गोड धाटाची ज्वारी [(सॉरगम बायकलर (एल.) मोएन्क] हे बहुउपयोगी पीक आपल्या धाटात साखर साठवते. गेली ५० वर्षे निंबकर कृषि संशोधन संस्था (नारी) येथे गोड धाटाच्या ज्वारीवर काम चालू आहे. त्यातून नव्वदच्या दशकात ज्वारीची संकरित जात ‘मधुरा-१’ तयार करण्यात आली. या जातीपासून फक्त ‘मद्यार्क आणि काकवी व गूळच नाही तर चांगल्या प्रतीचे धान्य व चारा किंवा मूरघासही उत्पादित करता येतात. नारी येथे या गोड ज्वारीच्या रसापासून रसायनमुक्त अशी काकवी तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.
गोड धाटाच्या ज्वारी पिकाचा अवधी ३ ते ४ महिन्यांचा असल्यामुळे वर्षातून २ ते ३ वेळा पीक घेणे सहज शक्य होते. उसाशी तुलना करता गोड धाटाच्या ज्वारीच्या पिकाचे कमी अवधी, पाणी वापराची अधिक कार्यक्षमता आणि भिन्न प्रकारच्या परिस्थितीत तग धरून रहाण्याची अनुकूलक्षमता हे फायदे आहेत. सर्वसाधारणपणे जैवभाराचे उत्पादन सरासरी २० ते ४० टन तर सवळलेल्या ताटांचे उत्पादन सरासरी १० ते २० टन प्रति हेक्टरी इतके मिळते.
वादळी वाऱ्याच्या परिस्थितीत पीक पडले तर बरेच नुकसान संभवते. परंतु मधुरा-३ मध्ये हे प्रमाण इतर जातींच्या तुलनेत कमी आढळून आले आहे. गोड धाटाच्या ज्वारीचे पीक घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती धान्य किंवा चारा यांसाठी लावण्यात येणाऱ्या ज्वारीसारख्याच असतात. लागण वर्षभरात केव्हाही करत येते परंतु धाटांचे रसातील साखरेचे प्रमाण इ. वर त्याचा प्रभाव पडतो. रोग व किडींचा प्रादुर्भाव, रोपाच्या अवस्थेतील अधिक पाऊस, ढगाळ वातावरणामुळे वाढीच्या काळात कमी झालेला सूर्यप्रकाश यांमुळे उत्पादन कमी होऊ शकते. पीक परिपक्व होण्याआधी कापणी केल्यासही उत्पादनात घट येऊ शकते. खोडकिड्याच्या उद्भभवातील वाढही उत्पादनातील घटीला कारणीभूत ठरू शकते.
अधिक वाचा: गोड धाटाच्या ज्वारीच्या मधुरा जातीची खासियत काय?
‘मधुरा’ साठीलागवडपद्धतीवपीकनियोजन
हवामान
‘मधुरा’ चे विविध ऋतूंमध्ये उत्पादन घेता येते. हवेचे सरासरी किमान व कमाल तापमान अनुक्रमे १५ ते २० व ३० ते ३५ अंश सेल्सियस एवढे असावे. सरासरी तापमान २५ ते ३० अंश सेल्सियस असल्यास सर्वात चांगली वाढ होते.
जमिनीचीपूर्वमशागत
चांगला निचरा असलेली खोल व मध्यम खोल जमीन (४५ सें.मी. खोल) या पिकास सर्वात योग्य आहे. कमीत कमी मशागत करणे सर्वात चांगले. शक्यतो खोल नांगरट करू नये. शेतात प्रती हेक्टरी १५ ते २० गाड्या चांगले कुजलेले शेणखत मिसळून कुळवाने पाळी घालावी किंवा हिरवळीच्या खतांचा वापर करावा.
हंगाम
खरीप व उन्हाळा हे हंगाम ‘मधुरा’ साठी उत्तम आहेत. रब्बीमध्ये धाटाच्या उत्पादनात २० ते २५ टक्के घट होते, पण धान्य उत्पादनात वाढ मिळते.
