नारळ, सुपारीच्या बागेत आंतरपीक म्हणून मसाला पिके, केळी, अननस लागवड करण्यात येते. त्याचप्रमाणे भाजीपाला पिकांचेही आंतरपीक शक्य आहे. कमी कालावधीत वर्षभर उत्पन्न देणाऱ्या भाजीपाला व कंदपिकासाठी मोठा वाव आहे.
वांगी, मिरची, टोमॅटो या पिकासाठी उष्ण हवामान, चांगला निचरा असणारी मध्यम काळी कसदार जमीन या पिकासाठी उत्तम ठरते. कोकणात या पिकांवर मोठ्या प्रमाणावर मर रोग येतो.
गादी वाफ्याचा आकार तीन मीटर लांब व एक मीटर रंद आणि १५ सेंटिमीटर उंच असावा. प्रती चौरस मीटर वाफ्यात पाच किलो शेणखत, ३५ ग्रॅम युरिया, १०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व २५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
रुजवा चांगला होण्यासाठी वाफे भाताच्या पेंढ्याने आच्छादावेत. उगवण होईपर्यंत वाफ्यांना नियमित पाणी द्यावे. उगवण झाल्यानंतर दोन दिवसांनी पाणी द्यावे. रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रत्येक वाफ्यास ५० ग्रॅम युरिया द्यावा.
पेरणीनंतर ४ ते ६ आठवड्यांनी रोपे पुनर्लागवडीसाठी योग्य होतात.वांगी, मिरची, टोमॅटोचे भरघोस उत्पन्न देणाऱ्या सुधारित जातींची शिफारस विद्यापीठाने केली आहे.
वांगे■ वांग्यांमध्ये वैशाली, अर्का, नीलकंठ, प्रगती, रुचिरा, अर्का, केशव, कृष्णा, सुफालकाळी रवई, स्थानिक बांधतिवरे, अर्का नवनीत, अर्का निधी, अर्का शील, स्वर्णप्रभा, फूल, अर्जुन, कोकण प्रभा या जाती जीवाणूजन्य रोगप्रतिकारक आहेत.■ खरीप हंगामात मे व जून, रब्बी हंगामात सप्टेंबर, ऑक्टोबर, उन्हाळी हंगामात जानेवारी, फेब्रुवारीत लागवड शक्य आहे.■ हेक्टरी २५० ते ३५० क्विंटल उत्पादन मिळते.
मिरची■ मिरचीमध्ये पुसा ज्वाला, पंत सी-१, अर्का लोहित, कोकण कीर्ती, संकेश्वरी, अग्निरेखा, फुले ज्योती, परभणी तेजस, सुरक्ता, फुले साई, फुले मुक्ता, उत्कल रागिणी या वाणाची शिफारस विद्यापीठाने केली आहे. ■ खरिपात मे, जून, रब्बी हंगामात सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, उन्हाळी हंगामात जानेवारी, फेब्रुवारीत लागवड करता येते.■ हेक्टरी ९० ते १२० हिरव्या मिरचीचे तर सुक्या मिरचीचे १२ ते २० क्विंटल उत्पादन मिळते.
टोमॅटो■ टोमॅटो लागवडीसाठी कोकण विजय, पुसा १२०, अर्का सौरभ, सोनाली, वैशाली, रूपाली, रश्मी, धनश्री, राजश्री, भाग्यश्री, ए. टी. व्ही २, अर्का अलोक या वाणांची शिफारस विद्यापीठाने केली आहे.■ खरीप हंगामात मे, जून, जुलै, रब्बीमध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, उन्हाळ्यात डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीत लागवड करता येते.■ लागवड सरी वरंब्यावर करावी. प्रत्येक ठिकाणी एक रोप लावण्याचे सूचित केले आहे.