कागदी लिंबाला उन्हाळ्यात चांगला भाव मिळतो. म्हणून हा बहार घेणे व्यवसायिक दृष्टीकोनातून जास्त फायदेशीर ठरते. त्यामुळे बागायतदारांचा कल हस्त बहार घेण्याकडे आहे.
हा बहार फायदेशीर असला तरी तो सहज घेता येत नाही. कारण लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये साधारणतः आंबिया बहार ६० टक्के, मृग बहार ३० टक्के तर हस्त बहार फक्त १० टक्केच येतो.
हस्त बहारासाठी कसे कराल खत व्यवस्थापन
- हस्त बहार घेताना झाडामधील अन्नद्रव्यांचे योग्य प्रमाण राखण्याकरीता योग्य वेळी व योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांचे नियोजन करणे आवश्यक आहे.
- सहा वर्ष व त्यावरिल झाडाकरिता ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात झाडांना वाफे तयार करुन प्रति झाडास ३० ते ४५ किलो कुजलेले शेणखत अधिक ३०० ग्रॅम नत्र (६५० ग्रॅम युरिया), ३०० ग्रॅम स्फुरद (१८७५ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट), ३०० ग्रॅम पालाश (५०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) व ७.५ किलो निंबोळी ढेप या खताची मात्रा देऊन ओलीत सुरु करावे व उरलेला अर्धा नत्र ३०० ग्रॅम (६५० ग्रॅम युरिया) १ महिन्याने किंवा फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर द्यावे.
- कागदी लिंबाचे वय १० वर्ष व त्यापेक्षा जास्त असलेल्या झाडावर हस्तबहाराकरिता ठिबक सिंचनाद्वारे खताचे नियोजन करताना शिफारसीत खताच्या मात्रेच्या ८० टक्के खते (४८०:२४०:२४० ग्रॅम नत्रः स्फुरदः पालाश) सोबत बाष्पपर्णोत्सर्जनाच्या ९० टक्के पाणी (दररोज) ठिबक सिंचनाद्वारे दिल्यास उत्पादनात भरीव वाढ होऊन पाण्याची व खताची बचत होते.
- फुलधारणेच्या काळात झाडांना आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्ये मुख्यतः झिंक व बोरॉन याची उपलब्धता योग्य प्रमाणात असल्यास फुलधारणेवर अपेक्षित परिणाम तसेच फुल गळण्याला अटकाव झाल्याचे दिसून आलेले आहे.
- याकरिता झिंक (०.५ टक्के) व बोरॉन (०.३ टक्के) या सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता चिलेटेड स्वरुपातील फवारणीद्वारे दिल्यास अपेक्षित परिणाम साधता येतो. याकरिता ताण तोडताना चिलेटेड स्वरुपातील सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी.