पिकांच्या दोन ओळीमधील अंतर जास्त असल्यास त्यामध्ये शेतकऱ्यांकडून आंतरपीक घेतले जाते. आंतरपीक घेण्याचे फायदे आणि तोटे दोन्हीही शेतकऱ्यांकडून सांगितले जातात. उसामध्ये मका, हरभरा, कांदा, गोबी, गहू यांसारख्या पिकाचे आंतरपीक घेतले जाते. आंतरपिकामुळे शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळण्यास मदत होते. तर आंतरपिकामुळे मूळ पिकाची वाढ चांगली होत नाही म्हणून अनेक शेतकरी उसाच्या पिकामध्ये आंतरपीक घेत नाहीत.
आंतरपीक घ्यावे की नाही?
उसामधील आंतरपिकामुळे मूळ पिकाच्या वाढीवर परिणाम होत असला तरी शेतकऱ्यांना अल्प कालावधीतील पीक घेऊन चांगला नफा कमावता येऊ शकतो. ९० दिवस ते १२० दिवसांतील पिके उसामध्ये आंतरपीक म्हणून फायद्याचे ठरू शकतात. आपल्याला मूळ पिकावर लक्ष केंद्रीत करायचे असेल तर नक्कीच शेतकऱ्यांनी आंतरपीक घेतेवेळी विचार करणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न काढायचे आहे अशा शेतकऱ्यांनी आंतरपीक घ्यावे.
आंतरपीक घेण्याचे फायदे काय?
उसामध्ये कांदा, गहू, गोबी, हरभरा, शर्कराकंद, हिरवळीचे पीके अशा पिकांची निवड आंतरपीक म्हणून करू शकतो. हे पीक निघाल्यानंतर त्या पिकांचा उरलेला भाग उसाच्या सरीत कुजवल्यास त्याचे खत तयार होऊन मातीतील सेंद्रीय कर्ब वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर आंतरपिकामुळे पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन होत असल्यामुळे विविध अन्नद्रव्ये विविध पिकांसाठी विभागून जातात आणि मातीत अन्नद्रव्यांचा समतोल राहतो.
आंतरपिकांचे तोटे
मक्यासारखे पीक उसामध्ये आंतरपीक म्हणून लावल्यास उसासाठी जे खत दिले जाते त्या खतांचे जास्त शोषण मका हे पीक करते असा दावा अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. तर मका कणसाच्या दाणे भरण्याच्या कालावधीत दुप्पटीने अन्नद्रव्ये शोषण करते आणि परिणामी उसाची वाढ खुंटते. त्याचरोबर कमी वेळेत जास्त पाला आणि वाढ होणाऱ्या पिकांची लागवड केल्यास उसाच्या पानापर्यंत सुर्यप्रकाश पोहोचत नाही. त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही आणि पिकाचे नुकसान होते.
दरम्यान, आंतरपीक घेत असताना शेतकऱ्यांनी कमी उंचीच्या पिकांची लागवड केली पाहिजे. मक्यासारख्या चारा पिकाची लागवड करत असताना त्याचे उसावर होणारे परिणामही शेतकऱ्यांनी जाणून घेतले पाहिजेत. आंतरपीक घेत योग्य व्यवस्थापन केले तर निश्चितच त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळेल. एका पिकाला दर मिळाला नाही तर दुसऱ्या पिकांवर खर्च निघू शकतो म्हणून शेतकऱ्यांनी आंतरपिकाला प्राधान्य दिलं पाहिजे.