पूर्वहंगामी व सुरू या हंगामात रूंद सरी पद्धतीने लावलेल्या उसात शेतकरी आंतरपीक घेऊ शकतात. साडेतीन ते ४ महिन्यापर्यंत आपण आंतरपीक घेऊ शकतो. तर आंतरपिकामुळे उस लागवडीपासून चार महिन्यापर्यंत आंतरमशागत वाचते. तर आंतरमशागतीसाठी होणारा खर्चसुद्धा वाचतो. त्यामुळे उस शेतीमध्ये आंतरपिकामुळे शेतकरी जास्तीचे उत्पादन घेऊ शकतात.
दरम्यान, उसाच्या पाच फूट अंतराच्या सरीच्या पट्ट्यामध्ये कमी उंचीची आणि तीन ते चार महिन्यात काढणीला येणारी पिके आंतरपीक म्हणून घेतले जाऊ शकतात. सर्व पिके तीन ते चार महिन्यामध्ये काढले जातात त्यामुळे उस पिकासाठी बेवड चांगली होते आणि उस वाढीसाठी फायदा होतो.
कोणती पिके आंतरपीक म्हणून घेतली जाऊ शकतात?सुरू किंवा पूर्वहंगामी उसामध्ये कोबी, फुलगोबी, हिरवळीचे खत, हरभरा, कांदा, शर्करा कंद, गहू, भूईमूग, बीट अशी पिके आंतरपीक म्हणून घेऊ शकतो. त्याचबरोबर अनेक शेतकरी मक्याचे पिकही ऊसामध्ये आंतरपीक म्हणून घेतात.
आंतरपीकाचे फायदेउस हे बहुवार्षिक पीक आहे. तर उसाच्या वाढीसाठी वेळ लागतो, त्याचबरोबर दोन सऱ्यांमध्येही चार ते पाच फुटाची जागा असल्यामुळे आंतरपीक घेण्यासाठी जागा असते. आंतरपिकामुळे पीक काढणीनंतर उसाच्या पिकाला बेवड म्हणून फायद्याचे ठरते. तर हरभरा पिकावर आम्ल असल्यामुळे उसासाठी फायद्याचे ठरते. अनेकदा आंतरपिकामध्ये चांगले उत्पन्न झाले नाही तर ते आपण तसेच सरीमध्ये दाबून त्याचे खत तयार करू शकतो. या हिरवळीचा मातीतील सेंद्रीय कर्बवाढीसाठी फायदा होतो.
उत्पन्नआंतरपीक हे तीन किंवा चार महिन्याचे असते. तर कोबी, फुलगोबी, कांदा, पालेभाज्या, भूईमूग, हरभरा यातून शेतकऱ्यांना ५० हजार ते दीड लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. तर तीन महिन्यात या पिकाची काढणी झाल्यानंतर उसाचे पुढील नियोजन करता येऊ शकते.