Join us

Kamgandh Saple : किडींची संख्या कमी करण्यासाठी कमी खर्चातील सापळे कोणत्या किडीसाठी वापराल कोणते ल्युर?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 10:09 AM

पिकांवरील कीड नियंत्रणासाठी प्रभावी उपाय आहे. यास इंग्रजीत 'फेरोमोन ट्रॅप किंवा 'फनेल ट्रॅप' असेही म्हणतात. हा कमी खर्चाचा व रासायनिक प्रदुषणविरहीत उपाय आहे.

कामगंध सापळे पिकांवरील कीड नियंत्रणासाठी प्रभावी उपाय आहे. यास इंग्रजीत 'फेरोमोन ट्रॅप किंवा 'फनेल ट्रॅप' असेही म्हणतात. हा कमी खर्चाचा व रासायनिक प्रदुषणविरहीत उपाय आहे.

हा नरसाळ्याच्या आकाराचा असून प्लॅस्टिकचा बनविलेला असतो. त्याची खालची बाजू मोकळी असून त्यास एक प्लॅस्टिकची पिशवी लावण्यात येते. वरची बाजू एका झाकणाने झाकली असते. त्यास आतील बाजूस 'आमिष' लावण्याची सोय असते.

त्यास मादीचा वास असणारे एक रसायन लावण्यात येते. नर कीटक हा मादीच्या मिलनासाठी त्या वासाने या सापळ्याकडे आकर्षित होतो, फनेलमध्ये येतो, घसरून खाली पिशवित पडतो व काही दिवसांनी मरतो. त्यांचे मिलन होत नाही, अंडी देण्याची प्रक्रिया थांबते. याद्वारे किडींच्या उत्पादनाचे नियंत्रण होते.

कामगंध सापळे वापरताना घ्यावयाची काळजी१) कीटकनिहाय सापळ्याची निवड करावी.२) सापळ्यात अडकलेले पतंग २-३ दिवसांनी काढून नष्ट करावेत.३) सर्वेक्षणासाठी प्रत्येक जातीच्या कीटकासाठी हेक्टरी ५ सापळे वापरावेत, परंतु किडीचे पतंग मोठ्या प्रमाणात पकडण्यासाठी हेक्टरी १५ ते २० सापळे वापरावेत.४) सापळ्यामधील लिंग प्रलोभने १५ ते २० दिवसांनी बदलावीत.५) सापळा हा साधारणपणे पिकाच्या उंचीनुसार जमिनीपासून २ ते ३ फुटांवर राहील याची काळजी घ्यावी.६) सापळा वार्याच्या दिशेला समांतर असावा, ज्यामुळे लिंग प्रलोभन रसायनाचे सूक्ष्म कण शेतात पसरून जास्तीत जास्त पतंग सापळ्याकडे आकर्षिले जातील.

कामगंध सापळ्यांच्या वापराचे फायदे१) किडीचे प्रौढ व मादी यांची शेतातील स्थिती ठरविण्यासाठी कामगंध सापळ्याचा मुख्यतः उपयोग होतो.२) फेरोमोन सापळ्यांच्या वापरामुळे किडींची आर्थिक नुकसानीची पातळी ठरवून योग्य त्या वेळी कीड व्यवस्थापन पध्दती ठरविता येते. तसेच आवश्यक त्या कीटकनाशकांची निवड करून फवारणी करता येते.३) एकत्रित प्रलोभन सापळ्यांच्या वापरामुळे कीटकनाशकांच्या किंमतीचा व फवारणीचा खर्च टाळता येतो.४) सापळ्यातील रसायनामुळे पर्यावरणावर कुठलाही वाईट परिणाम होत नाही.५) रासायनिक किटकनाशकांचा वापर कमी झाल्यामुळे परोपजीवी कीटक व मित्र कीटक सुरक्षित ठेवण्यास मदत होते.६) कीड व्यवस्थापनाची हि पद्धती वापरण्यास अगदी सोपी व स्वस्त आहे.७) सापळ्यांचा खर्च किटकनाशकंच्या खर्चापेक्षा कमी आहे.८) सापळ्यांच्या वापरामुळे मानव, पशु, पक्षी, प्राणी यांना कुठल्याही प्रकारचा धोका नसतो.

