शेतीच्या मशागतीच्या कामांच्या या लगबगीच्या दरम्यानच कोणतीही मशागत मेहनत न करता आपोआप उगवलेला हिरवा रानमेवा म्हणजे रानभाज्या असतो.
पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये पानं, फळं, फुलं, कंद अशा एक ना अनेक स्वरूपातल्या रानमेव्याने जंगल बहरलेलं असतं. श्रावणात आपण बाजारात फेरफटका मारला तर कितीतरी नवनव्या भाज्याही बघायला मिळतात.
या भाज्या एखाद्याच महिन्यात तेवढ्याच दिवसात दिसतात व नंतर ज्या गायब होतात त्या एकदम पुढल्या पावसाळ्यात दर्शन देण्यासाठीच! वर्षभरात कुठे शोधू म्हटले तरी त्या दिसणार नाहीत. म्हणून पावसाळ्यात त्यांची ओळख करून घ्यावी. यात करटोली रानभाजी खूप फेमस आहे.
करटुल्याची वैशिष्ट्ये
• मोमारडिका डायओयिका असे करटुल्याचे शास्त्रीय नाव आहे. त्याला 'वाइल्ड करेला फ्रूट' असेही संबोधले जाते.
• कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम घाट परिसरात याच्या वेली मोठ्या प्रमाणावर आढळतात.
• कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातही करटुल्याची काही प्रमाणात लागवड आहे.
• करटुल्याच्या वेली जंगलात झुडपांवर वाढत जातात. या वेलींना जमिनीत हिरव्या रंगाचे कंद येण्यास सुरुवात होते.
• भोपळ्याच्या कुळातील करटुले ही फळवर्गीय वनस्पती आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये या वेलींना फुले व त्यानंतर फळे तयार होतात.
• करटुले औषधी वनस्पती आहे. त्याचे विविध उपयोग प्रचलित आहेत.
• डोकेदुखी, मुतखडा, डायबिटीस, कोलेस्टेरॉल, विषबाधा, हत्तीरोग, आतड्यांच्या तक्रारी, ताप, बद्धकोष्ठता, दमा, श्वसनलिका दाह, उचकी, मूळव्याध यावर गुणकारी असल्याचे सांगितले जाते.
• करटोली हे डोकेदुखीवरील उत्तम औषध आहे. तसेच मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.
• करटुल्याच्या फळांची भाजी कारल्यासारखी असते. पावसाळ्याच्या अखेरीस ही भाजी बाजारात पाहण्यास मिळते.