मानवी आहारामध्ये धान्याच्या वापराचे प्रमाण सुमारे ८० टक्क्यांपर्यंत असते. काढणीनंतर धान्याची साठवण प्रामुख्याने खाण्यासाठी, बियाणे याबरोबरच बाजारपेठेत चांगला दराच्या अपेक्षेने केली जाते.
प्रत्यक्ष उत्पादना दरम्यान शेतामध्ये होणाऱ्या किडीमुळे धान्याचे १२ टक्के नुकसान होते. मात्र त्याच्या तिप्पट म्हणजेच ३६ टक्के नुकसान कापणीपश्चात साठवणीमध्ये येणाऱ्या किडीमुळे होते. म्हणजेच काढणीपश्चात धान्याची साठवण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.
साठवणुकीतील धान्यात निरनिराळ्या किडींचा उपद्रव होतो. यात प्रामुख्याने सोंडे भुंगेरे, खापरा भुंगेरे, पिठातील तांबडे भुंगेरे, दातेरी कडांचे भुंगेरे, धाण्यावरील पतंग, तांदळावरील पतंग, गव्हावरील पतंग, पिठातील पतंग, कडधान्यावरील भुंगेरे इत्यादी किडी आढळतात.
त्याशिवाय साठविलेल्या धान्याचे उंदरापासून अतिशय नुकसान होते. तेव्हा उत्पादनाचा दर्जा साठवणुकी दरम्यानचे काळात योग्य राखण्याकरिता उपद्रवकारक किडीची माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांचे नियंत्रण करण्याकरिता उपाययोजना राबविणे शक्य होईल.
१) खापरा भुंगेरेयजमान पिकेः भात, गहू, ज्वारी, कडधान्य, तेलबिया, पेंड इ.नुकसानीचा प्रकार: या किडीची मादी दाण्यावर तसेच भिंतीवरील भेगांमध्ये अंडी घालते. अळी केसाळ असून ती दाणे पोखरते. परिणामी दाण्याची टरफले शिल्लक राहतात. अळीच्या अंगावरील केस शरीरावरील आवरण व विष्ठेमुळे धान्यास दर्प येतो त्यामुळे धान्याचे बाजारमूल्य कमी होते.
२) सोंडे भुंगेरेयजमान पिकेः गहू, भात, मका, ज्वारी इ.नुकसानीचा प्रकार: या किडीला असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण सोंडेमुळे तिला सोंडे भुंगेरे हे नाव पडले आहे. सोंडे किडीचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास धान्यातील तापमान वाढते. या किडीची अळी व प्रौढ दोन्ही धान्याचे नुकसान करतात. मादी कीटक धान्याच्या दाण्यावर शेतामध्येच एक-एक असे अंडे घालते. अंड्यातुन बाहेर पडलेली अळी दाणे पोखरून उपजिवीका करते. धान्याचे पीठ होते. प्रौढ भुंगेरे दाण्यावर गोलाकार छाप पाडून दाने फस्त करतात.
३) दातेरी कडांचे भुंगेरेयजमान पिकेः मका, भात, ज्वारी, गहू इ.नुकसानीचा प्रकार: या किडीची अळी व प्रौढ भुंगेरे धान्याचे नुकसान करतात. मादी भुंगेरे दाण्यावर अंडी घालतात. अळी दाण्यामध्ये शिरून दाणे फस्त करते. त्यामुळे फक्त टरफले राहतात. अळी प्रादुर्भावग्रस्त दाण्यामध्ये कोषावस्थेत जाते.
४) तृणधान्यावरील पतंगयजमान पिकेः भात, मका, ज्वारी, गहू, सातू इ.नुकसानीचा प्रकार: या किडीची अळी फक्त साठवलेल्या धान्याचे नुकसान करते. ही अळी पांढऱ्या रंगाची असून, तिचे डोके पिवळे असते. अळी दाण्यावरील भेगांमधून दाण्यामध्ये प्रवेश करून आतील गाभा खाते. तिचे वास्तव्य नेहमी दाण्यातच राहते. ही कीड शेतामध्ये व साठवणीमध्येही दाण्याचे नुकसान करते. धान्य कोठ्या किंवा पोत्यांमध्ये या किडीचा प्रादुर्भाव होतो.
५) कडधान्यावरील भुंगेरेयजमान पिकेः सर्व कडधान्ये उदा. तूर, मूग, उडीद, चवळी इ.नुकसानीचा प्रकार: ही कीड शेतात पीक काढण्यापूर्वीच दाण्यात प्रवेश करते. प्रौढ अळी दाण्यामध्ये शिरून धान्यामध्येच राहते. प्रौढ भुंगेरे दाण्यांना छिद्र पाडून बाहेर पडल्याने नुकसान होते. अन्य वेळी प्रौढ निरूपद्रवी असतो.
व्यवस्थापन- साठवणीसाठी धान्यातील ओलावा १० टक्केपेक्षा कमी राहील अशी काळजी घ्यावी व त्यासाठी धान्य उन्हात चांगले वाळवावे.- धान्यात वाळलेली कडुनिंबाची पाने धान्याच्या एक टक्के प्रमाणात मिसळावीत.- काही ठिकाणी वेखंड पावडरीचाही वापर केला जातो.- बऱ्यापैकी रसायनविरहीत नियंत्रण पद्धती वापरणे सोपे आणि कमी घातक असते.- उंदरांच्या नियंत्रणासाठी पिंजरा वापरू शकता.- धान्य साठवणूक करताना चारही बाजूला थोडे-थोडे अंतर ठेवावी म्हणजे हवं खेळती राहील.- धान्य संरक्षक सापळे पण आले आहेत ते पोत्यात ठेवता येतात.- कीड नियंत्रणासाठी रसायने वापरताना ती तज्ञांच्या सल्ल्याने वापरावीत.- रसायनांचा अधिक वापर केल्यास मानवी आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.
अधिक वाचा: बाजारभाव पडला.. शेतमाल ठेवा गोडाऊनमध्ये आणि मिळवा शेतमाल तारण कर्ज