमिनीचे तापमान एका पातळीपर्यंत स्थिर राहते. ते उन्हाळ्यात फार वाढत नाही, तर हिवाळ्यात फार थंड होत नाही.• तण नियंत्रणाचा खर्च कमी होतो.• ओलावा, भरपूर सेंद्रिय कर्ब यामुळे शेतात गांडुळांची संख्या वाढते.• सेंद्रिय कर्ब वाढल्याने जमिनीची सुपीकता वाढते. पिकाला मिळणाऱ्या मूलद्रव्यात वाढ झाल्याने उत्पादनात १२ ते १३% ने वाढ होते.

अधिक वाचा: विक्रमी उत्पादनासाठी सुरु उसाच्या लागवडीचे व्यवस्थापन कसे कराल?

शेतातील पाचट लवकर कुजत का नाही?उसाच्या पाचटामधील कर्ब: नत्र यांचे गुणोत्तर हे १२२:१ असे असते. यातील कर्बाचे प्रमाण अधिक असले तरी नत्राची उपलब्धता कमी असल्याने जिवाणूंना अधिक वेळ लागतो. कर्बामुळे जिवाणूंना उर्जा मिळते; तर नत्रापासून प्रथिने मिळतात. जिवाणूंच्या चांगल्या वाढीसाठी पिकांच्या अवशेषांतील कर्ब नत्र गुणोत्तर २४:१ असे असावे. असे गुणोत्तर शेणखत किंवा कंपोस्ट खतामध्ये असते. त्यामुळे त्यामध्ये जिवाणूंचे प्रमाण अधिक असते.

एकात्मिक ऊस पाचट व्यवस्थापन• प्रत्येक सरीआड पाचट जमा करावे. त्या सरीत पाचट व्यवस्थित पसरून आच्छादन करावे. ज्या सरीत पाचट नाही तेथे आंतरमशागत करता येते. शेतातील पाचट मऊ करण्यासाठी पाणी द्यावे.• पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येत असल्याने काळजीपूर्वक पाचट भिजवून घ्यावे. पाचटावर ७५ किलो प्रतिहेक्टर युरिया टाकावा. त्यामुळे पाचटाचे कर्ब नत्र गुणोत्तर कमी होईल. त्यावर ५०० किलो शेणखतात अधिक २५ किलो पाचट कुजवणारे जीवाणू कल्चर मिसळून टाकावे.• तमिळनाडू कृषी विद्यापीठाचे बायामिनर लायसर हे जिवाणू कल्चर विकसित केले आहे. या कल्चरमुळे कुजण्याच्या प्रक्रियेला वेग मिळेल. जिवाणू कार्यक्षम राहण्यासाठी जमिनीमध्ये सतत ओलावा असावा.

शेतातील पाचट आणखी लवकर कुजण्यासाठी काय कराल?• पाचटाचा जितका जास्त पृष्ठभाग जिवाणूंच्या संपर्कात येतो, तितका प्रक्रियेचा वेग वाढतो. त्यासाठी पाचटाची कुट्टी करून घेतल्यास फायद्याचे ठरते. त्यासाठी ट्रॅक्टरचलित पाचट कुट्टी यंत्र अलीकडे बाजारात उपलब्ध आहे; तसेच लखनौ येथील भारतीय ऊस संशोधन केंद्राने तयार केलेले खोडवा व्यवस्थापन यंत्र सर्वोत्तम आहे.• पाचट अधूनमधून भिजवत राहणे गरजेचे आहे. त्यासाठी स्प्रिंकलर लावल्यास काम सोपे होते.• पाचट कोरडे झाल्यास कुजवणाऱ्या जिवाणूंची क्रिया मंदावते.• पाचटाचे कर्ब: नत्र गुणोत्तर २४:१ च्या जवळ आणण्यासाठी उसाच्या पाचटातील नत्राचे प्रमाण वाढवले पाहिजे. त्यासाठी पाचटावर बाहेरून नत्र (युरिया) टाकावा.• पाचट कुजवण्याचा वेग वाढवण्यासाठी शेणखत व जिवाणू कल्चर वापरावे.• शेतातील पाचटाचा ढीग करून कुजवल्यास कमी वेळेत खत तयार होते. ढिगामध्ये तापमानवाढीसाठी वाव असतो. शेतातच कुजावायची असल्यास त्यास वेळ लागतो.• महिन्याआड पाचटाची उलटापालट करावी. जिवाणूंना आवश्यक ऑक्सिजन मिळतो. त्याचा फायदा होतो.

टॅग्स :ऊसपीकशेतकरीशेतीपीक व्यवस्थापन