Lokmat Agro >स्मार्ट शेती > सोयाबीन पिकाला आवडणारी अन्नद्रव्ये कोणती अन् ती कशी द्यावी?

सोयाबीन पिकाला आवडणारी अन्नद्रव्ये कोणती अन् ती कशी द्यावी?

Increase soybean crop yield by providing proper nutrients | सोयाबीन पिकाला आवडणारी अन्नद्रव्ये कोणती अन् ती कशी द्यावी?

सोयाबीन पिकाला आवडणारी अन्नद्रव्ये कोणती अन् ती कशी द्यावी?

कमी खर्चात आणि कमी श्रमात जास्तीत जास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीन पेरणीच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे. या पिकांत अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करायचे ते पाहूया.

कमी खर्चात आणि कमी श्रमात जास्तीत जास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीन पेरणीच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे. या पिकांत अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करायचे ते पाहूया.

शेअर :

Join us
Join usNext

सोयाबीन हे महत्त्वाचे कडधान्य वर्गात मोडणारे तेलबिया पीक आहे. जागतिक स्तरावर एकूण तेल उत्पादनात सोयाबीनचा ५० टक्के वाटा आहे. कमी खर्चात आणि कमी श्रमांत जास्तीत जास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीन पेरणीच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे.

महाराष्ट्रात सुमारे ३९ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचे पीक घेतले जाते. परंतु महाराष्ट्रात सोयाबीनची उत्पादकता जागतिक उत्पादकतेच्या (२,६२० कि./हे) तुलनेत निम्मी (१,२४७ कि./हे) आहे. सोयाबीनला वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा व्यवस्थित होत नाही; हे सोयाबीनची उत्पादकता कमी असल्याचे एक महत्त्वाचे कारण आहे.

सेंद्रीय आणि रासायनिक खतांमधून या पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा पिकाला केला जातो. परंतु पिकाच्या गरजेनुसार आणि वेळेनुसार करण्यात आलेल्या शिफारशींप्रमाणे ही खते दिली नाहीत तर त्याचा अनिष्ट परिणाम सोयाबीन पिकाच्या वाढीवर आणि पर्यायाने उत्पादनावर होतो.

सुमारे ७० टक्के शेतकरी अशा शिफारशीनुसार सोयाबीनला खते देत नाहीत, एकात्मिक पोषक अन्नद्रव्य  व्यवस्थापनावर विशेष भर देत नाहीत. सोयाबीन हे डाळवर्गीय पीक असल्याने त्याला खतांच्या माध्यमातून नत्राची आवश्यकता कमी प्रमाणात असते, हे शेतकर्‍यांना माहिती नसते. त्यामुळे  शेतकरी त्यांच्या पारंपारिक रिवाजानुसारच खते वापरतात.

पेरणीनंतर सोयाबीनला आवश्यक अन्नद्रव्यांच्या कमतरतेची कारणे

  • सोयाबीन पिकाला त्याच्या वाढीच्या अवस्थांमध्ये शेंगा पक्व होईपर्यंत पोषक अन्नद्रव्यांची गरज असते. शिफारशीत मात्रा पेरणीचे वेळी दिल्यास त्यामधून ह्या पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा सोयाबीनला त्याच्या वाढीच्या सर्व अवस्थांमध्ये हळूहळू होत असतो. सर्वसाधारणपणे सोयाबीनला खालील काही महत्त्वाच्या कारणांमुळे त्याच्या वाढीच्या अवस्थांनुसार पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी होतो.
  • शिफारशीत खतांची मात्रा पेरणीच्या वेळी दिल्या गेली नाही तर किंवा शिफारस केलेल्या प्रमाणात पेरणीच्या वेळी खते दिली नाहीत तर, कमी पडलेल्या घटकाची कमतरता निर्माण होते.
  • जमिनीत आधीच काही अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास अशी अन्नद्रव्ये पिकाला मिळत नाहीत.
  • शिफारशीत खतांची मात्रा पेरणीच्या वेळी योग्य प्रमाणात देवूनही जमिनीच्या स्थानिक गुणधर्मांच्या समस्यांमुळे पिकाला पोषक अन्नद्रव्ये मिळत नाहीत.
  • अतिवृष्टीमुळे जमिनीत टाकलेली खते पावसाच्या पाण्यासोबत विरघळून वाहून जातात; किंवा पावसात जास्त खंड पडल्यामुळे जमिनीत पर्याप्त ओलावा राहत नाही.
     

पेरणीनंतर सोयाबीनमध्ये असे करा अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन

  • सोयाबीनमध्ये वाढीच्या सुरुवातीच्या काळात चुनखडीयुक्त जमिनीमध्ये लोह या सुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता निर्माण होते. यामुळे सोयाबीन उगवणीनंतर १८ ते ३५ दिवसांपर्यंत चुनखडीनिर्मित लोहाची कमतरता असल्यास सोयाबीनची पाने पिवळी पडून शिरा हिरव्या दिसतात. अशा कालावधीत फेरस सल्फेट ५० ग्राम अधिक चुना २५ ग्राम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • सोयाबीनच्या उगवणीनंतर २५ ते ३० दिवसांदरम्यान जमिनीत पाण्याचा तुटवडा पडून अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे तसेच तणनाशकांच्या फवारणीनंतर सोयाबीनची वाढ काही प्रमाणात खुंटते. अशी वाढ खुंटलेली असल्यास उगवणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी पोटॅशियम नायट्रेट (१३-००-४५) या पाण्यात विद्राव्य खताची १०० ते १५० ग्राम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे पिकाची वाढ जोमाने होते, फुलांची निर्मिती जास्त होते आणि सोयाबीन पिकाची पाण्याचा ताण सहन करण्याची शक्ती वाढते. बोरॉन हे सुक्ष्म अन्नद्रव्य सोयाबीन मध्ये फुल निर्मितीसाठी उपयुक्त असल्यामुळे, पेरणीचे वेळी ते जमिनीतून दिले नसेल तर, या सोबतच बोरॅक्स पावडर १० ग्राम- प्रथम गरम पाण्यात विरघळवून नंतर १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास फायदा होतो.
  • फुलोरा अवस्थेपासून शेंगा भरण्याच्या अवस्थेपर्यंत प्रथिनांच्या निर्मितीसाठी नत्राची गरज भासते. त्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे चुनखडीनिर्मित लोहाची कमतरता असल्यास सोयाबीन उगवणीनंतर ५५ दिवसांनी युरिया १०० ग्राम अधिक फेरस सल्फेट ५० ग्राम अधिक चुना २५ ग्राम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. परंतु लोहाची कमतरता नसल्यास सोयाबीन उगवणीनंतर ५५ दिवसांनी फक्त युरिया २०० ग्राम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • दाण्यांची निर्मिती आणि योग्य वेळी पीक परिपक्व होणे इत्यादीसाठी सोयाबीनच्या शेंगा धरण्यापासून त्या पक्व होईपर्यंत स्फुरदाची आवश्यकता असते. त्यासाठी सोयाबीन उगवणीनंतर ७० दिवसांनी फक्त मोनो-पोटॅशियम  फॉस्फेट (००-५२-३४) किंवा १९-१९-१९ या पाण्यात विद्राव्य खताची १०० ते १५० ग्राम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वरीलप्रमाणे सोयाबीन पिकात पेरणीनंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास सोयाबीनचे कमाल पातळीपर्यंत उत्पादन वाढते.

डॉ. डी. एस. कंकाळ
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
8275152557

Web Title: Increase soybean crop yield by providing proper nutrients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.