राज्यातील वनक्षेत्र २० टक्क्यांवरून ३३ टक्केपर्यंत नेण्यासाठी हरित महाराष्ट्र ह्या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्याला हिरवेगार आणि सुरक्षित पर्यावरणाच्या दिशेने नेण्यासाठी रानमळा ग्रामपंचायतीच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना ही योजना लागू करण्यासाठी शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. सदर योजना ग्रामपंचायतींमार्फत राबवायची असून या योजने अंतर्गत वृक्ष लागवड करणे व संवर्धन करणे अपेक्षित असते.
राज्य शासनाची हि योजना असून मुख्यत्वे गावागावात ही योजना राबविणे, वृक्ष संवर्धनाचा प्रचार प्रसार करणे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानुसार प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीने या योजना राबविण्यासाठी सहभागी होणे आवश्यक आहे. या योजनेनुसार गावात शुभेच्छा वृक्ष, शुभमंगल वृक्ष, आनंदवृक्ष, माहेरची साडी, स्मृतीवृक्ष आदी प्रसंगाच्या माध्यमातून वृक्ष लागवडीला चालना देण्यात आली आहे.
अशी करावी वृक्ष लागवड
शुभेच्छा वृक्ष : वर्षभरात गावात जन्माला येणाऱ्या बालकांच्या जन्माचे स्वागत संबंधित कुटुंबाला फळझाडांची रोपे देऊन. या झाडांना आपल्या बाळाप्रमाणे जीव लावून संवर्धन करणे अपेक्षित
शुभमंगल वृक्ष : दरवर्षी गावात विवाह होणाऱ्या तरुणास फळझाडांची रोपे देऊन शुभाशीर्वाद.
आनंदवृक्ष : दरवर्षी गावातील दहावी व बारावी परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्या, गावातील नोकरी मिळवणाऱ्या तरुण / तरुणींना आणि गावातील विविध निवडणुकांमध्ये विजयी होणाऱ्या उमेदवारांना, अशा आनंदाच्या क्षणी फळझाडांची रोपे देऊन पुढील वाटचालीसाठी शुभाशीर्वाद.
माहेरची झाडी : गावातील ज्या कन्यांचे विवाह वर्षभरात होतात अशा सासरी गेलेल्या विवाहित कन्यांच्या माहेरच्या लोकांना फळझाडांची रोपे देऊन त्यांना शुभाशीर्वाद. आपल्या लेकीप्रमाणेच माया देऊन त्या झाडांचे संबंधित कुटुंबाने संगोपन करणे अपेक्षित.
स्मृती वृक्ष : एखाद्या गावामध्ये ज्या व्यक्तींचे वर्षभरामध्ये निधन होते, त्या कुटुंबाला फळझाडाचे रोप देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. सदर कुटुंबाने झाडाच्या रूपाने आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृतींचे जतन करणे अपेक्षित.
मागील वर्षाचा दि.१ जुलै ते चालू वर्षाचे ३० जूनं हे वर्ष गृहित धरून जन्म, विवाह, आणि मयत या प्रसंगांचे औचित्य साधून अंदाज घेऊन ग्रामपंचायतींकडून दि.१ जुलै रोजी वर्षातून एकदाच रोपांचे वाटप. संबंधित कुटुंबानी अशी झाडे दि.१ जुलै ते ७ जुलै या कालावधीत लावल्याबाबत योग्य ती नोंद ग्रामपंचायत रजिस्टरमध्ये वृक्ष नोंदवहीमधील फॉर्म क्र. ३३ मध्ये ठेवावी, असे योजनेद्वारे आवाहन करण्यात आले आहे.