उत्पादन वाढविण्यासाठी भातशेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या निविष्ठांचा चांगला व पुरेपूर वापर कसा करता येईल तसेच पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्यांचा वापर करून आवश्यक असणारी अन्नद्रव्ये वेळेवर व योग्य प्रमाणात उपलब्ध कसे करून देता येतील याचा तांत्रिकदृष्ट्या विचार होणे गरजेचे आहे.
अन्नद्रव्यांचा वापर करीत असताना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पिकांच्या अवशेषांचा वापर होणेही कमप्राप्त आहे. याचबरोबर प्रति हेक्टर क्षेत्रामध्ये नियंत्रीत पद्धतीने लागवड करुन रोपांची संख्या मर्यादित ठेवणे गरजेचे आहे.
भात पेंढ्यातील पालाश व सिलीकॉन अन्नद्रव्याचा फेरवापर
• नत्र व स्फुरद या दोन प्रमुख आवश्यक अन्नद्रव्यानंतर भात पिकाच्या चांगल्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर लागणारे पालाश हे तिसरे आवश्यक अन्नद्रव्य आहे.
• सिलीकॉन हे अन्नद्रव्य पिकाच्या वाढीसाठी आवश्यक नसले तरी भात पिकाच्या निरोगी वाढीसाठी व वाढीव उत्पादनासाठी महत्वाचे पोषक अन्नद्रव्य आहे. सिलीकॉनच्या अभावी भात नत्र खताचा कार्यक्षमरित्या उपयोग करू शकत नाही आणि रोगकिडीस लवकर बळी पडते.
• थोडक्यात भात पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी नत्र, स्फूरद व इतर अन्नद्रव्यांचा पुरवठा करताना पुरेशा पालाशचा आणि सिलीकॉनचा योग्य प्रमाणात पुरवठा करणे जरूरीचे आहे.
• भात पिकाच्या दिर्घकालीन उत्पन्न वाढीसाठी भात पिकाने जमिनीतून घेतलेला पालाश व सिलीकॉन जमिनीस परत करणे म्हणजेच त्याचा फेरवापर करणे हा एक परवडणारा उत्तम उपाय असल्याने भात पिकातील पालाश व सिलीकॉन फेरवापरासाठी भाताचा पेंढा लावणीपूर्वी चिखलात गाडावा आणि भाताच्या तुसाची काळी राख रोप तयार करताना गादीवाफ्यात बी पेरणीपूर्वी मिसळावी.
• भाताच्या तुसाची काळी/काळसर रंगाची राख रोपवाफ्यात प्रत्येक चौरस मिटरला अर्धा ते १ किलो या प्रमाणात बी पेरण्यापूर्वी ४ ते १० सेंमी. खोलीपर्यंत मातीत मिसळावी.
• भाताचा पेंढा भात लावणीपूर्वी हेक्टरी २ टन या प्रमाणात शेवटच्या चिखळणीनंतर पसरावा आणि नंतर पायाने तूडवून चिखलात गाडावा. असे केल्याने हेक्टरी अंदाजे ३०-४० किलो पालाशचा व १२०-१४० किलो सिलीकॉनचा पूरवठा होऊ शकतो.
अधिक वाचा: भातशेतीमध्ये खतांवरील खर्च कमी करण्यासाठी वापरा या झाडाचा पाला