राज्यातील कृषी व कृषी संलग्न शिक्षण व्यावसायिक पदवी •अभ्यासक्रमांची केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया उद्या, २४ जून २३, शनिवारपासून सुरू होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी तसेच संबंधित अभ्यासक्रमाशी निगडित इतर राष्ट्रीय प्रवेश परीक्षा दिल्या आहेत, अशांना सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज दाखल करता येणार आहे.
नऊ जुलैपर्यंत अर्ज व नोंदणीची मुदत आहे. सीईटीच्या गुणानुसार कृषी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया होत आहे. अनेकवेळा माहितीपुस्तिका न वाचताच विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सबमिट होण्यास अडथळे येतात. विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेची माहितीपुस्तिका वाचूनच अर्ज दाखल करावा, असे आवाहन कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले.
'त्या' महाविद्यालयांनाच पसंती द्यावीमहात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत दहा जिल्ह्यांमध्ये कृषी महाविद्यालये आहेत. या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी अर्ज करताना संबंधित कृषी महाविद्यालयांना प्रवेशासाठी पसंती दिली, तर त्यांना ७० टक्के आरक्षित प्रवेशाचा लाभ मिळणार आहे.
कृषी महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. बारावी सायन्सच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी संबंधित संकेतस्थळावर परिपूर्ण कागदपत्रांसह ऑनलाईन नोंदणी व अर्ज दाखल करावेत, असे आवाहन डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, सहयोगी अधिष्ठाता, प्राचार्य राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर यांनी केले आहे.