Join us

Crop Production Competition: पीक जोमात वाढवा अन् भरघोस बक्षिसं जिंका.. आजच व्हा स्पर्धेत सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 11:26 AM

Crop Production Competition: pikspardha पीक जोमात वाढवा... मालामाल व्हा अन् जिंका भरघोस बक्षिसे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल या ११ पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पीक जोमात वाढवा... मालामाल व्हा अन् जिंका भरघोस बक्षिसे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

दरम्यान, पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

यामुळे कृषी उत्पादनात भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने खरीपाची पेरणी वेगाने होत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे.

कोणत्या पिकांसाठी किती शुल्क?दरम्यान, पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम ३०० रूपये व आदिवासी गटासाठी रक्कम १५० रुपये राहणार आहे.

स्पर्धेसाठी निकष काय? स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. पीक स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून, सर्वसाधारण गटासाठी तालुकास्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना किती व कसे मिळणार बक्षीस?सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीस रक्कम तालुका पातळीवर पहिल्या क्रमांकासाठी ५ हजार, द्वितीयसाठी ३ हजार, तिसऱ्यासाठी २ हजार, जिल्हा पातळी प्रथम १० हजार, द्वितीय ७ हजार, तृतीय ५ हजार, राज्य पातळी प्रथम ५० हजार, द्वितीय ४० हजार, तृतीय ३० हजार अशा प्रकारे पीक स्पर्धा बक्षिसाचे स्वरूप ठेवण्यात आले आहे.

ही लागणारी कागदपत्रेही पीक स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित केले जाणार असून, सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकयांची निवड करण्यात येणार आहे. अर्जासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), क्षेत्राचा नकाशा आणि बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडावी.

३१ ऑगस्टपर्यंत सहभाग नोंदवाखरीप हंगाम-२०२४ साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै २०२४ व उर्वरित पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२४ असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

अधिक वाचा: Government Schemes for Women Entrepreneurs: महिलांच्या स्टार्टअप साठी आली हि नवी योजना मिळणार २५ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

टॅग्स :खरीपपीकशेतीशेतकरीसरकारराज्य सरकार