जमिनीचे विविध गुणधर्म आहेत. त्यातील अत्यंत महत्वाचा गुणधर्म म्हणजे जमिनीतील सेंद्रिय कर्ब जमिनीचा जिवंतपणा आणि जमिनीची सुपिकता कायम ठेवण्यास कारणीभूत असणारा जमिनीचा आत्मा, जमिनीची सच्छिद्रता, जिवाणूंची अभिक्रिया, अन्नद्रव्यांची उपलब्धता, जमिनीचे तापमान, जडणघडण, पिकांसाठी टाकण्यात येणाऱ्या खतांचे विघटन, या सर्वांना आवश्यक असणारा घटक म्हणजे सेंद्रिय कर्ब.
मागील काही वर्षात जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाणात लक्षणीय बदल होत असल्याचे निदर्शनास येत आहे. साधारणः जमिनीमध्ये १ ते १.५ टक्क्यांपर्यंत सेंद्रिय कर्ब असावा पण विविध कारणामुळे हा कर्ब दिवसेंदिवस कमी होत आहे. उष्ण व समशितोष्ण वातावरणामध्ये सेंद्रिय कर्बाचे जतन ही अत्यंत आव्हानात्मक बाब आहे आणि त्यामुळे जागतिक स्तरावर सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्याकरीता अथवा कायम ठेवण्याकरिता प्रयोग सुरु आहेत.
जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होण्याची कारणे१) सेंद्रिय निविष्ठांचा कमी वापर यात शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळखत, हिरवळीचे खते, जिवाणू खते, इ. चा कमी वापर.२) पिकांचे अवशेष जाळणे पिक निघाल्यावर पिकांचे अवशेष हे - जाळल्यामुळे काही अमूल्य जिवाणूसुध्दा जळून जाण्याची शक्यता असते.३) पिकांची फेरपालट न करणे एकाच जमिनीवर दरवर्षी एक प्रकारचे पिक घेतल्यास कर्बाचे प्रमाण असंतुलीत होते. पिकांना जमिनीची आणि जमिनीला पिकांची सवय जडू न देणे हाच त्यावरील उपाय.४) योग्य मशागत यात जमिनीची दर वर्षातुन करण्यात येणारी खोल नांगरट हे सेंद्रिय कर्बाचे ऑक्सिडेशन करण्यास मदत करते, त्यामुळे मशागत अयोग्य असल्यास कर्बाचे प्रमाण कमी होते. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे संतुलन बिघडण्यास कारणीभूत काही घटक आपण बघितले.
आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्ब कसा वाढवावा?१) सेंद्रिय निविष्ठाचा नियमित व जास्तीत जास्त वापर करणे.२) बियाणांना जिवाणू प्रक्रिया (बीजप्रक्रिया) करुनच पेरणी करणे.३) उताराला आडवी पेरणी करावी. त्यामुळे पाण्याचा अपधाव कमी होतो.४) पिकांची फेरपालट.५) पिकांचे अवशेषांचे मुळस्थानी योग्य व्यवस्थापन.६) माती झाकणाऱ्या पिकांची आंतरपीक म्हणून लागवड उदा. धैंचा, बोरु७) शेतातील बांधबंदिस्ती, जल व मृद व्यवस्थापन करणे.८) शेताच्या बांधावर गिरीपुष्प, शेवरी, उंबर, करंज, साधी बाभूळ इ. समान झाडांची लागवड करणे.
अधिक वाचा: मातीचा पीएच कसा सुधाराल?
सेंद्रिय कर्बाचे प्रमाण संतुलित राहिल्यास होणारे फायदे१) जमिनीची सच्छिद्रता वाढून जलधारणा क्षमता वाढते.२) जमिनीची घनता कमी होऊन पाण्याचा निचरा सुधारतो.३) जमिनीची जडण-घडण सुधारते.४) जमिनीमध्ये असणाऱ्या भेगा कमी होऊन जमिनीची धूप थांबते.५) जास्त पाऊस झाल्यास जमिन खरडून जाण्याची शक्यता कमी होते.६) जिवाणूंची संख्या वाढल्याने अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढीस लागते.७) पावसामध्ये खंड पडल्यास पिक तग धरुन राहण्यास सहनशील बनते.८) जमिनीचे तापमान संतुलित राहते.९) पिकाची उत्पादन क्षमता वाढीस लागते.
सेंद्रिय खते वापरताना लक्षात घेण्यासारख्या बाबी१) शेणखत चांगले कुजलेले असावे, अर्धवट कुजलेल्या शेणखतामुळे हुमणी व इतर किटकांचा प्रादुर्भाव जाणवतो.२) शेणखताचा वापर पेरणीच्या १५ ते २० दिवस आधी करावा खुप आधी टाकल्यास त्याची कार्यक्षमता पर्यायाने कमी होते.३) गांडूळखताचा वापर करतांना ते शक्यतो स्वतः तयार केलेले असावे, विकत आणल्यास त्याची गुणवत्ता तपासुन घ्यावी.४) हिरवळीचे खत (गिरीपुष्प, शेवरी) पेरतांनाच द्यावे, ज्यामुळे पुढील २० ते २५ दिवसात त्याचे विघटन होऊन नत्राची उपलब्धता होईल.५) धैंचा किंवा बोरु या प्रकारच्या हिरवळीच्या खतांचा वापर पेरणीच्या ३० ते ३५ दिवसानंतर (अथवा फुलोऱ्यावर येण्याआधी) करावा.६) पिकांचे अवशेष शेतात असल्यास ते जागीच गाडून टाकावे.७) जैविक खतांचा वापर बीजप्रक्रिया द्वारे करावा तसेच त्याचा वापर शेणखतामध्ये मिसळून केला जाऊ शकतो.८) बाजारामध्ये विविध प्रकारच्या सेंद्रिय निविष्ठा उपलब्ध आहेत त्याचा गरजेनुसारच उपयोग करावा, अनावश्यक खर्च टाळावा.सेंद्रिय कर्बाचे उपयोग बघता, यांच्या जमिनीतील वाढीसाठी सामुदायिक प्रयत्नाची सार्थ गरज आहे. मानवी वाढत्या गरजा, प्रदुषण तथा बदलते वातावरण यांच्या आव्हानांसमोर कर्ब व्यवस्थापन ही यश परीक्षा आहे. जमिनीची शाश्वतता टिकविणे नक्कीच आपल्या हाती आहे आणि त्यासाठी सेंद्रिय निविष्ठाचा वापर योग्य प्रकारे योग्य वेळी आणि योग्य पध्दतीने करणे अत्यंत गरजेचे आहे.