एप्रिल-मे महिन्यात वाढत असलेल्या अधिक तापमानामळे व तीव्र सूर्यप्रकाशामुळे व जमिनीतील उपलब्ध कमी पाण्यामुळे (म्हणजेच वातावरणाचे तापमान ४० अंश से.गे. च्या पुढे जाते) केळीच्या झाडांची प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते तसेच तीव्र सूर्यप्रकाशामुळे पानांची पश्चिमेकडील कडा करपल्या जाते.
तसेच तापमान जेव्हा ४५ अंश से.गे. च्या पुढे जाते त्या वेळेस केळीच्या झाडांचे पाण्याचे उत्सर्जन बाष्पीभवनामुळे वेगाने होते व झाडांमधील विकर (enzymes) आणि संप्रेरकांची (hormones) ची कार्यक्षमता कमी होवून नष्ट झाल्याचे दिसुन येते. जमिनीचे तापमान वातावरणाच्या तापमानापेक्षा २-३ अंश से.गे. अधिक झाल्याचे दिसून येते त्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होतो व त्यामुळे झाडांची अन्नद्रव्य शोषून घेण्याच्या क्रियेवर विपरीत परिणाम होवून मुळांची वाढ खुंटते.
वातावरणातील आर्द्रता जवळपास १० ते २० टक्के पर्यंत सुध्दा कमी होते. यासर्व बाबींचा परिणाम केळीच्या एकूण वाढीवर, वाढ खुंटणे, घड बरोबर निसवण न होणे, जे काही घड निसवण झाले त्याच्या वरच्या बाजुच्या फण्या तीव्र सूर्यप्रकाशामुळे करपल्या जाते. अधिक तापमानामळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी होते, बाष्पीभवनाचा वेग वाढतो त्यामुळे याचा परिणाम झाडांच्या वाढीवर तसेच घड पोसण्यावर होतो.
केळी बागेसाठी उपाययोजना
- मृगबाग केळीला मे महिन्यात कमीत कमी २०-२२ लिटर पाणी प्रति झाड प्रति दिन द्यावे तर कांदबागेसाठी कमीत कमी १०- १४ लिटर पाणी प्रति झाड प्रति दिन द्यावे.
- जळगाव येथील केळी संशोधन केंद्राच्या शिफ्फारसीनुसार उन्हाळयात बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी, जमिनीतील पाण्याचा अंश कायम राखण्यासाठी व तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केळी बागेस आच्छादन करणे आवश्यक आहे. यासाठी ३० मायक्रॉन जाडीचे चंदेरी किंवा काळ्या रंगाचे पॉलिथीन आच्छादन मृग बागेत दोन ओळीच्या मोकळ्या जागेत नोव्हेंबर महिन्यात टाकण्यात यावे. यामुळे जमिनीचे तापमान थंडीत टिकून राहते व उन्हाळयात वातावरणातील तापमानापेक्षा २ ते ३ अंश सेल्सिअसने कमी राहते तसेच घड सटकणे व झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाण सुध्दा कमी होते. पॉलीथीनच्या कापडाचे आच्छादन शक्य नसल्यास बागेमध्ये उसाचे पाचट, गहू किंवा सोयाबीनचा भूसा यांचा आच्छादन म्हणून वापर करता येतो. यामुळे बाष्पीभवनाचा वेग मंदावतो व जमिनीतील ओलावा टिकून राहतो.
- केळीच्या पानांतून मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन कमी करण्यासाठी उन्हाळयात १५ दिवसाच्या अंतराने ८ टक्के केओलिनची केळी झाडांवर फवारणी करावी (८० ग्रॅम प्रति लिटर पाणी). या फवारणीमुळे केळीच्या पानांवर पांढरा थर तयार होतो व हा थर पानांतील छिद्रांना अंशतः बंद करतो.
- बागेभोवती गजराज गवत लागवड केली नसल्यास ज्वारीच्या मळ्याच्या किंवा केळीच्या कोरड्या पानांच्या ताट्या तयार करून बागेभोवती बांधाव्या किंवा ७५ टक्के ची शेडनेट बागे सभोवताली बांधावी.
- जर शेतकऱ्यांकडे भांडवल असेल तर १.५ ते २ मीटर उंचीची शेडनेट, शेवरी कुंपणाच्या बाहेरच्या बाजूने बांबूच्या साहाय्याने लावावी.
- जळगाव येथील केळी संशोधन केंद्राच्या शिफारसीनुसार उन्हाळयात केळी पिकाच्या पोषणासाठी घड निसवण्याच्या तसेच घड पक्वतेच्या अवस्थेत असलेल्या मृग बागेस हजार झाडांसाठी १२ आठवड्यापर्यंत प्रति आठवडा ५.५ किलो युरिया आणि ६.७० किलो म्युरेट ऑफ पोटॅश तर मुख्य वाढीच्या अवस्थेत असलेल्या कांदे बागेस १३ किलो युरिया आणि ८.५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हजार प्रति आठवडा फर्टीगेशनव्दारे द्यावे.
- केळीचा घड पूर्ण निसवल्यानंतर तसेच केळ कमळ तोडल्यानंतर १० लिटर पाण्यात ५० ग्रॅम पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट अधिक १०० ग्रॅम युरियाची स्टिकर सोबत घडावर फवारणी करावी. यामुळे घडातील केळीची जाडी वाढून घडाच्या वजनामध्ये वाढ होते.
- केळीच्या घडांना तीव्र सूर्यप्रकाशाच्या किरणापासून संरक्षण करण्यासाठी पॉलिप्रापॅलिन प्रकारच्या स्कटिंग बॅग किंवा वाळलेल्या केळीच्या निरोगी पानांनी ते झाकावे.
- पक्वतेच्या अवस्थेत असलेल्या घडांना आधार देणे आवश्यक आहे. त्यासाठी घडांना बांबू किंवा पॉलीप्रोपॅलीन पट्टीचा आधार द्यावा.
- खोडाभोवती लोंबकळणारी रोग विरहित वाळलेली अथवा पिवळी पडलेली पाने कापू नये. त्यामुळे खोडाचे उष्ण वाऱ्या पासुन संरक्षण होईल.
- बाग तणमुक्त ठेवावी. मुख्य खोडालगची पिले धारदार विळ्याने कापून पिले व तणे खोडाजवळ आच्छादन म्हणून वापर करावा.
- केळी उत्पादकांना पाण्याअभावी केळीची कापणी न करताच केळी बागा मे-जून महिन्यात सोडाव्या लागतील अशा वेळेस बागा कापणी न करता त्या बागेची पिल बाग घ्यावी.
अधिक वाचा: माती व पिकांसाठी अमृत असणारं हे जीवाणू खत कसे बनवाल?