शेतकऱ्यांनी किमान एकुण ७५-१०० मिमी पाऊस पडला असल्यास किंवा पावसामुळे जमिनीत ५ ते ६ इंचापर्यंत ओल झालेली असल्यास सोयाबीन पिकाची पेरणी करावी. वेगवेगळ्या कलावधीत पक्व होणाऱ्या २-३ शिफारस केलेल्या वाणांची पेरणीसाठी निवड करावी.
सोयाबीन बियाण्याच्या उगवण क्षमतेप्रमाणे (किमान ७०% उगवण क्षमता) पेरणीसाठी ६२-२५ किलो/हे बियाणे दर वापरावा. पीक उभे असताना व त्याच्या वाढीच्या काळात अतिवृष्टी तसेच पाण्याचा ताण किंवा पावसाचा खंड पडल्यास पीक वाचविण्यासाठी रुंद सरी वरंबा (BBF) किंवा सरी-वरंबा पद्धतीने सोयाबीनची पेरणी करावी.
बुरशीनाशक व कीटकनाशकाची बीज प्रक्रिया
पेरणी करताना, बियाण्यास प्रथम शिफारस केलेल्या पूर्व मिश्रित बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी, जसे की अझोक्सीस्ट्रोबिन २.५% + थायोफेनेट मिथाइल ११.२५% + थायमेथॉक्सम २५% एफएस @ १० मिली प्रती किलो बियाणे किंवा पेनफ्लुफेन + ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोबिन (१ मिली प्रती किलो बियाणे) किंवा थायरम ३ ग्रॅम प्रती किलो बियाणे किंवा थायरम + कार्बेन्डाझिम (२:१) @ ३ ग्रॅम प्रती किलो बियाण्यास किंवा कार्बोक्जिन ३७.५% + थायरम ३७.५% (व्हिटावैक्स पॉवर) ३ ग्रॅमची प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी. ते थोडा वेळ हवेत सुकू द्यावे आणि नंतर कीटकनाशक जसे की थायामेथोक्सॅम ३० एफएस (१० मिली/किलो बियाणे) किंवा इमिडाक्लोप्रिड ४८ एफएस (१.२५ मिली/किलो बियाणे) ची प्रक्रिया करावी. या शिवाय बियाण्यास ट्रायकोडर्मा व्हिरिडीची सुद्धा ८-१० ग्रॅम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी
बियाण्यास जैविक खतांची बीज प्रक्रिया
बुरशीनाशक आणि कीटक नाशकाची प्रक्रिया केल्या नंतर बियाण्यास ब्रेडीरायझोबियम जापोनिकम आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू यांची २५० ग्रॅम/१० किलो बियाण्यास पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी. त्यासाठी वरील जिवाणू खते १ लीटर पाण्यात मिसळून त्याचे गाढ द्रावण तयार करावे, एक हेक्टरसाठी लागणाऱ्या ६५ ते ७० किलो बियाण्यास हे हलक्या हाताने चोळून लावावे किंवा हे द्रवरूपात असतील तर १०० मिलि प्रती १० किलो बियाण्यास लावावे. थोडा वेळ सावलीत सुकल्यानंतर ताबडतोब पेरणी करावी.
खते व अन्नद्रव्ये व्यवस्थापन
- सोयाबीनच्या पिकास पेरणीच्या वेळी प्रति एकरसाठी ८ किलो नत्र, २४-३२ किलो स्फुरद आणि ८ किलो पालाश (२० किलो नत्र, ६० ते ८० किलो स्फुरद. २० किलो पालाश प्रति हेक्टरी) यांची शिफारस केलेली मात्रा, DAP ४५ किलो, SSP ७० किलो व MOP १६ किलो यांच्याद्वारे द्यावी.
- त्याचप्रमाणे प्रतिएकरसाठी १० किलो झिंक सल्फेट आणि ४ किलो बोरॅक्स आणि १२ किलो गंधक पेरणीच्या वेळी द्यावे.
- पेरणीच्या वेळी खते बियाण्याच्या खालीच पडतील व त्यांचा बियाण्याशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी.
- या पिकास नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशियम, गंधक, कॅल्शियम, मॉलिब्डेनम, बोरॉन, लोह, जस्त व मँगेनीज ही अन्नद्रव्ये वाढीसाठी, फूल धारणेसाठी व शेंगात दाणे भरण्यासाठी आवश्यक असतात.
- पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना विद्राव्य खते पाण्यासोबत पानांवर फवारून पिकास द्यावीत. त्यासाठी बाजारात अनेक विद्राव्य खते उपलब्ध आहेत (19:19:19 व 00:52:34 इ.) त्यांचा शिफारशीप्रमाणे वापर करावा.
रासायनिक तणनाशकाचा वापर
तणनाशके वापरून वेळीच तणांचा बंदोबस्त करता येतो. सोयाबीनमधील तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर लगेच (बी उगवण्यापूर्वी) वापरवायचे तणनाशक वापरुन तण नियंत्रणासाठी उपाययोजना करावी.
१) पेंडिमेथिलीन ३० ईसी - प्रती हे. - ३.३ ली
२) डिक्लोसुलाम ८४% डब्ल्यूडीजी - प्रती हे. - ३२ ग्रॅम
यांपैकी एका तण नाशकाची एक हेक्टरची दिलेली मात्रा ५०० ते ७०० ली. हे पाण्यामध्ये मिसळून पेरणीनंतर ताबडतोब परंतू ४८ तासांच्या आत हुड लावलेल्या फवारणी पंपाने जमिनीवर फवारावी.
आघारकर संशोधन संस्था, पुणे
भा.कृ.सं.प. अखिल भारतीय समन्वित सोयाबीन संशोधन योजना