काही ठिकाणी हळद पिकाची पाने पिवळी पडत आहेत. जर पिवळेपणा वाढत गेल्यास हळदीचे पान हरितद्रव्य (अन्न) तयार करू शकणार नाही. त्यामुळे उत्पादनात घट होऊन हळदीची प्रत अथवा गुणवत्ता घटक जसे रंग, कुरकुमीनचे प्रमाण आदी बाबींवर देखील परिणाम होतो.
हळद पीक पिवळे पडण्याची नेमकी कारणे शोधून त्यावर योग्य उपाय करणे गरजेचे आहे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच एकात्मिक रोग कीड व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. हळद पिकाचे शेंड्याकडील पाने पिवळी पडून वाढ खुंटते. परिणामी हळद पिकाच्या पानांवर कायमस्वरूपी पिवळसरपणा दिसून येतो.
जमिनीमध्ये मातीच्या कणांची रचना बिघडल्यामुळे जमिनीची घनता वाढते म्हणजेच जमिनी घट्ट बनतात. अशा जमिनीत हवा, पाणी खेळण्याचे प्रमाण अत्यल्प असते. जमिनीमध्ये नत्र, मग्नेशिअम आणि लोहाच्या कमतरतेमुळे हळद पिकांची पाने पिवळी पडतात.
सततच्या पावसामुळे शेतातील अति ओलाव्याने पाने पिवळी पडतात. त्यासाठी शेतात पावसाचे पाणी जास्त दिवस साचू देऊ नये. यासाठी योग्य निचरा प्रणालीचा अवलंब करून अतिरिक्त पाणी शेतातून काढून देणे गरजेचे आहे.
अन्नद्रव्याची कमतरतालागवडीपासून ते काढणीपर्यंत वाणपरत्वे हळद पीक नऊ महिने शेतात राहते. हळद पिकाच्या उत्पन्नाचा स्रोत जमिनीत वाढणारे गड्ढे (कंद) असल्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांचा असा गैरसमज असतो की नत्रयुक्त खते जसे युरिया दिल्यास हळदीचे गड्डे खराब होतील. त्यामुळे हळद पिकास शिफारशीत, मात्रेत नत्रयुक्त खते मिळत नाहीत. जमिनीतील अन्नद्रव्ये जसे नत्र, मग्नेशिअम आणि लोह यांची कमतरता भासल्याने ही पाने पिवळी पडतात. नत्राच्या कमतरतेमुळे पाने लहान व फिक्कट हिरवी होतात. कधी कधी सरसकट पाने पिवळी दिसतात.
रोग किडींचा प्रादुर्भावरोग आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे हळदीची पाने पिवळी पडतात. करपा रोगामुळेसुद्धा पाने पिवळी पडतात. मात्र करपा रोगात पाने पिवळी पडून पानांवर तपकिरी रंगाचे ठिपके प्रथमतः खालच्या पानांवर पडतात.
उपाययोजनासुयोग्य जमिनीची निवड● हळद पिकाचा उत्पन्नाचा स्रोत जमिनीत वाढणारे गड्डे (कंद) असल्यामुळे हळद लागवडीसाठी मध्यम प्रतीची, भुसभुशीत व पाण्याचा चांगला निचरा होणारी, सेंद्रिय कर्बाचे जास्त प्रमाण असलेली जमीन निवडावी. जमिनीत गरजेपुरता सतत वाफसा असणे गरजेचे आहे.● भारी काळ्या जमिनीमध्ये अतिवृष्टी होऊन शेतात पाणी साचले असल्यास चर खोदून पाणी उताराच्या दिशेने शेता बाहेर काढावे. कॉपर ऑक्सिक्लोराईड २ ग्रॅम प्रती लिटर पाणी याप्रमाणे आळवणी किवा फवारणी करावी.● हळद लागवडीपूर्वी हळद बेण्यास जैविक (जीवाणूजन्य खतांची) बीजप्रक्रिया करावी. अझोस्पिरीलीम स्फुरद विरघळणारे जीवाणू प्रत्येकी १० ग्रॅम व्ह्याम २५ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात घेऊन त्यामध्ये हळद बेने १० ते १५ मिनिटे बुडवून लगेच लागवडीसाठी वापरावे. ही जीवाणूजन्य खते जमिनीद्वारे दिलेली रासायनिक खते हळद पिकाला सहज उपलब्ध करून देण्यास मदत करतात.
अन्नद्रव्यांचे सुयोग्य नियोजन● नत्राची कमतरता असल्यास युरिया २ टक्के (२० ग्रॅम प्रती लिटर पाणी) याप्रमाणे पानांवर फवारणी करावी. रासायनिक खतांचा वापर करताना नत्र अमोनिअम सल्फेटद्वारे, स्फुरद डाय अमोनिअम फॉस्फेटद्वारे आणि पालाश सल्फेट ऑफ पोटॅश द्वारे हळद पिकाला दिल्यास खतांची आणि पर्यायाने अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते, रासायनिक खते जमिनीच्या पृष्ठभागावर फेकून देऊ नयेत, ती जमिनीत पेरून मातीत मिसळून द्यावीत.● हळद पिकांची पाने लोहाच्या कमतरतेमुळे पिवळी पडल्यास पानांवर ५० ग्रॅम फेरस अमोनिअम सल्फेट अथवा फेरस सल्फेटची १० लिटर पाण्यातून ३ ते ४ वेळा फवारणी करावी. फवारणीसाठी लागणारी सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते चिलेटेड स्वरूपात असल्यास उपलब्धता वाढते. फवारणी करताना जमिनीत ओलावा असणे गरजेचे असते. चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्यांचे फवारणी करावी.
- डॉ. मनोज माळीप्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज