पिकास आवश्यक त्या विशिष्ट अन्नद्रव्याची उपलब्धता वाढविणाऱ्या जिवंत किंवा सुप्त अवस्थेतील जिवाणूंच्या वाहकांमध्ये केलेल्या मिश्रण म्हणजे जैविक खत, जिवाणू संवर्धक होय.
यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाला हे उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि सूक्ष्म अशा उपयुक्त जिवाणूंचा वापर करता येतो.
जिवाणू खते वापरण्याच्या पद्धती व मात्रा१) बीजप्रक्रिया- १०० मि.लि. द्रवरूप जिवाणू संवर्धक खत प्रति १० किलो बियाण्यासाठी वापरावे.- जैविक खते प्रामुख्याने बीजप्रक्रियेसाठी वापरली जातात. ही सोपी व फायदेशीर पद्धती आहे.- बीजप्रक्रिया करताना हलक्या हाताने सर्व बियाण्यास जिवाणू संवर्धक सारख्या प्रमाणात लावावे.- त्यानंतर सावलीत सुकवून पेरणी करावी.- या प्रकारे एक किंवा एकापेक्षा जास्त जैविक खतांची बीजप्रक्रीया करता येते.
२) रोपांची मुळे बुडविणेज्या पिकांमध्ये रोपे तयार करून त्यांची पुर्नलागवड केली जाते त्या पिकांसाठी ही पद्धत उपयुक्त आहे. एक लिटर जैविक खत १०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. रोपांची पुर्नलागवड करण्यापूर्वी रोपांची मुळे अर्धा तास कालावधीसाठी या द्रावणात बुडवून ठेवावीत व त्यानंतर लागवड करावी.
३) बेणे प्रक्रीयाकेळी, ऊस, बटाटा, हळद, आले इत्यादी पिकांच्या बेण्यास जैविक खताची प्रक्रीया केली जाऊ शकते. ४०० लिटर पाण्यात १ लिटर जैविक खत मिसळावे व द्रावण तयार करावे. या द्रावणात पिकाचे बेणे अर्धातास बुडवून ठेवावे व त्यानंतर लागवड करावी.
४) पिकाच्या मुळांभोवती खत देणेउभ्या पिकास जैविक खत स्प्रे पंपाच्या सहाय्याने देता येते. २०० लिटर पाण्यात १ लिटर जैविक खत मिसळून द्रावण तयार करावे. हे द्रावण सकाळी किंवा सायंकाळी पिकांच्या मुळाजवळ नोझल काढलेल्या पंपाच्या सहाय्याने फवारावे किंवा आळवणी करावी.
५) ठिबक सिंचनाद्वारे देणेठिबक सिंचनाद्वारे जैविक खत पिकांना देता येते. एक एकर क्षेत्रासाठी १ लिटर जैविक खत ठिबक सिंचनाच्या यंत्रणेतून द्यावे. फळपिके, केळी, ऊस, कापूस इत्यादी पिकांना ही पद्धत उपयुक्त आहे.
६) माती, शेणखत किंवा गांडूळ खतात मिसळून देणेमाती किंवा शेणखत किंवा गांडूळ खतात मिसळून जैविक खत दिले जाऊ शकते. ४०० ते ६०० किलो ओलसर मातीत किंवा शेणखतात किंवा गांडूळ खतात १ लिटर जैविक खत मिसळून रात्रभर ठेवावे. पेरणीपूर्वी किंवा जमीनीस पाणी देण्यापूर्वी हे मिश्रण सरीमध्ये टाकावे.
जैविक खते वापरताना घ्यावयाची काळजी१) जैविक खतांचा पॅकेटवर/बाटलीवर जी अंतिम तारीख दिली आहे त्यापूर्वी तसेच त्यावरील उत्पादन व वापरायची पद्धती या गोष्टी वाचून त्यांचा वापर करावा. २) जैविक खत कोरड्या जागी ठेवावे. ३) जैविक खतांमध्ये जैविक घटक असल्यामुळे त्यांचा वापर रासायनिक खतात मिसळून करू नये. ४) जैविक संवर्धक लावण्यापूर्वी जर बियाण्यास/बेण्यास कीटकनाशक, बुरशीनाशक याची बीजप्रक्रिया करायची असल्यास अगोदर अशी प्रक्रिया पूर्ण करूनच नंतर जिवाणूंची प्रकिया करावी.५) कडधान्यवर्गीय पिकासाठी गटानुसार योग्य ते रायझोबियम खत निवडावे.
अधिक वाचा: Maka Lashkari Ali : मका पिकातील लष्करी अळीच्या नियंत्रणाकरिता जैविक उपाय; वाचा सविस्तर