पूर्वी तसेच आताही उसाची लागवड टिपरी, एक डोळा व दोन डोळे, तीन डोळे अशा पद्धतीने केली जात आहे. या पद्धतीची लागवड करताना शेतकरी एका एकरातून अधिकाधिक ऊस मिळावा म्हणून दोन टिपऱ्यांत एक फुट अंतराची शिफारस असताना प्रत्यक्षात समोरासमोर म्हणजे टक्कर पद्धतीने लावतो आहे.
त्यातून टिपरी म्हणजे बियाणे अधिक लागते. त्यातून खर्चही वाढतो. आताच्या ऊसाला मिळणारा भाव पाहता, लागवडीसाठी प्रति एकरी तीन ते चार टन बियाणे वापरणे ही परवडणारी बाब नाही. त्याचप्रमाणे लागवड करणाऱ्याचाही खर्च विनाकारण वाढणारा आहे.
निर्सार्गाच्या लहरीपणावर मात करून ऊसाचे उच्चांकी उत्पादन काढण्यासाठी ठिबक सिंचनावर रोपांद्वारे लागवड करून १०० टक्के रोपांची लागवड खूप फायदेशीर ठरणार आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे टिपरीद्वारे केलेली लागवड हि अनेकदा लागवडीनंतर उगवण न झाल्याने पुन्हा सांधावी लागते. त्यातून खर्च वाढत जातो. शिवाय सांधलेल्या ऊसाची मुळ ऊसाशी बरोबरी करण्यात खूप वेळ लागतो.
शिवाय लागवड करताना अलीकडे मजुरांचा वाढलेला खर्च लक्षात घेता, निरोगी व उत्तम प्रतीची रोपे शेतकऱ्याचे एक कुटुंब घरच्या घरी लागवड करू शकते. निरोगी व उत्तम प्रतीची रोपे शेतकऱ्यांनाही तयार करता येऊ शकतात.
रोप लागवडीचे अंतर आणि एकरी रोपे संख्यापाच बाय दोन फुट अंतरावर लागवड : ४३५६ रोपेपाच बाय अडीच फुट अंतरावर लागवड : ३४८४ रोपेपाच बाय तीन फुट अंतरावर लागवड : २९०० रोपेयात लागवडीतले अंतर जेवढे वाढेल, तेवढे ऊसाचे वजन वाढत जाते. कारण ऊसाच्या बांधणीपर्यंत फुटव्यांची संख्या मर्यादित राहून सूर्यप्रकाश, मोकळी जागा अधिक मिळते. फुटव्याचे ऊसात रुपांतर झाल्याने दिली गेलेली अन्नद्रव्ये मोजक्याच ऊसाला मिळाल्याने त्याचे वजन वाढून तो सुदृढ बनतो. कारखान्यास तुटला जाणारा ऊस अधिक वजनदार बनतो. त्यामुळे जरी लागवडीची रोपे कमी झाली, तरी पर्यायाने अंतर व खेळती हवा अधिक मिळून त्याचा उत्पादनासाठी फायदाच होतो.
रोपांद्वारे कशी कराल लागवड - शेताची चांगल्या प्रकारे मशागत झाल्यानंतर साध्या पद्धतीने पाच फुट बाय पाच फुट अंतरावर मध्यम खोलीची सरी काढून घ्यावी.- या सरीमध्ये उपलब्ध असलेले कुजलेले शेणखत, कंपोस्ट खते टाकावे.- एकरी प्रत्येकी तीन किलो अझॅटोबॅक्टर, स्फुरद विरघळविणारे जीवाणू व पालाश उपलब्ध करणारे जीवाणू मिसळून घ्यावेत.- ठिबक सिंचन पद्धतीने केल्या जाणाऱ्या लागवडीसाठी पाच फुट अंतरावर सोळा ते अठरा एम.एम. जाडीची उपनळी टाकावी.- हलक्या ते मध्यम जमीनीत चाळीस सेंटीमीटर अंतरावर ताशी ४ लिटर पाणी टाकणारा इनलाईन ड्रीपर असावा.- भारी जमीनीत पन्नास सेंटीमीटर अंतरावर ताशी ४ लिटर पाणी टाकणारा इनलाईन ड्रीपर असावा.- रोपांची लागवड करण्यापूर्वी ठिबक सिंचन चालवावे, म्हणजे मध्यम ते हलक्या जमीनीत एकरी ५० हजार लिटर पाणी तर भारी जमीनीत ४४ हजार लिटर पाणी द्यावे.- वाफसा आल्यानंतर कुदळीने दोन फुट अथवा अडीच फुट अथवा तीन फुट अंतरावर गल घेऊन रोपांची लागवड करावी.- यानंतर दिवसातून एक वेळ दोन तास ठिबक सिंचन प्रणाली चालू ठेवावी.