राजगिरा या पिकाची लागवड खरीप व रब्बी या दोन्हीही हंगामात करता येते. तसेच या पिकाची लागवड वेगवेगळ्या प्रकारच्या हवामान परिस्थितीमध्ये करता येते. रब्बी हंगामात या पिकाचे उत्पादन अधिक मिळते म्हणून रब्बी हंगामात लागवड करणे फायदेशीर ठरते.
राजगिरा पिकाची लागवड
राजगिरा (एमरॅन्थस हायपोकॉन्ड्रीयाकस) हे पीकदुष्काळसदृष्य परिस्थितीतही चांगल्या प्रकारे येवू शकते व ज्या ज्या ठिकाणी गहू, ज्वारी व बाजरी सारखी पिके घेतली जातात अशा ठिकाणी या पिकाची लागवड सहजरीत्या करता येते. राजगिरा हे पीक साधारणपणे ४ ते ८ फुट उंच वाढते व फांदीविरहीत असणाऱ्या जाड खोडावर वेगवेगळ्या रंगाचे कणीस तयार होते. या पिकामध्ये मुख्यत्वे स्वपरागीभवन होते व झाडाच्या कणसामध्ये असलेल्या फुलाचा रंग हा जांभळा, लाल, गुलाबी, नारंगी, हिरवा व पिवळा असू शकतो. या पिकाच्या तयार होणाऱ्या दाण्यांचा रंग हा पांढरा, सोनेरी किंवा गुलाबी असतो. या पिकाचे पान, कणीस व खोड यांच्या रंगांमध्ये विविधता आढळते. हे पीक द्विदल प्रकारचे असून पाने पसरट व मोठी असतात.
या पिकाच्या पिठामध्ये अधिक प्रमाणात लायसिन (एकुण प्रथिनांच्या ०.७३ ते ०.८४ टक्के) या अमिनो आम्लाची मात्रा असते. तसेच या पिकामध्ये आहारदृष्ट्या आवश्यक असलेल्या इतर अमिनोअॅसिडची मात्रा देखिल अधिक आहे. या पिकाच्या दाण्यांमध्ये साधारणपणे सुमारे १४ ते १६ टक्के प्रथिने असतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे अमिनोआम्लाची सुद्धा या प्रथिनांमध्ये सम प्रमाणात उपलब्ध असतात. या पिकामध्ये साधारणपणे ५० टक्के लिनोलिक फॅटी अॅसिड असते. राजगिऱ्याच्या पानांमध्ये देखिल अधिक प्रमाणात प्रथिने, जीवनसत्त्वे व खनिजे असतात. त्यामुळे त्यांचा वापर आहारात पालेभाज्या म्हणून करता येवू शकतो.
वेगवेगळ्या प्रकारच्या तृणधान्य पिकांच्या प्रथिने, अमिनो आम्ल व इतर खनिजांच्या दृष्टिकोनातून गुणवत्ता वाढविण्यासाठी राजगिरा पिकाचा अतिशय चांगला उपयोग होतो. राजगिरा पिकामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅश व लोह या खनिजांची अधिक मात्रा आढळते. तसेच या पिकापासून लाह्या बनविता येतात. या पिकाच्या दाण्याचे आहारसंदर्भातील बरेचशे गुणधर्म हे तृणधान्य पिकांसारखे असल्यामुळे याला "सुडोसिरीयल" (आभासी तृणधान्य) असे संबोधतात. या पिकाच्या दाण्यांना असलेल्या विशिष्ट गुणधमांमुळे या पिकाचा विविध प्रक्रिया उद्योगात वापर केला जातो. तसेच आहाराच्या दृष्टीकोनातून देखिल अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
जमीन
या पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मध्यम ते भारी काळी कसदार जमिनीची निवड करावी. हलकी अथवा भरड, पाणथळ, चोपन व क्षारयुक्त जमीन लागवडीसाठी निवडू नये.
पूर्वमशागत
लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची खोल नांगरट करावी व कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. शेणखत दिले नसल्यास पाच टन चांगल कुजलेले शेणखत जमिनीमध्ये मिसळावे.
बियाणे व पेरणी
राजगिरा पिकाची लागवड खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात करता येते. या पिकास स्वच्छ, अधिक सुर्यप्रकाश व उबदार हवामान मानवते. पीक वाढीच्या सुरूवातीच्या काळात थंडी पडल्यास किंवा कमी तापमान या पिकास हानीकारक आहे. नैऋत्य मान्सुनचा चांगला पाऊस झाल्यावर वापसा येताच पेरणी लवकर करावी. पाण्याची सोय असल्यास जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्यात पेरणी करता येते. रब्बी हंगामामध्ये या पिकाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत करावी. पेरणीकरीता जास्त उशीर झाल्यास सुरूवातीच्या काळात कमी तापमामुळे पिकाची वाढ कमी वेगाने होते.
