ऊस हे उष्ण कटीबंधातील पीक असल्यामुळे त्यास उष्ण हवामान, २० ते ३० सें. तापमान, ८०-९० % आर्द्रता, प्रखर सूर्यप्रकाश, पुरेसे पाणी पोषक असते.
तथापी कडक उन्हाळा, तसेच पाऊस काळातील कमी/नगण्य पाऊसमान यामुळे ऊस पिक वाढीवर अनिष्ठ परिणाम होवू शकतो.
पिकाच्या काही महत्वाच्या शरीरक्रियाशास्त्रीय व जीवरासायनिक क्रियांवर परिणाम होवून बाष्पीभवनाचा वेग वाढतो व पेशी अंतर्गत पाण्याचा ताण निर्माण होतो तर उत्पादनात १५ ते ५० टक्के इतकी लक्षणीय घट येते.
उसावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना
- ऊस पिकासाठी ठिबक सिंचन पाणी व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करावा.
- को ८६०३२, फुले ०२६५ व फुले १०००१, फुले ११०८२ आणि फुले ऊस १५०१२ हे ताण सहन करणारे वाण लागवडीसाठी वापरावेत.
- पाचट आच्छादनाचा वापर करून सरी आड सरीतुन पाणी द्यावे.
- पाण्याचा ताण पडल्यास लागणीनंतर ६०, १२० उराणि १८० दिवसांनी २ % म्युरेट ऑफ पोटॅश व २% युरीया (२०० ग्रॅम १० लिटर पाण्यात) यांचे मिश्रण करुन पिकावर फवारणी करावी.
- ऊस पीक तणविरहीत ठेवावे त्यामुळे उपलब्ध पाण्यासाठी होणारी स्पर्धा कमी होवून ऊस वाढीसाठी उपयुक्त ठरेल.
- शेताच्या सभोवती उंच व जलद वाढणारी शेवरीसारखी पिके लावावीत.
- ज्या ठिकाणी पाचट वापरणे शक्य नाही त्या ठिकाणी आंतरमशागत ट्रॅक्टरच्या औजाराने करावी.
खोडवा उसासाठी पाणी नियोजन - खोडवा व्यवस्थापनासाठी नेहमीच्या पध्दतीने २६ ते २८ पाण्याच्या पाळया लागतात.- परंतु नवीन तंत्रामध्ये फक्त १२ ते १४ पाण्याच्या पाळ्या असल्या तरी खोडवा उसाचे चांगले उत्पादन मिळते.- खोडवा उसासाठी दोन पाण्याच्या पाळयांतील अंतर नेहमीच्या पध्दतीपेक्षा दिडपटीने वाढवावे.- पाचटाचा अच्छादनासाठी वापर केल्यामुळे ४० ते ४५ दिवस पाणी नसले तरी उसाचे पीक चांगले तग धरु शकते.- त्यामुळे ही पध्दत ज्या भागात पाण्याचा जास्त तुटवडा आहे त्या भागांसाठी वरदानच ठरेल.
अधिक वाचा: उसाचे पाचट शेतात लवकर कुजण्यासाठी करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर