Join us

गच्चीवरच्या बगिच्यासाठी ‘हायड्रोफोनिक्स’ खरंच फायद्याचे आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 3:43 PM

शहरी शेती म्हणजेच, गॅलरी, गच्चीवरील बागेत हायपोनिक्स म्हणजेच मातीविना शेती तंत्राने भाजीपाला लागवडीचे अनेकांना आकर्षण असते. त्यात कितपत तथ्य आहे, जाणून घेऊ या.

आज घरीच विषमुक्त भाज्या पिकवणे फार गरजेचे झाले आहे. आहे त्या जागेत येईल त्या भाज्या विषमुक्त पद्धतीने भाज्या पिकवणे हे औषधासमान झाले आहे.  बाजारात कोणत्या प्रकारचे रसायनं वापरली जातील याचा काहीच भरोसा नाही. लोक जमेल तसे जमेल त्या वेळेत, जमेल त्या साधनात भाज्या पिकवण्याचा प्रयोग करत आहेत.

पण यातील महत्वाचे म्हणजे ज्यांच्याकडे अजिबात वेळ नाही, माहिती नाही तसली लोकं इंटरनेटवर जावून घरीच भाज्या उगवण्याचा शोध घेतात. किंवा  वेगळा प्रयोग म्हणून घरी खाण्यासाठी हाड्रोफोनिक्स Hydroponics या तंत्राचा वापर करू इच्छितात. हाड्रोफोनिक्स म्हणजे प्लास्टिक पाईपच्या विशिष्ट रचना करून त्यामधे वाहते पाणी सोडले जाते. त्या पाण्यात काही अंशी विद्राव्य खते (विशेषतः रासायनिक खते) टाकून त्यात पालेभाज्यांचे, सलाड वर्गीय भाज्यांचे उत्पादन घेतले जाते.

आम्ही याच्या विरोधात आहोत?मुळात या प्रकारच्या भाजीपाला उत्पादनाला आम्ही विरोध करतो. कारण  हायड्रोफोनिक्स या तंत्रात प्लास्टिक पाईपचा वापर केला जातो यात केवळ पाणी, रासायनिक खते व प्लास्टिकच्या पाईपचा वापर मुख्यत्वाने केला जातो. यातील प्लास्टिक पाईप जेव्हां गरम होतो तेव्हां त्यातून घातक रसायने पाण्यात सुक्ष्म रूपात मिसळतात व त्यावर भाज्या पोसल्या जातात. प्लास्टिक पाईप असो वा वस्तू यातून गरम पदार्थाचे जे काही रसायनाचे सेवन होते त्यातून आधुनिक आजार जडतात वा त्याचे आपण कधी ना कधी शिकार होतो. 

(तज्ञांच्या मते प्लास्टिकच्या बादलीत जे काही गरम पाण्याने आंघोळ करतो, त्यातून सुध्दा टाईप टू प्रकारचा डायबेटीस होतो. मग प्लास्टिकच्या पेला, कप, डिश यातून आपण गरम पदार्थ पोटात घालत असू तर त्यातून किती गंभीर आजारांना आमंत्रित करत आहोत. याचा आता विचार करा… साधे गरम पाणी अंगावरून घेतल्याने आजार होत असेल, तर सेवनाने किती आजार होतील याचा विचार केलेला बरा..)

परदेशात या तंत्राचा सुलभ व शास्त्रशुद्ध  पध्दतीने वापर केला जातो. त्यामुळे  हाड्रोफोनिक्स  ही पध्दत परदेशात उत्तम प्रकारे काम करते व त्यात जे काही उगवले जाईल ते विषमुक्त असते सुध्दा. त्यामुळे Hydroponics या तंत्राने उगवलेला भाजीपाला हा प्रयोग म्हणून,शेती व्यवसाय म्हणून नक्कीच करावा. पण घरातल्या बागेसाठी नको. जे लोक अशा तंत्रज्ञानाचे उत्पादन करतात. किंवा ज्यांना व्यापार करावयाचा आहे. तेच लोक या उत्पादनाविषयी प्रचार प्रसार करतात, विशेषत: घरगुती गार्डनसाठी. हायड्रोफोनिक्स या विषयावर फ्री सेमिनार घेतात. मग त्यांचेच उत्पादन घेण्याविषयी गळ घालतात. हे कदाचित लोकांना अधिक परवडते. कारण त्यांना वस्तू खरेदी करण्यात अधिक आनंद वाटतो. पण त्या विषयीचे माहिती, ज्ञान, गार्डनिंग कोर्स करण्यात महत्व वाटत नाही. असो. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. 

आम्ही आग्रही आहोत.आम्ही नेहमी सांगतो की बाजारातून काही बागेसंदर्भात खरेदी करण्यापूर्वी आपल्याला बागेत फुल झाडं, भाजीपाला उगवण्याविषयी माहिती घ्या. त्या संदर्भात तज्ञांचे मार्गदर्शन घ्या, गार्डनिंग कोर्स करा. आधी ते कसं काम करतं, निसर्ग कसा आहे हे समजून घेतलं, तर आपल्याला उत्तम प्रकारे गार्डनिंग करता येणार आहे. 

संदीप चव्हाण, नाशिक, संपर्क : +91 9850569644, +91 8087475242(लेखक शहरी शेती या विषयातील मार्गदर्शक आहेत)

टॅग्स :बागकाम टिप्सशेतीभाज्या