शेतकऱ्यांनी रब्बी कांद्याचे उत्पादन दोन उद्देशाने घेतले पाहिजेत. एक म्हणजे त्याची साठवण क्षमता अधिक काळ असली पाहिजेत व दूसरे म्हणजे त्यामधे निर्यात गुणवत्ता स्पर्धात्मक असावी.
शेतकऱ्यांनी विशेषता अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी एप्रिल ते जून दरम्यान कमी प्रमाणात रब्बी कांदाबाजारात आणला पाहिजे. उर्वरित साविलेला कांदा ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान समप्रमाणात बाजारात आणला गेला पाहिजे.
कांदा काढणीनंतर सर्वाधिक नुकसान साठवणी दरम्यान होते. साठवणी दरम्यान होणारे नुकसान दोन प्रकारे कमी केले जाऊ शकते. एक म्हणजे कापणी पश्चात तंत्रज्ञानामधे सुधारणा करून व दूसरे म्हणजे शेतामधे कांदा पिकाची काळजीपूर्वक जोपासना करून.
कांद्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाय
- कांदा काढणीपूर्वी १०-१५ दिवस पाणी बंद केल्यास साठवणूकी मधे मायक्रोबियल क्रियाकलापांमुळे होणारे नुकसान कमी होते.
- कांद्याची वाढ पूर्ण होऊन पाने पिवळी पडून माना पडू लागल्याबरोबर पाणी तोडल्यास कांदा पोसतो, सड कमी होते व माना जाड होत नाहीत. तसेच वरचा पापुद्रा सुकून कांद्याला काढणीच्या वेळेस इजा होत नाही.
- याशिवाय, काढणीची वेळ कांद्याची साठवण क्षमता ठरण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पिकाची काढणी ५० टक्के माना मोडल्यानंतर करावी. कांद्याची पात पिवळी पडून कांदा मानेत वाकतो व पात आडवी पडते, यालाच मान मोडणे असे म्हणतात. या काळात पानांतील अन्नरस कांद्यामध्ये उतरून कांदा घट्ट होतो. कांदा पातीतील अन्नरस पात्यामधून कांद्यामध्ये उतरतो व तदनंतर कांदा सुप्त अवस्थेत जाऊन साठवणूक करण्यासाठी पक्व होतो.
- कांदा काढल्यानंतर तो शेतामध्ये पातीसह तीन दिवस सुकण्यास पडू द्यावा. ढीग न करता पहिला कांदा दुसऱ्या ओळीच्या कांद्याच्या पातीने झाकून जाईल अशा पद्धतीने जमिनीवर एकसारखा पसरवून ठेवावा. त्यानंतर कांद्याची पूर्ण सुकलेली पात २ ते ३ सें.मी. लांब मान ठेवून कापावी.
- त्यानंतर कांदा छपराच्या अथवा झाडाच्या सावलीत दोन-तीन आठवडे पातळ थरात वाळवावा. या काळात कांद्यातील उष्णता निवळून बाहेरून पत्ती सुटते, आकर्षक रंग येतो. तसेच वाळलेली मुळे व चिकटलेली माती गळून पडते व त्यामुळे साठवणीच्या काळात मायक्रोबियल संसर्ग होण्याची शक्यता कमी राहते.
- नंतर कांद्याची प्रतवारी करून सडलेले, मोड आलेले, जोडकांदे, चिंगळी कांदे काढून टाकावेत. अशा तऱ्हेने योग्य सुकविलेल्या कांद्याची प्रतवारी करून फक्त मध्यम आकाराचे एकसारखे कांद्याची साठवणूक करावी.
- ३० सें.मी. पेक्षा जास्त उंचीवरुन कांदा खाली पडल्यास त्याला दुखापत होते व त्यामुळे साठवणी दरम्यान मायक्रोबियल संक्रमणाचा धोका वाढतो. तसेच थेट उन्हामधे कांदा वाळविल्यास सनबर्निंग होऊ शकते.
- साठवलेला कांदा ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान समान प्रमाणात बाजारात आणला गेल्यास रब्बी शेतकऱ्यांना वाजवी बाजार भाव मिळू शकतो व त्याचबरोबर बाजारामधील किमंतीची होत असलेली अस्थिरता कमी होऊ शकते.
अधिक वाचा: Khodwa Us : उसाचा खोडवा ठेवणार असाल तर ह्या ६ गोष्टी करू नका; वाचा सविस्तर
- भाकृअनुप-राष्ट्रीय अजैविक स्ट्रैस प्रबंधन संस्थान माळेगाव, बारामती पुणे.