जागतिक तापमान वाढीमुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. त्याचाच परिणाम टोमॅटो पिकावर दिसून येतो. टोमॅटो पिकाला सुरवातीच्या अवस्थेत रस शोषक किडीपासून वाचविण्यासाठी प्रोटेक्शन पेपरचा अवलंब फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे विषाणूजण्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मदत होते. परिणामी शेतकऱ्यांचा होणारा तोटा कमी करून चांगले उत्पादन घेण्यास मदत मिळेल.
विषाणूजन्य रोंगापासून व किडींपासून भाजीपाला पिकाला वाचवण्यासाठी प्रोटेक्शन पेपर तंत्रज्ञान
- टोमॅटो रोपांची गादीवाफा, मल्चिंग पेपर व ठिबकसिंचन प्रणालीचा वापर करून लागवड करावी.
- रोप लागवडीनंतर १० दिवसांनी गादीवाफ्यावर १० फूट अंतरावर अर्धा इंचची पी. व्ही. सी. पाईप किंवा दहा एम.एम. जातीचे गज अर्धागोल करून बसवावेत. गजाची लांबी आठ फूट असल्यास साधारणतः तीन फूट उंचीचा अर्धगोल तयार होतो.
- प्रोटेक्शन पेपर (नॉनवुव्हन पॉलीप्रोपीलीन पेपर) बंडल ८ फूट रूंदीचा ५०० मीटर लांबीमध्ये बाजारामध्ये पांढर्या रंगामध्ये उपलब्ध आहेत.
- हा प्रोटेक्शन पेपर लोखंडी गजाच्या अर्धागोलांवर संपूर्ण बेडवर अंथरून घ्यावा आणि या पेपरच्या दोन्ही बाजू बेडच्या शेजारी मातीमध्ये गाडून टाकाव्यात किंवा १० फूटावर डांब रोवून ३ फूट उंचीवर तार ओढावी व त्यावरून पेपर अंथरून घ्यावा. डांबाची उंची ३ फूटापर्यंतच ठेवावी.
- पूर्ण बेडवर प्रोटेक्शन पेपरचे हे आच्छादन तयार होते.
- प्रोटेक्शन पेपरच्या आच्छादनामुळे रोपांचे रसशोषक किडी व इतर किडींपासून संरक्षण होते. रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
- हे आच्छादन ३५ ते ४० दिवसांपर्यंत ठेवायचे आहे. त्यामुळे हरितगृह परिणाम तयार होतो. रोपाची जोमदार वाढ होते. ४० दिवसांपर्यंत भरपूर फांद्या येतात आणि फुलधारणेला सुरूवात होते. सशक्त व निरोगी झाड तयार होते. कडक सूर्यप्रकाश, जोरदार वारे यापासून संरक्षण होते.
- चाळीस दिवसांनंतर हे आच्छादन काढून घ्यावे. पेपर व्यवस्थित गुंडाळून ठेवावा. पुढील हंगामामध्ये तो पुन्हा वापरता येऊ शकतो.
- चाळीस दिवसापर्यंत पेपर एका बाजून उघडून किड-रोगांच्या प्रादुर्भावाचे अवलोकन करावे आणि गरज भासल्यास बुरशीनाशक, किटकनाशक किंवा कोळीनाशकाची फवारणी करावी.
- पेपर काढून घेतल्यानंतर तारकाठी पद्धतीने डांब व कारव्या वापरून टोमॅटो पिकाची बांधणी करावी. आणि किड-रोग प्रतिबंधात्मक फवारणी करावी. पिवळे, निळे व पांढरे चिकट सापळे लावावेत.
- जीवामृत, जैविक खते किंवा स्लरीचा नियमित वापर करावा. त्यामुळे झाडामध्ये किड-रोग प्रतिकारशक्ती तयार होते.
- बांधणीनंतर फुलधारणा, फळधारणा व फळवाढीचा कालावधी ३० ते ३५ दिवसांचा असतो. म्हणजेच रोप लावण्यापासून ६५ ते ७० दिवसांनी फळे काढणीसाठी तयार होतात.
प्रा. राहुल घाडगे, प्रा. भरत टेमकर
विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव (पुणे II)