कोणत्या किडीला कोणते ल्युर वापराल?

किडीचे नावफेरोमोन / ल्युरकिडग्रस्त पिके
हेलीकॉवर्पा आर्मिजेरा (अमेरिकन बोंडअळी/ घाटेअळीहेलील्युर (Helilure)कापूस, कडधान्य, सुर्यफुल, सोयाबीन, वांगी
पेक्टीनोफोरा गोसिपायल्ला (शेंदरी बोंडअळी)पेक्टीनोल्युर (Pectinolure) गोस्सिपल्युर (Gossyplure) कापूस
इरीयास व्हायटेला इरीयास इन्सुलाना (ठिपक्याची बोंडअळी)इरविटल्युर (Ervitlure) इरविनल्युर (Ervinlure)कापूस, भेंडी
स्पोडोप्टेरा लीटयूरा (पाने खाणारी अळी)स्पोडोल्युर (Spodolure)कापूस, सोयाबीन, मिरची, तंबाखू
सिर्कोफ्यागा इन्सरटूलस (धानावरील खोडकिडा)सिर्फोफ्यागाल्युर (Scirpopha galureभात
प्लुटेल्ला झायलोस्टेलापेक्टीनोफोराल्युरकोबी, फुलकोबी
ड्याकस डोर्यालीस (फळ माशी)मिथिल युजेनॉलफळपिके
भाजीपाला वरील फळ माशीक्युल्युरभाजीपाला पिके

कामगंध सापळे तयार करण्याची पद्धत१) सर्वप्रथम विविध आकारांचे प्लॅस्टिकचे डबे अथवा कीडनाशकाचे रिकामे डबे घेऊन त्यास मधोमध आरपार छिद्र पाडावे. डब्याच्या झाकणाला तार जाईल एवढेच ते छिद्र असावे.२) झाकणाच्या छिद्रातून तार घालून त्यात कापसाचा बोळा लावावा.३) डब्यात २०० मि.लि. पाणी टाकून त्यात एक मि.लि. डायक्लोरव्हॉस कीटकनाशक टाकावे.४) कापसाचा बोळा व डायक्लोरव्हॉस मिश्रित पाण्यात अंतर असावे.५) कापसाच्या बोळ्याला मक्षीकारी किंवा मिथिल युजेनॉल हे गंध प्रलोभन लावावे. याकडे नर पतंग आकर्षित होतात व खालील कीडनाशकमिश्रित पाण्यात पडून मरतात.६) एकरी आठ ते दहा सापळे लावावेत.७) प्रत्येक आठवड्यानंतर प्रलोभन व कीडनाशकमिश्रित पाणी बदलावे.

यामध्ये कीडनाशक व प्रलोभनासाठीच खर्च येतो. एरवी हा सापळा खरेदी करण्यासाठी ३०० ते ३५० रुपये लागतात. डबे विकत आणून जरी घरी सापळे तयार केले तरी ३५ ते ४० सापळे तेवढ्याच खर्चात तयार करता येऊ शकतील.

त्यांचा वापर एकरी दहा सापळे याप्रमाणे चार एकर क्षेत्रासाठी करता येईल. शेतकऱ्यांच्या निरीक्षणातून व गरजेतून अशा प्रकारचे सापळे अतिशय सोप्या पद्धतीने तयार करण्यात आले आहेत.

अधिक वाचा: Banana Sigatoka : केळी पिकात करपा सिगाटोका रोग कसा येतो? कसे कराल नियंत्रण

टॅग्स :कीड व रोग नियंत्रणपीकशेतकरीशेतीकापूसफळेफलोत्पादनसोयाबीन