आता हळद काढणीचा हंगाम सुरू होत आहे. हळद काढणी करताना कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी शास्त्रीय पद्धतीने हळद काढणी करावी, हळदीच्या हळव्या जातींना तयार होण्यास लागवडीपासून सहा ते सात महिने लागतात (उदा. आंबे हळद, आयआयएसआर-प्रगती), निम गरख्या जाती या सात ते आठ महिन्यांत काढणीस येतात (उदा. फुले स्वरूपा), तर गरव्या जाती आठ ते नऊ महिन्यांमध्ये काढणीस तयार होतात (उदा. सेलम, कृष्णा). त्यामुळे जातीपरत्वे कालावधी पूर्ण झाल्याशिवाय पाला कापू नये.
अधिक वाचा: आता हळद काढणीला येईल लवकर; करा या तंत्रज्ञानाने लागवड
अशी करा हळद काढणी
- जमिनीच्या पोताप्रमाणे माळरानाच्या हलक्या जमिनीमध्ये ८० ते ९० टक्के पाने पिकाचा कालावधी पूर्ण होते. वेळी वाळलेली असतात तर मध्यम व भारी जमिनीमध्ये ६० ते ७० टक्के पाने वाळलेली असतात. सदरचे लक्षण हे हळद पीक काढण्यापूर्वीचे पीक परिपक्वतेचे मुख्य लक्षण आहे.
- हळदीच्या काढणी अगोदर १५ ते ३० दिवस पाणी देणे बंद करावे. पाणी बंद करताना प्रथम पाणी थोडे थोडे कमी करून नंतर पाणी बंद करावे. त्यामुळे पानातील अन्नरस कंदामध्ये लवकर उतरण्यास मदत होते. हळकुंडाला वजन, गोलाई आणि चकाकी येते. पाणी शेवटपर्यंत चालू ठेवले तर हळकुंडांना नवीन फुटवे फुटू लागतात. त्यामुळे उत्पादन घटते.
- पाला वाळल्यानंतर एक इंच जमिनीच्या वर खोड ठेवून धारदार विळ्याच्या साह्याने हळदीचा पाला कापावा, पाला बांधावर गोळा करावा, शेत चार ते पाच दिवस चांगले तापू द्यावे, त्यामुळे हळदीच्या कंदामध्ये असलेल्या पाण्याच्या अंशामुळे जमीन साधारणपणे भेगाळली जाते. त्यामुळे हळदीची काढणी करणे सुलभ होते.
- हळद लागवडीच्या पद्धतीनुसार हळद काढणीची पद्धत अवलंबवावी. सरी वरंबा पद्धतीत टिकाव अथवा कुदळीच्या साह्याने हळदीची खंदणी करावी, तर गादी वाफा पद्धतीत ट्रॅक्टर चलित हळद काढणी यंत्राचा वापर करावा.
- हळदीची काढणी करते वेळी जमीन पूर्णपणे वाळली असल्यास हलके पाणी द्यावे. परिणामी, हळद काढणी करणे सोपे होते.
- खंदणी करून काढलेले कंद २-३ दिवस सूर्यप्रकाशात चांगले तापू द्यावेत. त्यामुळे कंदास चिकटलेली माती पूर्णपणे निघण्यास मदत होते.
- दोन ते तीन दिवसानंतर हळदीच्या कंदांची मोडणी करावी. कंदांचा गडा आपटल्यास हळकुंडे व गड्डे एकमेकांपासून वेगळे होतात. त्यावेळी मात्र जेठे गड्डे, बगल गड्डे, हळकुंडे, सोरा गड्डा, कुजकी हळकुंडे अशी प्रतवारी करावी.
- डॉ. पी.जी.पाटील
कुलगुरु, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
अधिक वाचा : हळद पिकातील पूर्वमशागतीचे असे करा व्यवस्थापन