Join us

कापसाची वेचणी व प्रतवारी कशी करावी?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 2:49 PM

बऱ्याचदा ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा वेचणीस आलेला कापूस भिजतो व त्यामुळे बरेच नुकसान होते. कापूस वेचणीच्या वेळी येणाऱ्या अवकाळी पावसाचा अंदाज घेऊन कापूस वेचणीचे नियोजन शेतकऱ्यांनी करावे.

सध्या बऱ्याच ठिकाणी कापूस वेचणीस सुरूवात झाली असून कापूस प्रतवारीच्या दृष्टीने कापसाची वेचणी व साठवणूक करतांना काळजी घेणे गरजेचे आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात पाऊस झाला व त्यामध्ये पहिल्या वेिचणीचा कापूस भिजला व कापसाच्या प्रतवारी वर त्याचा परिणाम झाला. कापसाला मिळणारा बाजारभाव हा सर्वस्वी कापसाच्या प्रतिवर अवलंबून असतो. कापसाची प्रत राखण्याकरीता वेचणी करतांना काळजी घेणे आवश्यक आहे.

वेचणी सुरू झाल्यापासून साधारणतः ३ ते ४ वेचणीत बराचसा कापूस गोळा होतो. आपल्याकडे वेचणी करतांना काळजी न घेतल्यामुळे ३० ते ३५ टक्के पालापाचोळा व इतर केरकचरा रूईमध्ये आढळतो. या बाबींचा धाग्याच्या गुणधर्मावर परिणाम तर होतोच त्याचबरोबर कापड गिरणीमध्ये प्रतवारी टिकविण्यास अडचण निर्माण होते. बऱ्याचदा ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा वेचणीस आलेला कापूस भिजतो व त्यामुळे बरेच नुकसान होते. कापूस वेचणीच्या वेळी येणाऱ्या अवकाळी पावसाचा अंदाज घेऊन कापूस वेचणीचे नियोजन शेतकऱ्यांनी करावे.

कापूस वेचणी करतांना घ्यावयाची काळजी१) कापूस वेचणी ठराविक कालावधीत केल्यास चांगल्या प्रतिचा कापूस मिळतो. जास्त दिवस कापूस झाडावर राहिल्यास त्याला पालापाचोळा, हवेतील धुळीचे कण, बोंड जमिनीवर पडल्यास मातीचे कण चिकटतात व त्यामुळे कापसाची प्रत खराब होते.२) वेचणी ही सकाळी किंवा दुपारी उशिराने करावी, जेणेकरून कापसाला पालापाचोळा चिकटून येणार नाही, बोंडे वेचतांना पालापाचोळा चिकटल्यास त्याचवेळी काढावे व स्वच्छ कापूस गोळा करावा.३) अपरिपक्व व अर्धवट उमललेल्या बोंडातील कापसात पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अशा बोंडातील कापूस वेचून तसाच साठविल्यास रूईला पिवळसरपणा येतो, धाग्याची ताकद कमी होते व कापसाची प्रत खालावते. शिवाय अशा कापसाच्या सरकीचे आवरण टणक नसल्यामुळे गलाई करताना सरकी फुटते व ती रूईमध्ये मिसळते व रूईची प्रत खराब होते.४) परिपक्व व पूर्ण फुटलेल्या बोंडातील कापसाची प्रत चांगली असते आणि या कापसापासून मिळणाऱ्या रूई व धाग्याची प्रत उच्च दर्जाची असते. म्हणूनच कापसाच्या तसेच रूईच्या दर्जेदार उत्पादनाकरिता वेचणी करताना पूर्णतः परिपक्व आणि पूर्ण उमललेल्या बोंडातीलच कापूस वेचणी करावा.

कपाशीची प्रतवारीकापसाला योग्य प्रकारे बाजारपेठ मिळण्यासाठी व मोबदला शेतकऱ्यास त्याने उत्पादीत केलेल्या कापसास योग्य तो मिळण्यासाठी कापसाची प्रतवारी होणे अनिवार्य ठरते. प्रतवारी म्हणजे उत्पादीत मालाचे ठरवून दिलेल्या गुण वैशिष्ट्यांचे आधारावर त्याचे विभिन्न गट करणे होय कपाशीची प्रतवारी सदृश्य पध्दतीने केली जाते. सर्वसाधारणपणे कपाशीची वेचणी व विक्रीचा कालावधी जवळपास सारखाच असल्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कापसाची आवक असते. त्यामुळे संकलन केंद्रावर प्रतवारी, मोजमाप व प्रक्रिया करण्यास अडचणी निर्माण होत असतात म्हणून सदृश्य पध्दतीनेच प्रतवारीचे काम मोठ्या प्रमाणावर करता येत होते पण आता नविन तंत्रज्ञानामूळे बऱ्याच संकलन केंद्रावर कापसाच्या गुण वैशिष्ट्यानूसार कापसाचा भाव ठरविला जातो. त्यामूळे चांगला प्रतवार असलेला मालाला योग्य भाव मिळतो.

