उष्ण व समशितोष्ण भागामध्ये डाळिंब हे वर्षभर फळधारणा होणारे झाड आहे. परंतु हे पाण्याच्या उपलब्धतेवरसुद्धा अवलंबून आहे; म्हणून पावसाळ्यातला बहार (फुलधारणा) मे-जुन मध्ये घेतला जातो त्याला मृग बहार म्हणतात.
हिवाळ्यातला बहार सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये घेतला जातो त्याला हस्त बहार म्हणतात. उन्हाळ्यातला बहार (फुलधारणा) जाने-फेब्रुवारी मध्ये घेतला जातो त्याला अंबिया बहार म्हणतात. ज्या बागा तेलकट डाग रोगग्रस्त भागात असतील त्या बागेत किमान २ ते ३ वर्षे हस्त बहार घ्यावा.
जर आपल्या बागेमध्ये काही गंभीर समस्या नसतील तर पावसाळ्यातील हंगाम (मृग बहार) आणि उशिराचा अंबिया बहारामध्ये चांगली फुल व फळधारणा होते, त्याचबरोबर उच्च गुणवत्ता व भरपुर फळ संख्या असते म्हणून अधिक किंमत मिळून, भरपुर नफा मिळवता येऊ शकतो.
असे असले तरीही हस्त बहारातील पिक हे चांगले असते कारण; किड व रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो; म्हणून फवारण्यांची संख्या कमी होते, चांगला रंग व गोडी येते कधी कधी उशीराच्या पावसामुळे (ऑक्टोबर) हस्त बहारातील फुलधारणा उशीरा होते.
त्यामुळे फळे तोडणीही उशिरा (मार्च मध्ये) होते त्याचा परिणाम मिळणाऱ्या बाजार भावावर होतो. सद्य स्थितीतील ३ वर्षाचा कल विचारात घेता सप्टेंबर ते जानेवारी महिन्यात डाळिंबाचाबाजार भाव कमी झालेला असतो, कारण हा फळ तोडणीचा महत्वाचा कालावधी असतो.
अशा क्षेत्रामध्ये बहुतेकदा फेब्रुवारी ते ऑगस्ट कालावधी मध्ये चांगला भाव मिळतो. म्हणून, स्थानिक हवामान व बाजारभाव यानुसार फुलधारणेच्या हंगांमाचा निर्णय घेणे योग्य राहील. निर्यातीसाठी उशिराचा मृग बहार आणि हस्त बहारास प्राधान्य द्यावे.