रब्बीज्वारी हे एक महत्त्वाचे अन्नधान्याचे पीक असुन त्याचा वापर धान्य आणि कडबा म्हणून करतात. आरोग्याच्या दृष्टीने रोजच्या जेवणात ज्वारीच्या भाकरीचे महत्त्व वाढत आहे.
त्यामुळे दिवसेंदिवस रब्बी ज्वारीची मागणी वाढत चालली आहे. तथापी रब्बी ज्वारीची उत्पादनक्षमता ही इतर पिकांच्या तुलनेत कमी असल्याचे आढळून येते.
सध्याची उत्पादकता वाढवायची असेल तर आपणांस रब्बी ज्वारीचे सुधारीत लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. यात लागवडीसाठी सुधारित वाणांचा अवलंब करणे जरुरीचे आहे.
भारी जमिनीसाठी
अ) फुले वसुधा
- ही जात भारी जमिनीकरीता कोरडवाहू व बागायतीसाठी शिफारस केलेली असुन या जातीस ११६ ते १२० दिवस पक्व होण्यास लागतात.
- या जातीचे दाणे मोत्यासारखे पांढरेशुभ्र चमकदार असतात.
- भाकरीची व कडब्याची प्रत उत्तम आहे.
- ही जात खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम आहे.
- या जातीचे धान्य उत्पादन कोरडवाहूसाठी २५ ते २८ क्विंटल तर बागायतीसाठी ३० ते ३५ क्विंटल प्रति हेक्टर मिळते.
- तर कडब्याचे उत्पादन कोरडवाहूमध्ये ५५ ते ६० क्विंटल तर बागायतीमध्ये ६० ते ६५ क्विंटल प्रति हेक्टर मिळते.
ब) फुले पूर्वा
- हा वाण २०२२ साली महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे प्रसारीत केलेला आहे.
- या वाणास ११८ ते १२१ दिवस पक्व होण्यासाठी लागतात.
- या वाणापासून कोरडवाहू क्षेत्रात प्रति हेक्टरी २५ ते ३० क्विंटल धान्याचे व ६० ते ६५ क्विंटल कडब्याचे उत्पादन मिळू शकते.
- हा वाण न लोळणारा, खोडमाशी आणि खडखड्या रोगास प्रतिकारक्षम आहे.
- कडब्याची आणि भाकरीची प्रत चांगली आहे.
बागायती क्षेत्रासाठी
फुले रेवती
- ही जात भारी जमिनीकरीता बागायतीसाठी विकसीत करण्यात आली आहे.
- या जातीचे दाणे मोत्यासारखे पांढरे, चमकदार असतात.
- भाकरीची चव उत्तम आहे व कडबा अधिक पौष्टिक व पाचक आहे.
- ही जात ११८ ते १२० दिवसात तयार होते.
- या जातीचे धान्य उत्पादन बागायतीसाठी ४० ते ४५ क्विंटल प्रति हेक्टर मिळते.
- तर कडब्याचे उत्पादन ९० ते १०० क्विंटल प्रति हेक्टर मिळते.
- ही जात खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम आहे.
अधिक वाचा: तूरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे कसे कराल व्यवस्थापन वाचा सविस्तर