शेतजमीन पिकांच्या आवश्यक अन्नघटकांची उपलब्धता किती प्रमाणात आहे. हे जाणून घेण्यासाठी माती परीक्षण आवश्यक आहे. यामुळे उत्पादकांना पिकांच्या पोषण व्यवस्थापनाबद्दल योग्य निर्णय घेण्यास मदत होते.
माती परीक्षण केल्यास शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळू शकते. त्यामुळे पेरणीपूर्व माती परीक्षण करूनच पेरणी करावी. नमुने तपासणीला पाठविताना शेतकऱ्याचे नाव, गट क्रमांक, याआधी घेतलेले पीक, नमुना गोळा केल्याचा दिनांक या गोष्टी पिशवीवर नमूद कराव्यात, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
माती परीक्षणासाठी नमुना घेताना
• माती परीक्षण करण्यासाठी मातीचा नमुना कोणत्याही मोठ्या झाडा जवळ घेऊ नये.
• शेतात जनावरे ज्या जागेवर बांधली जातात त्या ठिकाणावरून तसेच शेणाच्या उकिरड्याजवळून माती नमुना घेऊ नये.
• यासोबतच विहिरीजवळची जागा, कचरा टाकण्याची जागा या ठिकाणांवरून माती नमुना घेऊ नये.
• रासायनिक किवा सेंद्रीय खत टाकल्यानंतर किमान २ ते २.५ महिन्यांपर्यंत माती नमुना घेऊ नये.
प्रत्येक विभागातून वेगवेगळा नमुना घ्यावा
• मातीचा नमुना घेताना त्या जमिनीचा रंग, उतार, पोत, खोली इत्यादी घटकांचा विचार करून प्रत्येक विभागातून वेगवेगळा नमुना घेतात.
• जमिनीवर काल्पनिक नागमोडी वळणाची रेषा काढून रेषेच्या प्रत्येक टोकाला एक याप्रमाणे एकरी ६ ते ७ ठिकाणांवरून नमुने गोळा केले जातात.
• हंगामी पिकांसाठी २२.५ सेंटिमीटर खोलीचे व्ही आकाराचे खड्डे घेतात.
• तर बहुवार्षिक पिकांसाठी ३०, ६०, ९० सेंटिमीटर खोलीचे व्ही आकाराचे खड्डे घेतात.
• तीन वेगवेगळ्या खोलीचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठविले जातात.
• सर्व खड्यातील माती बाहेर काढून टाकून व्ही आकाराचा बाजूचा २ इंच जाडीचा मातीचा थर कापून घ्यावा.
• शेतात पीक उभे असताना पिकाच्या दोन ओळींमधून नमुना घ्यावा.
• रब्बी हंगामातील पीक काढल्यानंतर साधारणपणे ८ ते १० दिवसांचा कालावधी गेल्यानंतर आणि नांगरणी, वखरणी करण्याअगोदर माती नमुना तपासणीसाठी गोळा करावा.
माती परीक्षण कुठे करावे आणि खर्च किती येतो?
• कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्र अशा खात्रीशीर ठिकाणावरूनच मातीपरीक्षण करून घ्यावे.
• माती परीक्षणाचा खर्च कोणते घटक तपासायचे आहेत, मातीचा प्रकार कोणता आहे यावर अवलंबून असतो.
• मातीतील महत्वाचे १२ घटक तपासण्यासाठी चांगल्या प्रयोगशाळेत ५०० ते ७०० रूपयांपर्यंत खर्च येतो.
तीन वर्षांतून एकदा माती नमुना तपासा
• रासायनिक आणि जैविक गुणधर्माचे विश्लेषण करण्यासाठी मातीपरीक्षण करणे महत्वाचे असते. खतांचा अधिक वापर केला तर जमिनीत रसायने अधिक मिसळली जातात.
• मातीचे जैविक आरोग्य धोक्यात आल्याने पिकाला अन्नदव्ये उपलब्ध करून देणारे घटक कमी होतात आणि माती नापीक होत जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणे आवश्यक आहे.
• एका संशोधन अहवालानुसार मातीपरीक्षण करून त्यानुसार केलेल्या लागवडीमुळे पिकांपासून दोन पटींपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळवता येतो. फळपिकांसाठी दरवर्षी तर हंगामी पिकांसाठी ३ वर्षातून एकदा माती नमुना तपासून घेणे गरजेचे असते.