वेलवर्गीय पिकांमध्ये कारले हे अत्यंत महत्त्वाचे पीक आहे, कारण ते अल्पावधीतच अधिक उत्पन्न आणि नफा मिळवून देते. मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे याला भारतीय आणि परदेशी अशा दोन्ही बाजारपेठांमध्ये जास्त मागणी आहे.
'मोमोर्डीसीन' हा घटक अधिक प्रमाणात असल्याने कारल्याला कडू चव येते. कारल्याच्या रसामध्ये कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठीचे गुणधर्म असतात.
हवामान
कारल्याची लागवड पावसाळा (जून) आणि उन्हाळी (जानेवारी) हंगामात केली जाते. कारल्याचा वेल उष्ण आणि दमट हवामानात चांगला वाढतो परंतु अति थंडीमुळे त्याच्यावर विपरीत परिणाम होतो. कारल्याच्या वेलीची वाढ आणि उत्पादन क्षमता २४ ते २७ अंश सेल्सिअस तापमानात उत्तम असते.
जमीन
हलकी ते मध्यम काळी माती ज्यामध्ये पाण्याचा निचरा होतो अशी जमीन कारल्याच्या लागवडीसाठी उत्तम असते. ६ ते ६.७ सामू आणि सेंद्रिय खतांचा मुबलक पुरवठा असावा.
जाती
१) हिरकणी
फळे गडद हिरव्या रंगाची, १५ ते २० से.मी. लांब व काटेरी असतात. सरासरी उत्पादन १३० क्विंटल प्रति हेक्टर एवढे मिळते.
२) फुले ग्रीन गोल्ड
फळे गडद हिरव्या रंगाची असून २५ ते ३० से.मी. लांब व काटेरी असतात. हेक्टरी २३० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
३) फुले प्रियांका
या संकरीत जातींची फळे गर्द हिरवी, २० से.मी. लांब व भरपूर काटेरी असतात. ही जात खरीप व उन्हाळी लागवडीस योग्य आहे. तसेच 'केवडा' रोगास बळी पडत नाही. सरासरी उत्पादन २०० क्विंटल प्रति हेक्टरी मिळते.
४) कोकण तारा
फळे हिरवी, काटेरी व १५ से.मी. लांबीची असतात. फळे दोन्ही टोकाला निमुळती व मध्यभागी फुगीर असतात. निर्यातीसाठी अशी फळे योग्य ठरतात. सरासरी उत्पादन १५० ते २०० क्विंटल प्रति हेक्टर मिळते.
पूर्वमशागत व लागवड
१) जमीन नांगरून आणि जमिनीतील तण व गवत काढून शेत स्वच्छ ठेवावे.
२) हेक्टरी २० ते २५ टन शेणखत किंवा कंपोस्टचा वापर करावा.
३) ताटी पद्धतीत १.५ मी. तर मंडप पद्धतीत दोन ओळीमध्ये २.५ मी. अंतर ठेवावे.
४) बेडची रुंदी आणि दोन वेलीमधील अंतर ६० से.मी. ठेवावे.
५) बियाणे टोकन पद्धतीने लावले जाते.
६) हेक्टरी २ ते ३ किलो बियाणे पुरेसे असते.
७) लागवडीपूर्व प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम कार्बेन्डॅझिमची बीजप्रक्रिया करावी.
अधिक वाचा: Sugarcane Cultivation : पूर्वहंगामी ऊस लागवडीसाठी कोणत्या जातींची निवड करावी व कसे करावे नियोजन