औद्योगिक क्षेत्रापाठोपाठ एकेक टप्पा पार पाडत कृषी क्षेत्रही चालत आहे. सध्या डिजिटल तंत्रज्ञान ४ या टप्प्यावर असल्याचे मानले जाते. त्याद्वारे शेती अधिक शाश्वत, किफायतशीर, काटेकोर व बदलत्या हवामानाशी नक्कीच अनुकूल करता येईल.
कृषि क्षेत्रामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा पुढील क्षेत्रामध्ये प्रामुख्याने केला जाऊ लागला आहे.
- मानवविरहित हवेतून उडणारे स्वयंचलित वाहन म्हणजेच ड्रोन (Drone)
- जमिनीवरून चालणारे मानवरहित स्वयंचलित वाहन, म्हणजेच यंत्रमानव ( Robot)
- संवेदके (Sensors)
- निर्णय समर्थन प्रणाली (DSS)
- इंटरनेट ऑफ थिंग्ज. ( IoT)
- सुदूर संवेदन (Remote Sensing)
- भौगोलिक माहितीशास्त्र ( GIS/GPS)
- कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग (AI/ML)
ड्रोन म्हणजे काय ?
ड्रोन हे हवेतून उडणारे मानव विरहित (Unmanned Aerial Vehicle - UAV) स्वयंचलित वाहन आहे. ज्या प्रमाणे जमिनीवरून वाहकाद्वारे चालविल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर या वाहनाला विविध अवजारे व उपकरणे जोडून शेतीतील अनेक कामे करतो. त्याच प्रमाणे ड्रोन हे हवेतून उडणारे मानव विरहित वाहन आहे. ड्रोन व त्यावरील उपकरणाला एकतर जमिनीवरून रिमोट कन्ट्रोलच्या साह्याने नियंत्रित केले जाते. किंवा ड्रोनला एका विशिष्ट
संगणकीय प्रणालीद्वारे वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्याची सोय केलेली असते. त्यामुळे स्वायत्तपणे (Autonomous) शेतीमधील विविध क्रिया केल्या जाऊ शकतात.
सात आठ वर्षांपूर्वीपर्यंत अत्यंत छोटे ड्रोनवरील कॅमेराच्या साह्याने वेगवेगळ्या समारंभाचे चित्रीकरण केले जाई. त्या वेळी जनसामान्यांमध्ये ड्रोनबद्दल एक कुतूहल होते. मात्र आता ही बाब सामान्य होत गेली आहे. शेतीमध्ये छोटे ते मध्यम प्रकारच्या ड्रोनचा वापर फवारणीसाठी केला जातो, तेव्हा शेतकऱ्यांमध्ये नेमका कसा वापर करायचा आणि त्यांच्या क्षमतेविषयी उत्सुकता व कुतूहल असते. सध्या काही अडचणी जाणवत असल्या तरी लवकरच ड्रोनद्वारे पिकांवरील फवारणी ही एक सामान्य क्रिया होईल, यात शंका नाही.
ड्रोनचे त्याच्या हवेत उडण्याच्या तत्त्वानुसार साधारणतः चार प्रकार पडतात.
- फिक्स्ड विंग ड्रोन (Fixed Wing Drone)
- एक रोटर ड्रोन (Single Rotor Drone)
- अनेक रोटर ड्रोन (Multi Rotor Drone)
- फिक्स्ड विंग- रोटर हायब्रीड ड्रोन (Fixed Wing-Rotor Hybrid VTOL)
हवामान अद्यावत कृषि आणि जल व्यस्थापनासाठी प्रगत कृषि विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र (कास्ट)
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
02426-243268