केळीमहाराष्ट्राचे महत्वाचे व्यावसायिक फळपिक असून या फळपिकाच्या लागवडीखाली ९७.५९ हेक्टर क्षेत्र आहे. विशिष्ट गोड चव, उत्कृष्ट आहारमूल्य व धार्मिक महत्वामुळे केळी या फळाला देशांतर्गत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
तसेच महाराष्ट्रातून केळी निर्यात देखील वाढू लागली आहे. केळीचे शास्त्रोक्त पध्दतीने उत्पादन घेतल्यास केळीची वाढती मागणी पूर्ण करणे शक्य आहे. तसेच शेतकऱ्यालाही चांगला अर्थिक मोबदला मिळू शकेल.
केळी पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी महत्वाची सूत्रे१) आंतरमशागतबागेची कुळवणी व बांधणी केळीच्या दोन ओळीतील माती कुळवाच्या सहाय्याने भूसभुशीत करावी. सर्वसाधारणपणे पीक ३ ते ४ महिन्यांचे होईपर्यंत अशा प्रकारची आंरतमशागत करता येते.
२) पिले काढणेमुख्य बुंध्याशेजारी कंद किंवा रोपे लागवडीनंतर ३ ते ४ महिन्यांनी पिल्ले येण्यास सुरूवात होते. ही पिल्ले मुख्य खोडाशी अन्न, हवा आणि पाणी याबाबत स्पर्धा करतात. त्यामुळे मातृवृक्षाची वाढ कमी होते. घड उशिरा येतो, घडाची पक्वता लांबते. त्यासाठी मुख्य पीक वाढीच्या काळात येणारी पिल्ले धारदार विळ्याच्या सहाय्याने नियमित कापावीत.
३) तणांचे नियंत्रणलागवडीपूर्वी शेताची चांगली खोल नांगरट करून त्यानंतर तणांचे अवशेष वेचून घ्यावेत. लागवडीनंतर आंतरमशागत करतांना दोन ओळीतील आणि दोन झाडांतील तणे निघतात. झाडाजवळची राहिलेली तणे खुरपणी करून काढून टाकावी.
४) आच्छादनाचा वापरपाण्याच्या मात्रेत बचत व्हावी जमिनीचे तापमान योग्य राखले जावे यासाठी केळीच्या दोन ओळीमध्ये बाजरीचे सरमड, ऊसाचे पाचट, जून्या गव्हाचा भुसा, केळीची वाळलेली पाने, डाळवर्गीय पिकांचे काड अशा सेंद्रीय पदार्थांचे आच्छादन करावे, या आच्छादनाचा साधारणतः १५ सें.मी. जाडीचा थर द्यावा. अशा प्रकारच्या आच्छादनामुळे जमिनीतून होणाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो किंवा ५० मायक्रोन असलेल्या काळा रंगाच्या पॉलिथीन किंवा प्रति झाड ५ किलो वाळलेल्या गवताचे आच्छादन करावे.
५) केळी घडाचे व्यवस्थापनघड पूर्ण निसवल्यावर केळफुल वेळीच कापावे. घडावर ९ फण्या ठेवून बाकी खालच्या फण्या धारदार विळयाने सुरूवातीलाच कापून टाकाव्यात. केळीचा घड पूर्ण निसवल्यावर व केळफुल तोडल्यानंतर घडावर लगेच आणि पहिल्या फवारणी नंतर १५ दिवसांनी १०० लिटर पाण्यात ५० ग्रॅम पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट अधिक १०० ग्रॅम युरिया अधिक स्टीकर (१० मि.ली.) मिसळून फवारणी करावी. यामुळे लांबी आणि घेर वाढून केळीच्या वजनातही वाढ होऊन फळांचा आकर्षकपणा आणि चकाकी देखील वाढते. पाने खरचटून धुळकिणाने व फुलकेळीमुळे घडातील फळांचे नुकसान होऊ नये म्हणून वरील फवारणी केल्यानंतर केळीचे घड ०.५ मि.मी. जाडीच्या ७५ x १०० सें.मी. आकाराच्या ६ टक्के सच्छिद्र प्लास्टिक पिशव्यांनी झाकावेत.
६) केळी बागेची हिवाळी हंगामातील काळजीकेळी हे उष्णकटीबंधीय फळ असून त्याची किमान व कमाल तापमान सहन करण्याची मर्यादा १० सें.ग्रे. ते ४० सें.ग्रे. आहे, हिवाळ्यात तापमान १० सें.ग्रे. पेक्षा कमी गेल्यास नवीन पाने येण्याचा वेग मंदावतो आणि झाडांची वाढ खुंटते. निसवण्याच्या अवस्थेतील बागेमध्ये घड सामान्यपणे डिसेंबर, जानेवारी महिन्यात प्रति झाडास २५० ते ५०० ग्रॅम निंबोळी पेंड भुकटी द्यावी. रात्रीच्या वेळेस बागेत ओला सुका कचरा एकत्र करून पेटवून धूर करावा. हिवाळी व उन्हाळी हंगामात केळी बागेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी केळीची लागवड करतेवेळी बागेभोवती दोन ओळीत शेवरीची लागवड करावी.
अधिक वाचा: तुमची जमीन क्षारपड झाली आहे? क्षार कमी करण्यासाठी करा या पिकांची लागवड?