पेरणीचीपद्धत
१) काकवीसाठी: पावसाळा सुरू होताच, जमिनीत सरी-वरंबे तयार करून किंवा लहान सारे पाडून जमीन तयार करावी. दोन ओळींतील अंतर ४५ ते ६० सें.मी. असावे व दोन झाडांतील अंतर १५ ते २० सें.मी. असावे. झाडांची संख्या प्रति हेक्टरी सरासरी १.० ते १.५ लक्ष एवढी असावी.
२) कडवळासाठी: दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. व दोन झाडांतील अंतर १० ते १५ सें.मी. असावे. प्रति हेक्टरी झाडांची संख्या २.० ते २.५ लक्ष इतकी असावी.
बियाण्याचेप्रमाण
काकवी व धान्यासाठी ७.५ ते १० कि.ग्रॅ./हेक्टर, धान्यासाठी १५ कि.ग्रॅ./हेक्टर. प्रत्येक ठिकाणी दोन-तीन बिया टाकून पीक एक महिन्याचे होण्याआधी विरळून एक रोप ठेवावे.
पेरणीचीवेळ
खरीप (पावसाळा) - मे-जुलै
रब्बी (हिवाळा) - ऑक्टोबर-नोव्हेंबर
उन्हाळा - जानेवारी-मार्च
अधिक वाचा: मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत शेततळे काढण्यासाठी अनुदान, कुठे कराल अर्ज?
खते
कोरडवाहू पिकाला हेक्टरी ८० कि.ग्रॅ. नत्र, ४० कि.ग्रॅ. स्फुरद व २० कि.ग्रॅ. पालाश पेरणीच्या वेळेस वापरावे. सिंचनाखालील पिकाला १०० कि.ग्रॅ. नत्र, ५० कि.ग्रॅ. स्फुरद व ५० कि.ग्रॅ. पालाश प्रति हेक्टरी देणे. यापैकी फक्त ५० कि.ग्रॅ. नत्र पेरणीच्या वेळेस द्यावा व उर्वरित ५० कि.ग्रॅ. पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनंतर द्यावा.
आंतरमशागत
पेरणीनंतर ३ ते ४ आणि ६ ते ७ आठवड्यांनी खुरपणी करावी.
पाणीव्यवस्थापन
पाण्याच्या उपलब्धतेनुसार मध्यम ते भारी जमिनीत कमीत कमी चार वेळा पाणी देणे आवश्यक आहे. ते कणीस तयार होताना, पीक पोटरीत असताना, फुलोऱ्यात असताना, व दाणे भरण्याच्या अवस्थेत द्यावे. पाणी कमी असल्यास कणीस तयार होताना (लागणीनंतर ३० दिवस) किंवा पोटरीत असताना (लागणीनंतर ६० दिवस) यापैकी एका वेळी द्यावे. उन्हाळ्यात कमीत कमी आठ वेळा पाणी देणे आवश्यक असते.
महत्वाच्याबाबी
१) कडवळासाठी फुलोरा आल्याआल्या (पेरणीनंतर ७०-७५ दिवसांनी) कापणी करता येते.
२) काकवी, गूळ व मद्यार्कासाठी दाणे पक्व झाल्यानंतर १५ ते २० दिवसांत कापणी करावी, कारण त्यानंतर धाटाचे वजन व रसातील साखरेचे प्रमाण कमी होत जाते.
३) काकवी बनवायची असल्यास धाटे सवळून त्यातील रस काढावा.
खोडवा
संकरित मधुराचा धान्य आणि धाटे या दोन्हींसाठी खोडवा घेता येतो. कापणीनंतर हेक्टरी प्रत्येकी ५० कि.ग्रॅ. नत्र, पालाश आणि स्फुरद घालून आणि मोठे तण उपटून पिकाला पाणी द्यावे. खोडवा सुमारे ९० दिवसांत कापणीला येतो. सर्वसाधारणत: खोडव्यापासून मूळ पिकाच्या निम्मेच उत्पादन अपेक्षित असते.
नंदिनी निंबकर
अध्यक्ष, निंबकर कृषि संशोधन संस्था (नारी) फलटण