प्रचलित शेणखत कंपोस्ट मार्गाने ही गरज कधीच भागविता येणार नाही. हिरवळीचे खत, पेंडी, कोंबडीखत, तयार सेंद्रिय खते अशा मार्गातूनही ही वाटचाल केवळ अशक्य आहे.
या सर्व अभ्यासानंतर नवीन मार्गाच्या शोध यात्रेत प्रथम मनाला काही बंधने घालून घेतली. कोणत्याही परिस्थितीत यासाठी बाजारात जायला लागू नये. यंत्र, मनुष्यबळ वेळ या सर्वांचीच शेतकऱ्याकडे वनवा आहे.
नवीन तंत्र शेतकऱ्याला डोइजड वाटले नाही पाहिजे. या शोध यात्रेत भू-सुक्ष्मजीवशास्त्राने आणखी दोन नियम शिकविले सेंद्रिय खत जमिनीच्या बाहेर कुजवून टाकणे चुकीचे आहे. ते थेट जमिनीतच कुजले पाहिजे व ते जितका जास्त काळ कुजत राहील तितके जमिनीच्या सुपिकतेसाठी जास्त चांगले.
आता या दोन नियमांचे पालनही करावयाचे आहे. शक्यतो ज्या जागी वापरावयाचे त्याच जागी ते मिळाले तर सर्वात उत्तम व फुकटात मिळाले तर शक्यच आहे.
वरील सर्व बंधनांचे पालन करुन नवीन मार्ग शोधयात्रा सुरू झाली, प्रथम ऊसाची लावण तुटल्यानंतर मिळणारे पाचट पुढे आले. पाचट जागेला कसे कुजवावे यावर अनेक प्रयोग करून पाचट कुजविण्याचे एक तंत्र विकसित केले.
यात १५ वर्षे गेली. तंत्र विकसीत झाले. यातून काय कार्यभाग साधला गेला याचा १५ वर्षानंतर आढावा घेला असता ऊसाचे उत्पादन एक टनाचीही वाढ झाली नसल्याचे दिसून आले.
यातून असे लक्षात आले की, २५-३० वर्षे वापरून जमिनीची जी खराबी झाली आहे ती पाचट कुजवून भरून निघत नाही. याच्या जोडीला आणखी काही कुजणारे पदार्थ शोधणे गरजेचे आहे. लावण, खोडवे झाल्यानंतर तिसरे वर्षी भात असा माझा फेरपालट आहे.
भातासाठी खोडवे प्रथम नांगरले जाते. यातून ऊसाची खोडकी जमिनीबाहेर निघतात. बायका ती जाळणासाठी गोळा करून घेऊन जातात. फुकटात रान स्वच्छ करून मिळाल्याने शेतकरी आनंदी होतो.
पुढे कुळवाच्या फासात अडकून ऊसाचे मुळाचे जाळे येते ते बसून सर्व रानात काडी कचरा होतो. भात पेरणीपूर्वी शेतकरी धसकटे गोळा करून बाहेर फेकून देतो अगर जाळून टाकतो.
आजपर्यंत हा कुजणारा पदार्थ खिशातले पैसे खर्च करून शेतकरी त्याचा कचरा तरी करतो अगर जाळून तरी टाकतो. हा जागेला फुकटात मिळाणारा पदार्थ व्यर्थ दवडणेपेक्षा जागेला कुजविला तर जमिनीला सेंद्रिय कर्ब मिळेल व यातुन ऊसाचे उत्पादनात काही वाढ करता येईल. यावर चिंतन सुरू झाले.
यानंतर असे लक्षात आहे कि, जमीन नांगरली तर हा पदार्थ आपल्याला मिळणार नाही, मग खोउके जसे वाढले तसेच कोणताही धक्का न लावता जागेला मारुन कुजविले तर त्याचे खत करणे शक्य आहे. त्याच जागेला खत करण्याचे पक्के असल्याने कोणतीही मशागत न करता भात पिकविणेचे पक्के ठरविले. हा एक प्रयोग होता.
प्रचलित विचारसरणीच्या परस्पर विरुद्ध असल्याने लोकांच्या टिंगल टवाळीचा होता. मी तत्काळ नांगरणी बंद करून भात घेण्याचा निर्णय घेतला. आता कुरी (भात पेरणी यंत्र) चालणे शक्य नाही. टोकण करणे हा पर्याय करून पहावयाचे ठरले. खोडके उगवून देऊन ग्लायफोसेट या तणनाशकाने मारणे शक्य असल्याचे ज्ञात असल्याने प्रयोग करणे पक्के झाले.
एकरी ६० टनाची मजल
● भात पेरणीची वेळ येताच पाऊस पडला तर नाहीतर जमीन ओलावून ऊसाच्या जुन्या सरीच्या येताच पडला तर पाऊस, दोन बाजूचे उताराला चार ओळीत भात टोकण केली. भात पीक उत्तम आले. (भात पिकासंबधीची माहिती एका स्वतंत्र लेखातून देणार आहे.) आता परत ऊसाची लावण आहे त्याच जुन्या सऱ्यात कशी करावयाची यावर चिंतन सुरू झाले.
● सरीचे तळात एक उथळ नांगराचे तास मारुन कांडी पूरण्यापुरती मशागत करून लावण केली. लावण झाली, उगवण झाली, फुटवे व्यवस्थित आले. यथावकाश भरणी झाली. भरणीनंतर एक महिन्याने ऊसाकडे पहाता असे लक्षात आले की, गेल्या ३०- ३५ वर्षात इतका चांगला ऊस कधीच पाहावयाला मिळाला नाही. पुढे त्यावर लोकरी मावा पाण्याचा ताण अशी संकटे आली. परजीवी किडीने लोकरी मावा फस्त केला.
● अशा काही संकटानंतर यथावकाश ऊस कारखान्याला गेला. गेले अनेक वर्षे अनेक वेगवेगळे प्रयोग करून ४० आरला ४० टना पलीकडे उत्पादन जात नव्हते तेथे एकदम ६० टन उत्पादनाची मजल मारली. काही तरी अजब घडले होते. याची शास्त्रीय कारणमिकांसा करणे भाग होते.
- प्रताप चिपळूणकर
कृषीतज्ज्ञ, कोल्हापूर
अधिक वाचा: Sugarcane Organic Farming : ऊस शेतीसाठी प्रत्येकवर्षी सेंद्रिय खत हवेच का? वाचा सविस्तर