कापसाची प्रत ठरविणेकापूस वाण निश्चित केल्यानंतर त्याची प्रत ठरविणे आवश्यक आहे. प्रत ठरवितांना कापसाचा रंग, स्वच्छता, रूईचे प्रमाण, स्पर्श, घाग्याची ताकद, लांबी, कापसातील पत्ती, काडीकचरा, माती इ. चे प्रमाण, कापसात असलेले अपरिपक्व व पिवळी टिक असलेल्या कापसाचे प्रमाण, ओलाव्याचे प्रमाण विचारत घेतले जाते.

कापसाचा रंगप्रत्येक वाणाच्या कपाशीस विशिष्ट प्रकारचा रंग असतो. उत्तम प्रतिच्या कपाशीस त्या वाणाचा मुळ रंग दिसून येतो. कापसाची प्रत हलकी असल्यास किंवा पावसाने कापूस भिजला गेल्यास त्याचा परिणाम कपाशीच्या रंगावर होतो त्यामुळे रूईमध्ये लाल पिवळसर रंगाची रूई आढळल्यास अशा रूईला बाजारपेठेत कमी भाव मिळतो..

कापसाची स्वच्छताकपाशीची वेचणी करताना झाडाची पत्ती, पालापाचोळा चिकटून येतो, काही वेळा नख्यासह कापसाचे बोंड वेचणी केले जाते. अशाप्रकारच्या विक्रीस आणलेल्या कपाशीमध्ये झाडाची पाने, पालपाचोळा, नख्या, माती इ. अनावश्यक बाबी असल्यास कपाशीच्या प्रतिवर परिणाम होतो.

तंतूची लांबीसर्वसाधारणपणे कापसाची गलाई झाल्यानंतर त्यापासून मिळालेल्या रूईतील थोडा भाग घेवून हाताने त्यातील धागे ओढून किंवा प्रयोगशाळेत विशिष्ट उपकरणांव्दारे धाग्याची लांबी ठरविण्यात येते. परंतू विक्रीस मोठ्या प्रमाणात असलेल्या कापसाच्या तंतूची लांबी काढण्यासाठी प्रत्येक गाडीतील कापूस गलाई करून त्याची लांबी काढणे शक्य होत नसते. म्हणून विक्रीस आणलेल्या कापासातील काही कापूस एका हातात घेवून दुसऱ्या हाताने ओढून कापसातील रूई सरकीपासून वेगळी केली जाते. विशिष्ट पातळीवर धाग्याची समानता आल्यानंतर घाग्याच्या लांबीचा अंदाज घेण्यात येत होता परंतू आता प्रयोगशाळेत नविन आलेल्या उपकरणाव्दारे धाग्याची लांबी ठरवून अधिक लांब धाग्याच्या कापसाला अधिक भाव मिळतो.

तंतूची ताकदविक्रीस आणलेल्या कापसापैकी काही कापूस हातात घेउन दुसऱ्या हाताने त्यातील तंतू वेगळे करून व तंतूना विशिष्ट पातळीपर्यंत ओढून तंतूची ताकद ठरविली जाते. चांगली, मध्यम व कमी अशाप्रकारे धाग्याच्या ताकदीचे प्रकार करून कपासातील परिपक्क व अपरिपक्क कापसाचे प्रमाण ठरविण्यात येते. तंतूंच्या लांबीप्रमाणे तंतूच्या ताकदीवर भर देण्यात येतो.

कापसाच्या तंतूची परिपक्वताविक्रीस आणलेला कापूस पूर्णत: परिपक्व, अर्धपरिपक्व वा अपरिपक्व आहे हे तपासणे आवश्यक असते. परिपक्वतेवर कापसातील रुईचे प्रमाण अवलंबून असते व रुईच्या प्रमाणाचा अंदाज कापूस हातात घेतल्यानंतर करता येतो. परिपक्व कापसाचे बोंड फुललेले असते व रूईचे प्रमाण अधिक असते.

कापूस प्रतवारीचे फायदे१) कापसाच्या प्रतीनुसार कापसाला योग्य मोबदला मिळण्याची खात्री असते.२) कापसाच्या गुण वैशिष्ट्यांची पारख करण्यास व त्याप्रमाणे किंमत ठरविण्यास मदत होते.३) प्रतवारीमुळे कापसाचा प्रातिनिधीक नमुना पाहून संबंध कापसाची प्रतवारी ठरविता येते.४) शेतकऱ्यांना उत्तम प्रतिचा कापूस उत्पादीत करण्यास व गुणवत्तेनुसार विभागणी करण्याची सवय लागते..वरीलप्रमाणे वेचणी, साठवण आणि प्रतवारी केल्यास कापसाला चांगला भाव मिळतो. अशाप्रकारे कापसाच्या रूईला, धाग्याला व कापडाला परदेशात सुध्दा चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते.

डॉ. संजय काकडे, डॉ. निळकंठ पोटदुखे व श्री. प्रशांत पाटीलकापूस संशोधन विभाग, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला

टॅग्स :कापूसकाढणीशेतकरीपीकमहिलापाऊस