तूर हे खरीप हंगामातील एक प्रमुख दाळवर्गीय पीक आहे. मागील वर्षी तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. तूर पिकावरील मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता तसेच त्याचे प्राथमिक अवस्थेत व्यवस्थापन होण्याकरिता पेरणी अगोदर बीजप्रक्रिया करणे अत्यंत महत्वाची ठरू शकते.
तूर पिकामध्ये मर हा अत्यंत महत्वाचा रोग आहे, हा रोग फ्यूजारियम ऑक्सिस्पोरम (उडम) या बुरशीमुळे होतो. हा रोग जमिनीतून उदभवतो. हा रोग मुख्यतः पीक फुलोरा अवस्थेत असतांना तसेच शेंगा धरण्याचे कलावधीत आढळतो.
मागील पिकाचे अवशेषामध्ये बुरशीचे वास्तव्य असल्यास पुढील वर्षीच्या हंगामात हा रोग आढळून येतो. प्रादुर्भावग्रस्त झाडे मुलूल होतात. पिकास पाणी देऊनही पाण्याचे वहन या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे थांबल्याने झाडांच्या वरच्या भागात पाणी पोहचत नाही, त्यामुळे पाने पिवळी पडतात व नंतर झाड मरते.
झाडाची मुले उपटून पाहील्यास ते इतर सशक्त झडाप्रमाणेच असतात, परंतु मुळाचा उभा काप घेतल्यास त्यामध्ये मुळाचे झायलेम-उती काळी पडलेली आढळते, म्हणून तूर पिकावरील मर रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी खालील प्रतिबंधात्मक उपाय करावेत.
- पेरणीपुर्वी १० दिवस अगोदर एक एकर क्षेत्रफळाकरिता जमिनीमध्ये थोड्या प्रमाणात ओलावा असतांना २ किलो/लीटर ट्रायकोडार्मा २५ ते ३० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून जमिनीवर फेकावा म्हणजे मातीप्रक्रिया करावी.- त्यानंतर बीजप्रक्रिया करताना प्रथम रसायनिक बुरशीनाशक कार्बोक्झिन ३७.५ टक्के अधिक थायरम ३७.५ टक्के (संयुक्त बुरशीनाशक) ३ ग्रॅम व त्यानंतर ट्रायकोडर्मा ४ ते ५ ग्रॅम प्रती किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करावी.
अधिक वाचा: कापूस आणि सोयाबीन पिकांच्या खतांसाठी मिळणार अनुदान; इथे करा अर्ज