तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य, पिकांवरील जमिनीतून व बियाण्यांपासून होणारे रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची वाढ होण्यासाठी बीजप्रक्रिया हे अत्यंत प्रभावी साधन आहे. एकात्मीक किड व्यवस्थापनाअंतर्गत बीज प्रक्रिया या बाबीचा सर्वप्रथम समावेश होतो. बीजप्रक्रिया किड व रोग नियंत्रणाचा प्रतिबंधात्मक आणि किफायतशीर उपाय आहे.
बीजप्रक्रियेचे महत्व
१) बियाण्याची उगवण क्षमता वाढते.
२) रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात.
३) रासायनिक खतांची २०-२५ टक्के बचत होते.
४) जमिनीतून व बियाण्यांव्दारे येणाऱ्या पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.
५) पिकाच्या उत्पावनात १५-२० टक्के वाढ होते.
बीजप्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी
१) बीजप्रक्रिया करतांना रसायनांचा संपर्क हाताशी होऊ नये यासाठी हातमोजे किंवा प्लास्टिक पिशवीचा वापर करावा व तोंडावर मास्क लावावा.
२) बीजप्रक्रियेवेळी बुरशीनाशके जिवाणू खतात मिसळू नयेत.
३) विकत घेतलेल्या बियाण्यावर बुरशीनाशक व किटकनाशकाची बीजप्रक्रिया केली असल्यास अशा बियाण्यावर फक्त जिवाणू खतांची बीज प्रक्रिया करावी.
४) बीजप्रक्रिया केलेले आणि पेरून शिल्लक राहिलेले बियाणे जनावरांच्या किंवा मनुष्याच्या खाण्यासाठी वापरू नये.
५) जिवाणू खत शक्यतो त्याच हंगामात वापरावे उरल्यास ते सहा महिण्याच्या आत वापरावे. साठवणूक थंड जागेत करावी.
६) बीजप्रक्रिया करतांना तंबाखु खाणे, पाणी पिणे, सिगारेट ओढणे टाळावे.
७) भुईमुग, सोयाबीन इ. पातळ साल असणाऱ्या बियाण्याच्या बाबतीत बीजप्रक्रिया करतांना जिवाणू संवर्धन अथवा बुरशीनाशकांचे घट्ट द्रावण करावे व बीजप्रक्रिया करताना टरफल निघणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.
जीवाणू संवर्धन बीजप्रक्रिये बाबतची घ्यावयाची काळजी
१) जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया ही बुरशीनाशके किंवा किटकनाशकांची प्रक्रिया केल्यानंतर शेवटी करावी
२) रायझोबियम संवर्धकाची प्रक्रिया पाकिटावर नमुद केलेल्या विशिष्ट पिकाच्या गटसमुहास करावी
३) ट्रायकोडर्मा सोबत रायझोबियम, अॅझोटाबॅक्टर, पी.एस.बी जिवाणू या जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करता येते.
खरीप पिकासाठी शिफारशीत बीजप्रक्रिया
१) खरीप ज्वारी
३ किलो मीठ १० लिटर पाण्यात मिसळावे या द्रावणात बियाणे ओतावे व ढवळावे. द्रावणावर तरंगणारे बी बाहेर काढून जाळावे. तळाला राहिलेले बी काढून ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे व सावलीत वाळवावे. गंधक ३०० मेस ४०० ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम/किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. २०० ग्रॅम कार्बोसल्फान (२५ एसडी) १ किलो बियाण्यास चांगले मिसळावे.
२) मका
अॅझोटोबॅक्टर आणि पी.एस.बी. जिवाणू प्रत्येकी २५० ग्रॅम व ट्रायकोडर्मा १०० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी. बियाणे अर्धा तास सावलीत सुकवून पेरणी करावी.
३) बाजरी
२ किलो मीठ १० लि. पाण्यात मिसळावे. या द्रावणात बी ओतावे व ढवळावे. द्रावणावर तरंगणारे बी बाहेर काढून जाळाये तळाला राहिलेले बी काढून तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे व सावलीत वाळवावे. मेटालॅक्झील/अॅप्रॉन ३५ टक्के एस.डी. ६ ग्रॅम/किलो बियाणे प्रमाणे बिजप्रक्रिया करावी.
४) तुर, उडीद, मुग
थायरम ६ ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा कार्बेन्डाझीम १.५ ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा कार्बोन्झीन (७५ टक्के) १० ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. स्फुरद विरघळणारे जिवाणू प्रत्येकी २५० ग्रॅम व ट्रायकोडर्मा ५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी. बियाणे अर्धातास सावलीत सुकवून पेरणी करावी.
५) भात
मॅन्कोझेब (७५ टक्के) अधिक कार्बेन्डाझीम (५० टक्के) प्रत्येकी २ ग्रॅम/किलो बियाण्यास संयुक्त बीजप्रक्रिया करावी. ३०० ग्रॅम मीठ १० लिटर पाण्यात विरघळावे व या द्रावणात बी ओतावे आणि ढवळावे. द्रावणावर तरंगणारे बी बाहेर काढून जाळावे. तळाला राहिलेले बी काढून तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे व सावलीत वाळवावे. अॅझोटोबॅक्टर व पी.एस.बी. प्रत्येकी २५० ग्रॅम/१० किलो बियाणे या प्रमाणात बियाण्यास चोळावे व अर्धा तास सावलीत सुकवावे.
६) ऊस
अॅसीटोबॅक्टर, अॅझास्पिरीलम आणि पी.एस. बी. जिवाणू प्रत्येकी १.२५ किलो अधिक ट्रायकोडर्मा १ किलो प्रति १०० लिटर पाण्यात द्रावण तयार करून त्यात ऊस बेणे ५ मिनिटे बुडवून घ्यावेत व लागवड करावी. बेणे ५० अंश से. तापमानाच्या पाण्यात २ तास बुडवून ठेवावे किंवा उष्ण हवेची प्रक्रिया बेणे ५४ अंश से. तापमानात ४ तास ठेवावे.
७) सोयाबीन
सोयाबीन बियाण्यास पेरणीपुर्वी कार्बोक्झीन ३७.५% अधिक थायरम ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे बीजप्रक्रिया करावी. बुरशीनाशकाच्या बीज प्रक्रियेनंतर थायमिथोक्झामि ३०% एफ.एस.ची १० मि.ली./किलो बियाणे व त्यानंतर ब्रेडी रायझोबियम + पी.एस.बी. २५० ग्रॅम/१० किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया
२५० ग्रॅम जिवाणू संवर्धक पाकीट १० ते १५ किलो बियाण्यास वापरावे. १ लि. पाण्यात १२५ ग्रॅम गुळ टाकून द्रावण उकळून घ्यावे. द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये २५० ग्रॅम जिवाणू कल्चर टाकून बियाण्याला हळुवार लावावे याची काळजी घ्यावी. बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्याची पेरणी ताबडतोब करावी (२४ तासात पेरणी करावी)
वरील पद्धतीने खरीप हंगामातील प्रमुख पिकांची पेरणी करण्यापुर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया केल्यामुळे बियाण्याच्या माध्यमातून पसरणाऱ्या रोगाचे नियंत्रण होवून पिकाची उगवण क्षमता वाढेल.
प्रा. संजय बाबासाहेब बडे सहाय्यक प्राध्यापक
(कृषी विद्या विभाग) दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव ,ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर
७८८८२९७८५९