कांदा हे मुख्यतः हिवाळी हंगामातील पीक असल्याने या हंगामात लावलेल्या कांद्याची काढणी फक्त मार्च ते मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर होत असते आणि नंतर खरीप हंगामात (जुन-जुलै) लावलेला कांदा ऑक्टोबर-नोव्हेंबर शिवाय बाजारात विक्रीसाठी येवू शकत नाही.
उन्हाळ्यात भावाची होणारी चढ उतार थांबविण्यासाठी आणि गिऱ्हाईकाची मागणी ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत पुरविण्यासाठी हा उन्हाळी कांदा ४ ते ६ महिने चांगल्या परिस्थितीत साठविणे गरजेचे असते. तसेच कांदा पिक वातावरणातील कमी जास्त तापमानामुळे होणारी जातीपरत्वे वजनामध्ये २० ते २५% घट, कांद्याची सड १० ते १२%, कोंब येण्याचे प्रमाण १० ते १२ % यामुळे कांद्याचे उत्पादन व साठवण क्षमता वाढविण्यासाठी शेतकऱ्याला उपयुक्त असे कांदा काढणी व साठवण तंत्रज्ञान महात्मा फुले कृषि विद्यापीठाअंतर्गत विकसित करण्यात आलेले आहे.
कांदा काढणी तंत्रज्ञानकांदा काढणीपूर्वी ३ आठवडे अगोदर पिकाचे पाणी तोडावे. यामुळे पुढील ३ आठवड्यात कांदा पक्व होवून कांद्याची नैसर्गिकरित्या मान पडते व कांदा काढणीस तयार होतो. ५० % पानातील अन्नरस कांद्यामध्ये उतरुन कांदा घट्ट होऊ लागतो. या काळात कांद्याचा पापुद्रा पक्व होऊन कांद्याला चांगला रंग येतो व कांदा घट्ट होतो.
कांदा काढणी पश्चात तंत्रज्ञान१) पन्नास टक्के कांद्याच्या माना नैसर्गिकपणे पडल्यानंतरच कांदा काढणीस सुरुवात करावी.कांदा लागवडीनंतर १०० ते ११० दिवसांत काढणीस तयार होतो. कांदा पक्व झाला की नवीन पात येण्याचे थांबते. पातीचा रंग पिवळसर दिसू लागतो. याच वेळेस कांद्याच्या वरच्या पातीचा भाग मऊ होवून आपोआप वाळतो व पात कोलमडते. यालाच आपण मान पाडणे असे म्हणतो.
५० टक्के कांद्याच्या पाती पडल्यानंतर काढणी करावी. या काळामध्ये कांदा पक्व होवून कांद्यामध्ये साठवणुकीसाठी आवश्यक असणारे बदल घडून येत असतात. तसेच या काळात कांद्याच्या मानेची जाडी कमीत कमी असते.
अधिक वाचा: कोथिंबीरीपेक्षा धण्यात मिळतोय जास्त नफा, कशी कराल धणे लागवड
२) काढणीनंतर कांदा शेतात पातीसकट ३ ते ५ दिवस वाळविणेया कालावधीत कांदा पातीमध्ये निर्माण झालेले, साठवणूकीत कांद्याला सुप्तपणा देणारे संप्रेरक हे हळूहळू पातींमधुन कांद्यामध्ये उतरत असते. त्यामुळे पात सुकेपर्यंत कांदा शेतात वाळविणे गरजेचे असते. परंतु असा कांदा शेतात वाळविताना एक खबरदारी घेणे जरुरीचे असते. ती म्हणजे कांदा ढीग न करता, पहिला कांदा दुसऱ्या कांद्याच्या पातीने झाकला जाईल अशा पध्दतीने कांदे जमिनीवर एकसारखे पसरवून कांदा शेतात वाळविला पाहिजे.
३) कांद्याची मान ठेवून पात कापणेकांदा पात सुकेपर्यंत शेतात वाळविल्यानंतर प्रथम कांद्याच्या मानेला पीळ देवून ३ ते ५ से.मी. (एक ते दीड इंच) मान ठेवूनच कांद्याची पात कापावी. हा महत्वाचा टप्पा असून त्यामुळे पुढील काळात कांद्याचे तोंड पूर्णपणे बंद राहुन सूक्ष्म जीवाणूंच्या शिरकावामुळे कांदा सडणे, कांद्यातील पाण्याचे बाष्पीभवन होवून वजनात घट होणे, कांद्याच्या तोंडातून कांद्याला मोड येणे यासारख्या साठवणूकीतील नुकसानींना आळा बसतो. कांद्याला अजिबात मान न ठेवता, कांद्याचे तोंड उघडं ठेवून कांद्याची पात पूर्णपणे कापली तर कांदे साठवणुकीत टिकत नाहीत व मोठ्या प्रमाणावर नुकसान संभवते.
कांदा साठवण योजनामहात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी