करडी किंवा करडई हे रबी हंगामातील महत्वाचे पीक आहे. पावसाळ्यानंतर उपलब्ध ओलाव्यावर सुद्धा हे पीक चांगल्या प्रकारे येत असल्यामुळे इतर रबी पिकापेक्षा कोरडवाहू क्षेत्राकरीता हे पीक वरदान आहे.
करडईच्या उत्पादनात एकेकाळी भारत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर होता. जगातील ५० टक्के करडईचे उत्पादन भारतात होत असे. भारतात जवळपास सर्व राज्यात करडई लागवड बियांतील तेलाकरीता केली जाते.
भारतात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि मध्य प्रदेश ही करडी पिकवणारी प्रमुख राज्ये आहेत. महाराष्ट्रात उस्मानाबाद, परभणी, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली, लातूर, पुणे, सोलापूर, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि अमरावती हे जिल्हे करडी पिकाकरीता ओळखले जातात.
महाराष्ट्रात विशेषतः विदर्भामध्ये करडईच्या कमी उत्पादनाची कारणे म्हणजे कोरडवाहू लागवडी खालील क्षेत्र, हलक्या जमिनीत लागवड, पिकाची फेरपालट न करणे, जमिनीची पूर्वमशागत करतांना ओल तुटणे, उशिरा ते अति उशिरा पेरणी करणे, बियाणे ओळीत न पडणे, विरळणीकडे दुर्लक्ष, रासायनिक खतांच्या मात्रेत बदल न करणे, बीज प्रक्रिया न करणे, योग्यवेळी संरक्षित ओलीत न करणे व मावा किडींचे व्यवस्थापन नीट न करणे ही आहेत.
हवामान आणि जमीन- या पिकाला थंड हवामान मानवते. पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत जास्त पाऊस आणि पाणी साचून राहणे या पिकास मानवत नाही.- त्याचप्रमाणे अति उष्णतामान आणि अतिथंडीचा या पिकावर विपरीत परिणाम होतो.- म्हणून या पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते खोल ओल टिकवून ठेवणारी परंतू चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.- क्षारयुक्त जमिनीत सुध्दा हे पीक येते. सोयाबीन काढल्यानंतर उपलब्ध ओलाव्यावर कुठलीही मशागत न करता हे पीक घेता येते.- अति खोल किंवा अति उथळ पेरणी केल्यास उगवण होत नाही. म्हणून योग्य ओलावा पाहून योग्य खोलीवर पेरणी करावी.- तसेच मूग, उडीद या नंतर हे पीक हमखास येते. करडई पिकास काटे असल्यामुळे जनावरांपासून त्रास कमी होतो कोरडवाहू क्षेत्राकरीता हे पीक वरदान आहे. पण ओलिताखाली सुध्दा करडी चांगली येते. परंतू ओलिता खालील करडीचे क्षेत्र वाढविणे गरजेचे आहे.
वाणसरळ वाण : ए.के.एस.-३५१, ए.के.एस. - २०७, पी. के. व्ही. पिंक (ए. के. एस.-३११), परभणी कुसुम (PBNS-१२)संकरित वाण : नारी-एन. एच.-१ (बिनकाटेरी)
पूर्वमशागतकरडईचे एकच पीक घ्यावयाचे असल्यास उन्हाळ्यात एकवेळ नांगरणी, वखारणीच्या २-३ पाळ्या देऊन काडीकचरा वेचून जमीन चांगली भुसभुशीत करावी. पावसाळ्यात दर पंधरा दिवसांनी वखरणी करून पाणी जिरवून तण नियंत्रण करावे दुबार पीक घायवाचे असल्यास खरीप पिकाचे काढणीनंतर कमीत कमी मशागत करून जमीन पेरणीस तयार करावी. जेणेकरून ओलावा टिकून राहील म्हणजे उगवण चांगली होऊन रोपसंख्या चांगली मिळेल.
भरखतेपूर्वमशागत करतांना शेणखत/कंपोस्ट खत हेक्टरी ५ टन, शेवटचे वखरणी अगोदर जमीनीत मिसळावे.
बियाणे व बीजप्रक्रिया- भारी जमिनीत हेक्टरी १० किलो तर मध्यम जमिनीसाठी हेक्टरी १२-१५ किलो बियाणे वापरावे संकरीत वाणाचे ७.५ किलो बियाणे वापरावे.- बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी बियाण्यास अॅझोटोबॅक्टर अधिक पीएसबी जिवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया (प्रत्येकी २०० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास) करावी.- मर प्रवण भागात मर रोगाच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे बीज प्रक्रिया करावी किंवा शेणखतातून जमिनीत मिसळावे.
पेरणीची वेळकरडईची पेरणी सप्टेंबरच्या चौथ्या ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात केल्यास मावा किडीचा प्रादुर्भाव कमी राहतो व उत्पादन चांगले मिळते. ओलिता खालील करडईची पेरणी ऑक्टोबर शेवटपर्यंत करण्यास हरकत नाही. उशिरात उशीर नोव्हेंबर पहिल्या आठड्यात पेरणी करावी. बियाणे रात्रभर पाण्यात भिजवून पेरणी केल्यास उगवण लवकर व चांगली होते.
पेरणीची पध्दतपेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी म्हणजे बियाणे व खते एकाच वेळी देता येतील. पेरणी करतांना दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. ठेवावे.
आंतरपिकेकरडी पीक सलग न घेता हरभरा, जवस आंतरपीक पध्दतीमध्ये करडी + हरभरा ६:३ ओळी किंवा करडी + जवस ३:३ ओळी या प्रमाणात सुध्दा घेता येते.