बियाण्यांची पेरणी करतांना बियाणे १ ते २ सें.मी. पेक्षा जास्त खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे उगवण योग्य वेळेत व चांगल्या प्रकारे होते. पेरणी करतांना साधारणपणे दोन ओळींतील अंतर ४५ सें.मी. व दोन रोपांतील अंतर १५ सें.मी. एवढे राहील. या पद्धतीने पेरणी करावी. राजगिरा पिकाच्या पेरणीसाठी हेक्टरी १.५ ते २.० किलो सुधारीत बियाणे वापरावे.
सुधारीत वाण
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांनी विकसित केलेल्या "फुले कार्तिकी " या वाणाचे रब्बी हंगामात १६५१ किलो/हे. एवढे सरासरी उत्पन्न मिळते. तसेच या पिकापासून सुधारीत तंत्राचा अवलंब केल्यास २५ ते ३० क्विं /हे. उत्पादन मिळू शकते. या वाणाचे कणीस लांबट व पिवह्या रंगाचे असून दाण्यांचा रंग पांढरट पिवळा आहे. रब्बी हंगामात या वाणाची लागवड करणे अधिक फायदेशीर आहे.
विरळणी
पीक पेरणीनंतर पहिली विरळणी १० ते १५ दिवसांनी व दुसरी विरळणी २५ ते ३० दिवसांनी करावी. विरळणीनंतर साधारणपणे १.५० लाख / हेक्टर पर्यंत झाडांची संख्या ठेवावी. पेरणीनंतर ३.५ व ८ व्या आठवड्यामध्ये कोळपणी केल्यास चिकवाढीस फायदा होतो व शेत तणविरहीत राहण्यास मदत होते.
खत व्यवस्थापन
या पिकांमध्ये रासायनिक खतांचा वापर ६० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, २० किलो पालाश व २० किलो गंधक प्रति हेक्टर या प्रमाणात करावा. यासाठी हेक्टरी १०० किलो डिएपी, १०० किलो युरिया व ३५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी व उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर ३ ते ४ आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर द्यावे.
पाणी व्यवस्थापन
राजगिरा पिकास पिकाचा जोमदार वाढीचा काळ (२५ ते ४० दिवस), फुलोऱ्यात येण्याचा काळ (५० ते ६० दिवस) व दाणे भरण्याचा काळ (९० ते १०० दिवस) या चार अवस्थेत आवश्यकतेप्रमाणे पाणी द्यावे.
आंतरमशागत
खरीप हंगामात तणांचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे दोन खुरपण्या पेरणीनंतर तिसऱ्या व पाचव्या आठवड्यानंतर कराव्यात. पिकाच्या जोमदार वाढीसाठी शेत सुरवातीपासूनच तणविरहीत ठेवावे. तुलनेने रब्बी हंगामात खरीप हंगामापेक्षा तणांचा प्रादुर्भाव कमी असतो. त्यामुळे पीक वाढीच्या सुरवातीच्या काळात म्हणजेच दुसऱ्या ते चौथ्या आठवड्यापर्यंत शेत तणविरहीत ठेवावे.
काढणी
साधारणपणे ११० ते १२० दिवसांमध्ये पीक काढणीसाठी तयार होते. पीक ओलसर असतांना काढू नये. कणसातील फुलोऱ्याचा रंग पिवळसर झाल्यानंतर पीक काढणीसाठी तयार झाले असे समजावे. कणसांची कापणी करून मळणी व दाण्यांची स्वच्छता सहजपणे करता येते. काढणीस उशीर झाल्यास दाणे शेतात झडू शकतात.
बाजारभाव
राजगिरा पिकास साधारणपणे रू.५० ते ७० प्रति किलो या प्रमाणे बाजारभाव मिळतो. त्यानुसार हेक्टरी रू.१,२५,०००/- पर्यंत आर्थिक उत्पन्न मिळते. या पिकावरील पूर्व मशागत, बियाणे, पेरणी, खते, खुरपणी, काढणी, मळणी व इतर कामे या बाबतचा खर्च वजा जाता या पिकापासून साधारणपणे एकुण मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नाच्या ६० टक्के नफा मिळतो.
क्षमता असलेल्या पिकांवरील अ.भा.सं.स. प्रकल्प,
वनस्पतीशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
०२४२६-२४३२४९